पुणे : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगर पंचायती, पंचायत समिती या निवडणुकांनंतर बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर उभ्या राहिल्या होत्या. आता बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने प्रचारासाठी गावोगावी ‘घोंगडी बैठका’ घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडूनही तयारी करण्यात येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचाली सुरू आहेत. निवडणुका बिनविरोध न झाल्यास पुन्हा एकदा दोन्ही ‘राष्ट्रवादी’त लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’त लढत झाली होती. त्यानंतर ‘सोमेश्वर’ कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही ‘राष्ट्रवादी’आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली असून, ‘घोंगडी बैठका’ घेऊन मतदारांचा अंदाज घेण्यात येत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात साखर कारखान्यांच्या निवडणुका या ‘मिनी विधानसभा’ निवडणुका मानल्या जातात. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनेल’ने विजय मिळवून वर्चस्व सिद्ध केले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून युवा नेते युगेंद्र पवार यांनी नेतृत्व केले होते.
सोमेश्वर’ हा कारखाना केवळ बारामतीपुरता मर्यादित नसून पुरंदर आणि फलटणमधील काही गावेही या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहेत. मुगुटराव उर्फ अप्पासाहेब काकडे यांनी १९६० मध्ये स्थापन केलेल्या या कारखान्यावर आता पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे. या कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मतदार यादी ही जाहीर झाली असून, प्रचारासाठी ‘घोंगडी बैठका’ सुरू झाल्या आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
‘माळेगाव’ निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांत बदल
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या ताब्यात होता. अजित पवार यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली. ते अध्यक्षपदाचे उमेदवार होते. अजित पवार यांनी ‘निळकंठेश्वर पॅनल’ उभे केले, तर त्यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव पॅनल’ होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा पॅनेल’ होते. या पॅनेलचे नेतृत्त्व युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. अजित पवार यांच्या पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून कारखाना ताब्यात घेतला. चंद्रराव तावरे वगळता सर्व उमेदवार हे निळकंठेश्वर पॅनेलचे निवडून आले. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध झाली आहे. या कारखान्याच्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणात बदल झाला आहे.
भाजपचे नेते रंजन तावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाशी मैत्री केली आहे. माळेगावच्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आणि भाजप नेते रंजन तावरे यांंच्यात कटुता निर्माण झाली होती. मात्र, नगर परिषदेच्या निवडणुकीत ही कटुता दूर होऊन त्यांच्यात मैत्री झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि रंजन तावरे यांची जनमत विकास आघाडी यांच्यात युती झाली. माळेगाव बुद्रुक येथे पहिली प्रचार सभा घेऊन अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. आता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की नाही, यावर दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या निवडणुकीची रणनीती निश्चित होणार आहे.
