scorecardresearch

औरंगाबाद शिक्षकमधील भाजपची मरगळ दूर

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ तीन वेळा ताब्यात ठेवणाऱ्या राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपा ही निवडणूक गांभीर्यपूर्वक लढवत आहे की नाही, यावर शंका व्यक्त केल्या जात होत्या.

Aurangabad, Teachers constituency election campaign, BJP, Devendra Fadnavis
औरंगाबाद शिक्षकमधील भाजपची मरगळ दूर ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

सुहास सरदेशमुख

औरंगाबाद: जुन्या पेन्शन योजनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखविल्याने भाजपच्या प्रचारात नवा उत्साह संचारला असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ तीन वेळा ताब्यात ठेवणाऱ्या राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपा ही निवडणूक गांभीर्यपूर्वक लढवत आहे की नाही, यावर शंका व्यक्त केल्या जात होत्या. आयात केलेला उमेदवार, जुनी पेन्शन योजना आणि शाळा अनुदानाचा न निघालेला शासन निर्णय यावरुन सत्ताधारी भाजपची मंडळी शिक्षक हिताच्या विरोधी आहेत, असा राष्ट्रवादीकडून प्रचार सुरू होता. त्याला पहिल्यांदाच फडणवीस यांनी उत्तर दिल्याने भाजपच्या गोटातील मरगळ कमी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपने मराठवाड्यातील सर्व नेते व्यासपीठावर आणले खरे. पण हे नेते मतदारसंघात गेल्यानंतर शिक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांना अडचणी येत होत्या. नोंदणी केलेला मतदार राष्ट्रवादी कॉग्रेसच्या संस्थांमध्ये कार्यरत असल्याने त्यांचे मत परिवर्तित करणे हे भाजपसाठी अवघड काम आहे. त्यात जुन्या पेन्शन योजनेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असल्याचे त्यांच्या विधान परिषदेतील भाषणातून ध्वनीत होत होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे काम अधिक सुकर होत असल्याचे चित्र प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात होते. मात्र, फडणवीस यांनी भूमिका बदलून जुन्या पेन्शन योजनेस सरकार नकारात्मक नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात रंगत वाढली आहे.

हेही वाचा… शरद पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम विचारवंत परिषद

जुन्या पेन्शन योजनेबरोबरच शाळा अनुदानासाठी ११६० कोटी रुपयांची तरतूद नागपूर येथील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आली असून त्याचा शासन निर्णय लवकरच निघेल याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिक्षण क्षेत्रातील या दोन्ही निर्णयांची माहिती शिक्षक मतदारांपर्यंत पोहचविण्यास काहीसा विलंब झाल्याचे मानले जात आहे. प्रचारात जुनी पेन्शन योजना राष्ट्रवादीने केंद्रस्थानी आणल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मकता दाखवली पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच हा निर्णय घेण्यास खळखळ करत असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले होते. ते खोडून काढण्यासाठी फडणवीस यांच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वगळता अन्य नेते फारसा पुढाकार घेत नसल्याचे चित्र होते. प्रचार मुद्द्यात आता ३० हजार भरतीची घोषणाही आचारसंहितेत अडकू शकणारी असली तरी त्याचा शिक्षक मतदारांवर परिणाम होऊ शकतो. सरकार शिक्षकांविषयी ममत्त्वाने विचार करीत आहे, असा संदेश भाजपकडून दिला जात आहे.

हेही वाचा… काँग्रेसच्या ताब्यातील गुजरातमधलं डेअरीविश्व भाजपाने आपल्या अधिपत्याखाली कसं आणलं?

भाजपच्या या प्रचारतंत्राला राष्ट्रवादीकडून पूर्वावार संपर्क पद्धतीने उत्तर दिले जात आहे. मराठवाड्यातील ज्या शाळा, महाविद्यालयांमध्ये अधिक मतदार आहे तिथे विक्रम काळे, सतीश चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रचार करत आहेत. मात्र, या निवडणुकीत अजित पवार पहिल्या टप्प्यात लक्ष घातले होते. सतीश चव्हाण यांनी विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. एका बाजूने सतीश चव्हाण यांनी लावलेली प्रचार यंत्रणा तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या प्रचारयत्रणेची अधिक माहिती असणारे राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे भाजपने रणनीती ठरविण्यासाठी निवडणूक प्रमुखपद दिले असल्याने आता प्रचारातील रंगत वाढू लागली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 11:21 IST
ताज्या बातम्या