अविनाश पाटील

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीत शंभरहून अधिक नगरसेवक… जिल्हा परिषदेत ४० गटांमध्ये सदस्य… जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघात आमदार…. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा उत्साह वाढविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे हे स्वप्न रंगविले असले तरी ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी असलेल्या अडथळ्यांची जाणीव त्यांनी करुन न दिल्याने किंवा त्यांनी ते लक्षात न घेतल्याने हे कसे शक्य आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांनाही पडला आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आणावयाचे असतील तर, राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिंदे गटाचे काय, त्यांना एकही जागा सोडायची नाही की काय, असे नवीन प्रश्न उपस्थित झाले असून बावनकुळेंच्या या स्वप्नामुळे शिंदे गटात चलबिचल सुरू झाली आहे.

हेही वाचा <<< ‘भारत जोडो’मुळे काँग्रेसचा ‘हत्ती’ जागा झालाय, काँग्रेसने बिगरभाजप पक्षांना ठणकावले!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून मेळावे, सभा यांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी पेलताना भाजपचे आमदार बावनकुळे हे सध्यातरी भलतेच उत्साहित दिसत आहेत. किंबहुना भाषण आणि देहबोलीतून तसे दाखविण्याचा प्रयत्न ते  करत आहेत. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन करताना बावनकुळे यांच्याकडून नाशिक महापालिकेत सत्ता असतानाही भाजपकडून कोणती विकास कामे करण्यात आली, याविषयी मात्र फारसे सांगितलेच गेले नाही. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत शहरात सुरु असलेल्या वेगवेगळ्या कामांनी नाशिककर पार बेजार झाले आहेत. गरज नसताना चांगले रस्ते उखडणे, सुरू केलेले काम अधिकाधिक कसे रेंगाळेल हे पाहणे, यामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नाशिककरांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. निओ मेट्रो रेल्वे, लाॅजिस्टिक पार्क, नमामि गोदा प्रकल्प अशी स्वप्ने पालिकेतील सत्ताधारी भाजपने दाखवली. पाच वर्षात त्याविषयी वास्तव पातळीवर नेमके काय घडले, हे सोडून द्या. किंबहुना त्याविषयी बोलण्यासारखे नसल्याने बावनकुळे यांनी विकास योजनांसंदर्भातील सर्व विषय मार्गी लावणार, एवढे आश्वासन देत वेळ निभावून नेली. शहरासह जिल्ह्यातील प्रश्नांविषयी मार्गदर्शनाऐवजी राज्यातील सत्तासंघर्ष, ठाकरे सरकारपेक्षा शिंदे-फडणवीस सरकार कसे वेगळे, केंद्राच्या योजना यावरच बावनकुळे यांना अधिक भर द्यावा लागला.

हेही वाचा <<< राजस्थान: काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर

शिंदे गटात जिल्ह्यातील दोन आमदार, एक माजी आमदार, विद्यमान खासदार गेले असले तरी अद्याप कोणीही मोठा पदाधिकारी गेलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणी मोठे पदाधिकारी, नगरसेवक आपल्याकडे यावेत, यासाठी शिंदे गट वाट पहात असताना बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील सर्व जागांवर भाजपला विजयी करण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचा आदेश दिल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरणे साहजिक आहे. जिल्ह्यातील मालेगाव बाह्य आणि नांदगाव हे दोन मतदारसंघ सध्या शिंदे गटाकडे आहेत. त्यापैकी मालेगाव बाह्यचे प्रतिनिधित्व बंदरे व खाणकर्म मंत्री दादा भुसे हे करीत आहेत. भाजप आता या दोन्ही मतदारसंघांवरही हक्क सांगणार काय, हे लवकरच कळेल.