पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात पहिले बंड सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्यानिमित्ताने झाले आहे. या कारखान्याचे गेली १३ वर्षे अध्यक्ष असलेले पुरुषोत्तम जगताप यांनीच बंडखोरी करून भाजपच्या साथीने स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. त्यांचे बंड यशस्वी होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगताप यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलला एक जागा मिळाली, तरी ती बारामतीतील भविष्यातील बदलत्या राजकारणाची नांदी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सांगता होणार आहे. जगताप यांनी बंड केल्यानंतर निवडणुकीत प्रचारात रंगत आली. जगताप यांनी अजित पवार यांच्या नावाने प्रचार करत त्यांच्या छायाचित्राचा वापर प्रचारासाठी केला. अजित पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आक्षेप घेत जगताप यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. मात्र, जगताप यांनी प्रचाराची सांगता होईपर्यंत अजित पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करून मते देण्याचे आवाहन केले. त्यामुळे प्रचाराच्या काळात रंगत आली.

भाजप पडद्यामागील सूत्रधार

पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली पॅनेल उभे करण्यात आले असले, तरी पडद्यामागील सुत्रे हलविण्याचे काम भाजप करत असल्याचे दिसून आले. पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे आता भाजपमध्ये असून, त्यांच्या सहकार्याने पुरुषोत्तम जगताप यांनी राजकीय खेळी खेळली. बारामतीत विजय मिळवायचा असेल, तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाशिवाय पर्याय नसल्याने भाजपप्रणित पॅनेलला ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ असे नाव देण्यात आले. भाजप आणि ‘राष्ट्रवादी’तील बंडखोर यांचे २१ उमेदवारांचे पॅनेल निश्चित करण्यात आले आहे. या पॅनेलला किती जागा मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या पॅनेलला एक जरी जागा मिळाली, तरी तो निकाल बारामतीतील बदलल्या राजकारणाची नांदी ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जगताप यांनी बंडखोरी का केली?

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे गेली १३ वर्षे जगताप अध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. निवडणुकीत काही उमेदवारांच्या नावाला जगताप यांनी विरोध दर्शविला. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यातून नाराजी नाट्य सुरू झाले. त्याचवेळी

खासदार पार्थ पवार यांनी काही खासगी व्यक्तींकडून कारखान्याच्या निवडणुकीविषयक अहवाल तयार करून घेतला. त्यानुसार उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यावरून जगताप आणि पार्थ पवार यांच्यात विसंवाद झाला. त्यानंतर जगताप यांनी बंडखोरी करण्याचे निश्चित केले. माजी आमदार संजय जगताप यांच्याशी संधान साधून त्यांनी पॅनेल उभे केले आहे. आता या पॅनेलच्या यशस्वितेवर बारामतीतील भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात बंडखोरांना यश मिळू शकते की नाही, हे स्पष्ट होणार आहे.