संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नंतर सारवासारव केली असली तरी आगामी निवडणुकीत भाजप शिंदे गटाला जास्त जागा सोडणार नाही हे अधोरेखित होत असल्याने उमेदवारीच्या आशेने शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदार असून, १० अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. या सर्वांना आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन शिंदे यांनी बंडाच्या वेळी दिले होते. यामुळे भाजपबरोबरील जागावाटपात या ५० जागांवर शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा असणार आहे. याशिवाय १० ते १५ पेक्षा अधिक जागा शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता कमीच आहे. भाजपला शिंदे यांच्याबरोबर रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष याशिवाय अन्य दोन-तीन मित्र पक्षांना ५ ते १० जागा सोडाव्या लागतील. परिणामी शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण चिन्ह मिळाले तरी भाजप युतीत शिंदे यांच्या शिवसेनेला फार काही झुकते माप देण्याची अजिबात शक्यता नाही. अगदी शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे शहरात भाजपचा आमदार आहे. यामुळे भाजप ठाणे शहराची जागा सोडण्याची शक्यता नाही. युतीत ठाण्याची जागा मिळेल या आशेवर शिंदे गटातील अनेक जण आतापासून वातावरण निर्मिती करीत आहेत.

हेही वाचा… शिंदेबाबत आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपची सारवासारव

शिवसेना हे नाव मिळाल्यापासून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढू लागली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दररोज किंवा एक दिवसा आड पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम पार पाडले जातात. त्याला अधिक प्रसिद्धी मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जातात. शिवसेनेतील अधिकाधिक नेते, पदाधिकार वा कार्यकर्ते आपल्याबरोबर यावेत म्हणून स्वत: शिंदे प्रयत्नशील असतात. अनेकांना ते स्वत: दूरध्वनी करून संपर्क साधतात.

हेही वाचा… ‘भ्रष्ट नेत्यांवरील कारवाईबाबत ममता बॅनर्जींचे दुटप्पी धोरण’; भाजपाची टीका, तर तृणमूलच्या नेत्यांमध्ये नाराजी

बावनकुळे यांनी जागावाटपाबाबत सारवासारव केली असली तरी भाजपची जागावाटपात भूमिका कठोर राहिल हे स्पष्टच दिसते. अन्य राज्यांमध्येही भाजपची अशीच भूमिका राहिली आहे. भाजप जास्त जागा सोडणार नाही हा संदेश बाहेर गेल्याने शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. कारण अनेक जण उमेदवारीच्या आशेने शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात येत आहे. पण भाजप जादा जागाच सोडणार नसल्यास शिंदे सर्वांना उमेदवारी देणार तरी कसे हा प्रश्न कायम राहतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Because of bawankule statement on election seat formula there will be affect those going to join shinde group print polotics news asj
First published on: 18-03-2023 at 13:07 IST