पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भविष्यात बारामतीचे नेतृत्त्व कोणाच्या हाती जाणार, याबाबत राजकीय र्वतुळात चर्चा सुरू असताना त्याची रंगीत तालीम बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्यानिमित्ताने होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर उभ्या राहिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ असून, त्याचे नेतृत्त्व युवा नेते युगेंद्र पवार हे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ असून, प्रचार आणि नियोजनाची धुरा युवा नेते जय पवार हे सांभाळत आहेत. त्यामुळे या दोन्ही युवा नेत्यांच्या नेतृत्त्वाची कसोटी असणार आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने युगेंद्र पवार यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक युगेंद्र पवार यांच्या नेतृत्त्वाखाली लढविण्यात आली होती. त्यामध्ये त्यांना अपयश आले होते. मात्र, त्या कारखान्याच्या निवडणुकीचा अनुभव युगेंद्र पवार यांच्याकडे आहे. तो अनुभव त्यांना उपयुक्त ठरणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
जय पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीनंतर बारामतीकरांच्या संंपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली ‘राष्ट्रवादी’ ही सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लढवित आहे. मात्र, या निवडणुकीचा प्रचार आणि नियोजन हे जय पवार करत आहेत. भाजपने ‘राष्ट्रवादी’त फूट पाडून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बंडखोर गटाचा पाठिंबा घेत ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे जय पवार यांच्या नेतृत्त्वाचा कस लागणार आहे.
बारामतीच्या नेतृत्त्वाबाबत विधानसभा पोटनिवडणुकीपासून चर्चा
बारामतीच्या युवा नेतृत्त्वाबाबत विधानसभा पोटनिवडणुकीपासून चर्चा सुरू आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढविली. त्यानंतर त्यांच्याकडे बारामतीचे नवे नेतृत्त्व म्हणून पाहिले जाऊ लागले. त्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी बारामतीकरांशी संपर्क ठेवण्यावर भर दिला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्यानिमित्ताने जय पवार हे बारामतीत सक्रिय झाले. ‘जनसंवादा’च्या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधत आहेत.
जय पवारांच्या वक्तव्याने उत्सुकता
जय पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्यावेळी ‘मी २०२९ मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा, अशी बारामतीतील जनतेची इच्छा आहे,’ असे वक्तव्य केले. त्यानंतर भविष्यात बारामतीची सूत्रे कोणाकडे जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली. पोटनिवडणुकीनंतर आता युगेंद्र पवार आणि जय पवार हे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीनंतर आमनेसामने आले आहेत.
