पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्यानिमित्ताने बारामतीत महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही मित्रपक्षांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ची कोंडी केली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील पराभवाची सल असल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी बंडाचा झेंडा उगारला असून, फुरसुंगी-उरळी देवाची नगरपरिषद निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे सरसावले असल्याने निवडणूक बिनविरोध करण्याचा ‘राष्ट्रवादी’चा प्रयत्न असफल झाला आहे.
महायुतील मित्रपक्षच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विरोधात उभे ठाकले असताना माळेगाव सहकारी कारखान्यात एकही जागा न मिळाल्याने लाजीरवाणा पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षही रणांगणात उतरला आहे. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्त्वाखाली ‘शेतकरी पॅनेल’ असणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’साठी ही निवडणूक आव्हानात्मक झाली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी ही निवडणूक ‘राष्ट्रवादी’साठी अस्तित्त्वाची असणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. शेतकरी मेळावा घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
‘माळेगाव’च्या निकालाने वर्मी घाव
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल हा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांसाठी वर्मी घाव घालणारा ठरला. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हे एकमेव भाजपचे उमेदवार निवडून आले. मात्र, माळेगाव गटामध्येच भाजपचे नेते रंजन तावरे यांचा पराभव हा भाजपसाठी धक्कादायक होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. या पराभवाची सल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या मनात कायम आहे. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी हा पक्ष तयारीला लागला आहे.
आमदार विजय शिवतारे रणांगणात
शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांच्या आग्रहास्तव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिकेच्या हद्दीतून वगळून फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांची नगरपरिषद स्थापन केली. मात्र, या नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ताब्यात ही नगरपरिषद गेली. या नगर परिषदेतील ३२ पैकी १९ जागा ‘राष्ट्रवादी’ने जिंकल्या. या निवडणुकीसाठी फुरसुंगीत भाजप-शिवसेनेची (शिंदे) युती होती, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. त्यामध्ये शिवसेनेला आठ तर, भाजपला पाच जागांवर यश मिळाले. या निकालामुळे आमदार शिवतारे यांचे स्वप्न भंगले. नगरपरिषदेवर सत्ता मिळविण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गेले. त्यामुळे आमदार शिवतारे हे रणांगणात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवार निश्चित केले आहेत.
३० सप्टेंबरला निवडणुकीचे चित्र स्पष्ट
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. ६०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्या अर्जांची छाननी १५ सप्टेंबरला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. ३० सप्टेंबरनंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. माळेगाव कारखान्याच्या निकालानंतर झालेल्या माळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष एकत्र आला. ‘राष्ट्रवादी’ आणि भाजपपुरस्कृत जनमत विकास आघाडीने सत्ता मिळविली. त्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते रंजन तावरे हे एकत्र आले होते. साेमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतही त्याप्रमाणे राजकीय समीकरण आखण्याचा ‘राष्ट्रवादी’चा प्रयत्न आहे. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सुरुवात झाली आहे.
