पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार का, याबाबत उत्सुकता असताना पुणे जिल्ह्याचा आजवरचा पूर्वइतिहास हा विद्यमान आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणुका या कधीच बिनविरोध झाल्या नसल्याचा आहे. किंबहुना पोटनिवडणुका या कमालीच्या चुरशीच्या झाल्या आहेत.
बारामतीतील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, तर उमेदवार उभा करण्याची काँग्रेसने तयारी दर्शविली आहे. मात्र, अद्याप काँग्रेसने उमेदवार उभा केलेला नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आतापर्यंत पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पाचही उमेदवार हे पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामध्ये जतमधील सतीश कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टी या पक्षाकडून, सांगोल्यातील राघू घुटूकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने उमेदवारीअर्ज दाखल केला आहे.
साताऱ्यातील शरद भिसे, बुलडाणा येथील गजानन गवळी आणि उल्हासनगर येथील त्रिशला कांबळे यांनी अपक्ष उमेदवारीmअर्ज भरला आहे. उमेदवारीअर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा एप्रिलपर्यंत आहे. नऊ एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मात्र, पुण्यात आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुका कधीच बिनविरोध झालेल्या नसल्याचे दिसून येते.
खडकवासला पोटनिवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चा उमेदवार
खडकवासला विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) आमदार रमेश वांजळे यांचे २०११ मध्ये निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली. त्या पोटनिवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रमेश वांजळे यांच्याविरोधात तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास दांंगट हे उमेदवार होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षदा वांजळे यांना उभे केले. भाजपने पुणे महापालिकेत नगरसेवक असलेले भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली. ‘मनसे’ने पोटनिवडणुकीत उमेदवार उभा केला नाही. ही पोटनिवडणूक चुरशीची झाली. त्यामध्ये तापकीर यांनी हर्षदा वांजळे याचा पराभव केला.
‘कसब्या’च्या पोटनिवडणुकीची राज्यभर चर्चा
कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे २०२२ मध्ये निधन झाले. त्यानंतर २०२३ मध्ये ‘कसब्या’ची पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उभे केले. त्या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या ‘कसब्या’त काँग्रेसचे धंगेकर विजयी झाल्याने राज्यभर या पोटनिवडणुकीची चर्चा झाली. या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ राहिली. मात्र, काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने भाजपला अपयश पत्करावे लागले.
चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमुळे तिरंगी लढत
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे २०२३ मध्ये निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपने जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे आणि राहुल कलाटे हे दोघेही इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने काटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कलाटे हे नाराज झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कलाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी जगताप यांना लढत दिली होती. मात्र, पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारल्याने कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यामुळे ही लढत तिरंगी झाली. त्या निवडणुकीत अश्विनी जगताप या विजयी झाल्या.
