छत्रपती संभाजीनगर : मराठा – ओबीसी समाजातील दूही, प्रशासकीय पातळीवरील अनागोंदी या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. प्रशासकीय पातळीवर महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांना ‘ काम करा’ हा संदेश त्यांनी दिल्यानंतर बीडमध्ये काही सुधारणा दिसू लागल्या होत्या. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बीडच्या पालकमंत्री पदी कोण, असा पेच पुन्हा निर्माण झाला आहे.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाशी शपथ घेतली असली तरी बीडसारख्या संवेदनशील जिल्ह्यातील पालकमंत्री अधिक प्रगल्भ आणि प्रशासकीय पातळीवर अधिक पकड असणारा हवा, अशी मागणी केली जात आहे. पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर पाेलीस अधीक्षक आणि जिल्हाधकाऱ्यांना काम करण्यास मुभा दिल्याने बीडमध्ये अनेक सुधारणा दिसू लागल्या आहेत.

मााजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मात्र सुनेत्राताई पवार यांनीच हे पदही स्वीकारवे, असे म्हटले आहे. अजित पवार यांनी काही प्रकल्प हाती घेतले होते. त्याचे कार्यालय त्यावर स्वतंत्रपणे लक्ष देत होते. त्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सुनेत्रा पवार यांनीच हे पद स्वीकारावे अशी आमची मागणी असेल, असे सोळंके यांनी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना सांगितले. बीड जिल्ह्याच्या विकासात भर टाकणारे नियोजन अजित पवार यांनी पूर्ण केले होते. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा नियोजन १२५० कोटी रुपयांचा एक आराखडा पूर्ण केला आहे. पण या गतीने काम करणारे नेते कोण याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. आम्ही तालुका पातळवरील कोणी यात बोलणे उचित होणार नाही, असे भाजपचे अक्षय मुंदडा म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलनानंतर आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या पालकमंत्री पदी मुंडे बंधू – भगिनी नको, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली होती. आता हे पद मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेही जाऊ शकते, असाही दावा केला जात आहे. मात्र, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅग्रेसच्या आमदारांची संख्या अधिक आहे. प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, धनंजय मुंडे, हे तीन आमदार आहेत. यातील धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री पद हवे आहे. त्यांना पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरुनही सतत विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पालकमंत्री मिळेल असाही दावा केला जात आहे.