उमाकांत देशपांडे

मुंबई : पक्षश्रेष्ठींचा विश्वास आणि लढवय्या असल्याने मुंबई भाजप अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा आमदार अॅड. आशिष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत अवघ्या दोन जागांसाठी सत्तेचा घास भाजपकडून हिरावला गेला. त्याचा वचपा काढून शिवसेनेकडून सत्ता हिसकावण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्धार आहे. मुंबईत महापौर भाजपचाच होणार, अशी घोषणा करत शेलार यांनी शिवसेनेशी जोरदार संघर्षाचेच संकेत दिले आहेत.

गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला ८२ तर शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या. मात्र त्यावेळी राज्यात शिवसेना भाजपबरोबर सत्तेत असल्याने भाजपने पालिकेत ‘ रखवालदार ‘ भूमिका स्वीकारून शिवसेनेला सत्ता दिली होती. मात्र आता भाजप -शिवसेनेत विस्तवही जात नसल्याने शिवसेनेची सत्ता महापालिकेेतून संपुष्टात आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यासाठी केंद्रीय व राज्य पातळीवरील सर्व ताकद एकवटून संघर्ष करण्यासाठी लढवय्या व राजकीय चतुरता असलेल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध असलेल्या शेलार यांची पुन्हा मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शेलार यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी गेल्या काही काळापासून चर्चेत होते. ते विधिमंडळात भाजपचे मुख्य प्रतोद असून गेल्या दीड-दोन वर्षात त्यांनी राज्यभरात पक्ष संघटना बांधणीसाठी दौरेही केले आहेत. मुंबईत निवडणूक संचालन समिती आणि ठाणे व नवी मुंबईतही निवडणूक प्रभारी म्हणून शेलार यांच्याकडे जबाबदारी काही काळापूर्वी सोपविण्यात आली होती व त्यांनी कामही सुरू केले होते. पण काहीही करून मुंबई महापालिका जिंकायचीच, हे भाजप पक्षश्रेष्ठींनी ठरविल्याने त्यांनी शेलार यांच्याकडे पुन्हा मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

शिवसेनेची मुंबईत घट्ट पाळेमुळे आहेत. मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भाजपने ४० आमदार फोडून दणका दिला आहे आणि महापालिकाही हिसकावून घेवून शिवसेनेला नेस्तनाबूत करायचा भाजपचा उद्देश आहे. मुंबईत शिवसेनेशी वैर पत्करून पुन्हा निवडून कसे यायचे, अशी चिंता भाजपच्या मुंबईतील खासदार व काही आमदारांना होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेलार, मंगलप्रभात लोढा, किरीट सोमय्या असे काही मोजकेच नेते सरकारविरोधात आवाज उठवत होते व आंदोलने करीत होते आणि काही खासदार लोढा यांना जुमानतही नव्हते. आता मुंबईतील सर्व खासदार, आमदार, नगरसेवकांना एकत्र आणून शिवसेनेशी जोरदार संघर्ष करण्यासाठी शेलार यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी ही जबाबदारी दिली आहे.

वांद्रे (प.) मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले शेलार हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते शालेय शिक्षणमंत्री होते. मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी याआधी दोन वेळा तब्बल सात वर्षे यशस्वीपणे सांभाळली होती. त्यामुळेच शेलार हे पुन्हा ही जबाबदारी घेण्यास फारसे इच्छुक नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर कर्नाटकांतील दोन लोकसभा मतदार संघांची जबाबदारी देण्यात आली होती. तर गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर सुरतमधील मतदार संघांची जबाबदारी पक्षाने सोपविली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्या भागात पक्षाला चांगले यश मिळवून देण्यात ते यशस्वी झाले़ तर हैद्राबाद महापालिका निवडणुकीतही त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. लोकसभा २०२४ च्या तयारीला भाजपने सुरूवात केली असून शेलार यांच्यावर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईतील प्रभादेवीच्या (पूर्वीचे एलफिन्स्टन) रेल्वे पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर संरक्षण मंत्र्यांना भेटून त्यांनी सैन्यदलामार्फत तातडीने पादचारी पूल उभारण्याची संकल्पना मांडली व त्यानुसार विक्रमी वेळात हा पूल उभारला गेला. शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्षही आहेत. पक्षसंघटनेतील जुन्या-जाणत्या आणि मुंबईतील कोळी, ख्रिश्चन व विविध समाजांमध्ये दांडगा जनसंपर्क असलेल्या शेलार यांना मंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्ष पद देण्याऐवजी पुन्हा ही धुरा पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. त्यामुळे या जबाबदारीसाठी उत्सुक नसलेल्या शेलार यांनी हे आव्हान यशस्वीपणे पूर्णत्वास नेले, तर राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही त्यांना भविष्यात सोपविली जाऊ शकते.