जयेश सामंत

ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या मदतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकण्यात भाजपला यश मिळाले असले तरी शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात पुरेशी आणि वाढती ताकद असतानाही सतत दुय्यम भूमीकेत वावरावे लागत असल्याने भाजपच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आता टोकाला पोहचू लागली आहे.

Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
bjp royal family members ticket
Video: ‘घराणेशाही’वरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपाकडून राजघराण्यांतील १० सदस्यांना लोकसभेची उमेदवारी
shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता

कशीश पार्क भागातील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीत मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची नावे पुढे येताच वागळे इस्टेट पोलिसांनी बघ्याची भूमीका घेतली असा जाहीर आरोप मंगळवारी भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी केला. राज्यातील सत्तेत गृहमंत्रालय आपल्याकडे असूनही पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी २४ तास झाला तरी गुन्हा दाखल होत नसल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालिचा रोष दिसून आला. या रोषाचे धनी आपण होत असल्याचे लक्षात येताच डावखरे-केळकर यांनी पोलीस यंत्रणांवर जाहीर आरोप केले खरे मात्र जिल्ह्यात शिंदे यांच्यापुढे आपल्याला सतत दुय्यम भूमीकेत रहावे लागणार या विचाराने पक्षातील केडर मात्र कमालिचा अस्वस्थ झाला आहे.

हेही वाचा…निरुत्साही गर्दीसमोर नड्डांकडून योजनांची उजळणी; राजकीय लाभ किती ?

एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात २०१४ नंतर आलेल्या मोदी लाटेनंतर भाजपने आपले बऱ्यापैकी बस्तान बसविले आहे. राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातून आयात केलेले कपील पाटील आणि किसन कथोरे या दोन नेत्यांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपची चांगली पकड आहे. गणेश नाईक यांच्या पक्ष प्रवेशामुळे नवी मुंबईतही भाजपला तगडा नेता सापडला आहे तर कल्याण डोंबिवलीत रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड आणि नरेंद्र पवार हे नेते भाजपच्या परंपरागत मतदारांच्या मदतीने शिवसेनेला नेहमीच आव्हान उभे करताना दिसले. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात संजय केळकर यांनी २०१४ मध्ये शिवसेनेला पराभवाचा धक्का देत जुने शहर आणि घोडबंदर पट्टयात शिवसेनेला तोडीस तोड असे आव्हान उभे केल्याचे पहायला मिळाले. राज्यात युतीचे सरकार असताना ठाणे, कल्याण डोंबिवलीत झालेल्या महापालिका निवडणुका या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात लढविल्या. त्यात शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही शहरांवर आणि पुढे जिल्हा परिषद निवडणुकीत ग्रामीण भागावर चांगली पकड मिळविल्याचे पहायला मिळाले. तरीही या निवडणुकांमध्ये भाजपची वाढलेली ताकद पहायला मिळाली. पुढे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा भाजपचे अधिक आमदार निवडून आले.

हेही वाचा… चंद्राबाबूंची लोकप्रियता एवढी वाढली ?

ताकद वाढली तरीही हतबल

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होताच ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढलेला पहायला मिळाला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला भाजपची उघडपणे साथ मिळाली. या मुद्दयावरुन आगरी-कोळी समाजाच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्नही भाजपने करुन पाहीला. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपील पाटील यांना थेट केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले. ठाण्यातही शिवसेनेला आणि तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याची व्युहरचना स्थानिक पातळीवरुन करण्यात आली. या धोरणाचा भाग म्हणून शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरुन काढण्याची मोहीम स्थानिक भाजप नेत्यांनी सुरु केली होती. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या कामात अनियमीतता असल्याचा मुद्दा उपस्थित करत थेट केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. खासदार किरीट सोमय्या यांचेही ठाणे शहरातील दौरे वाढले होते. मात्र, सहा महिन्यांपुर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यात सत्ताबदल झाला आणि जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्यासाठी हाती घेतलेली मोहीमेला अपेक्षीत मरगळ आली.

हेही वाचा… कोल्हापूरमध्ये पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांमधील संघर्षाला नव्याने धग

राज्यातील सत्तेत आम्ही उपेक्षीतच

राज्याचे मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्याने ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून विकासाचे वारे वाहू लागले असले तरी सत्तेच्या या धामधुमीत आपल्या पदरात काय पडते आहे हा प्रश्न स्थानिक भाजप नेत्यांना सतावू लागला आहे. डोंबिवलीत शिंदे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यात फारसे राजकीय सख्य नाही. असे असले तरी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांना अपेक्षीत असलेला ३०० कोटींपेक्षा अधिकचा रस्ते निधी मिळवून दिल्याने सध्या चव्हाण यांनी खासदार शिंदे यांच्याशी जुळवून घेतल्याचे पहायला मिळत आहे. ठाण्यात मात्र भाजपला कुणीच वाली नाही अशी भावना कार्यकर्ते आता जाहीरपणे व्यक्त करताना दिसू लागले आहेत. पक्षाचे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे हे कॅाग्रेसच्या मुशीतून तयार झालेले नेते. त्यांचे वडील दिवंगत वसंत डावखरे हे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी ओळखले जात. निरंजन यांचेही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सलोख्याचे संबंध राहीले आहेत. कशीश पार्क येथील कार्यकर्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून हल्ला होताच डावखरे यांनी आक्रमक भूमीका घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र २४ तास उलटून गेला तरी या प्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याचे पाहून कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता टोकाला पोहचली. काही प्रमुख कार्यकर्त्यांनी ही नाराजी उपमुख्यमंत्र्यांना संदेशाद्वारे बोलून दाखविल्याचेही सांगितले जाते. हा वाढता रोष लक्षात घेऊन केळकर आणि डावखरे यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेत वागळे इस्टेट पोलिसांच्या भूमीकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र अशी आक्रमक भूमीका घेण्यास या दोघांनीही उशीर केल्याची भावना पक्षात आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्याला अशाप्रकारे जाहीरपणे चोपले जात असेल तर पुढील राजकारणात आपले अस्तित्व काय रहाणार अशी जाहीर चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये होताना दिसत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील ही अस्वस्थता ठाण्यातील राजकारणाला कोणते वळण देते हे पहाण्यासारखे ठरणार आहे.