माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या काही दिवसांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुंबईहून बारामतीला येत असताना अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत बुधवारी, २८ जानेवारी रोजी अपघात झाला. त्यात अजित पवार तसेच इतर चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या काही दिवसांनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, इतिहासात असे प्रसंग दुर्मिळ असले तरी पतीच्या निधनानंतर पत्नीला सत्तेतील महत्वाच्या पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली, असे याआधीही घडले आहे. सुनेत्रा पवार यांच्याआधी असाच प्रसंग वायकोम नारायणी जानकी उर्फ जानकी रामचंद्रन यांच्यावरदेखील ओढावला होता. त्यावेळी काय घडलं होतं जाणून घेऊया.
वायकोम नारायणी जानकी यांना जानकी रामचंद्रन या नावानेही ओळखले जाते. जानकी रामचंद्रन या तमिळनाडूतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचे पती एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्या अकाली निधनानंतर जानकी रामचंद्रन या १९८८ मध्ये फक्त २३ दिवसांसाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या.
चित्रपटातून राजकारणाकडे…
जानकी यांचा विवाह अभिनेता गणपती भट यांच्याशी झाला होता. त्यानंतर जानकी यांच्या जीवनात एम. जी. रामचंद्रन यांची एंट्री झाली. त्यानंतर जानकी यांनी पती गणपती भट यांची साथ सोडून एम. जी. रामचंद्रन यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर जानकी यांनी एक उत्तम गृहिणी बनण्यासाठी अभिनय क्षेत्र कायमचे सोडले होते.
एम.जी. रामचंद्रन यांच्या आयुष्यात जयललिता यांचा प्रवेश
लेखक अत्तर चांद यांनी ‘एमजी रामचंद्रन, माय ब्लड ब्रदर (१९८८)’ या पुस्तकात याबाबत उल्लेख केला आहे. “जयललिता यांनी १९६५ मध्ये ‘अयीराथील ओरूवन’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी एम.जी. रामचंद्रन यांच्याबरोबर एक भूमिका साकारली. तेव्हापासून एम.जी. रामचंद्रन यांच्या आयुष्यात जयललिता यांचा प्रवेश झाला होता.”
पुढील काही वर्ष जयललिता एम.जी. रामचंद्रन यांच्याबरोबर राहत होत्या. या कालावधीत जानकी यांनी एम.जी. रामचंद्रन यांच्या आयुष्यातून काढता पाय घेतला होता. १९७२ मध्ये एम.जी. रामचंद्रन यांच्या मोठ्या भावाने जानकी यांच्याबरोबर पुन्हा संसार करावा असा सल्ला एम.जी. रामचंद्रन यांना दिला. त्यानंतर एम.जी. रामचंद्रन व जानकी यांनी कर्नाटकातील मुकांबिका मंदिरात विवाह केला होता.
चांद यांनी लिहिले आहे की, “जयललिता या स्वतंत्र घरात राहत होत्या, तर जानकी या एम.जी. रामचंद्रन यांच्या रामावरम गार्डन्स (द हाऊस ऑफ एमजीआर) मध्ये राहत होत्या.”
राजकीय पोकळी आणि वारसदाराचा वाद
५ ऑक्टोबर १९८४ रोजी एम.जी. रामचंद्रन यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विशेष विमानाने रामचंद्रन यांना उपचारांसाठी न्यूयॉर्कला पाठवले होते. दरम्यान, एम.जी. रामचंद्रन यांच्या अनुपस्थितीत तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणावर सोपवावी असा प्रश्न निर्माण झाला होता.
राजकीय भाष्यकार कल्याणी शंकर यांनी त्यांच्या ‘द एम्प्रेस: द ड्रॅमॅटिक लाइफ ऑफ ए पावरफूल अँड एनिग्मॅटिक लिडर (२०१७)’ या पुस्तकात याबाबत माहिती दिली. “पक्ष चालवण्यासाठी त्यावेळी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीत जयललिता यांचा समावेश करण्यात आला होता. जयललिता यांच्या समावेशाला बहुमताने नेत्यांनी अनेक कारणांसाठी विरोध केला होता.”
एम.जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर काय झाले ?
एम.जी. रामचंद्रन यांचे दिर्घकालीन आजाराने २४ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले. त्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती. एम.जी. रामचंद्रन यांचा राजकीय वारसा मिळवण्यासाठी तमिळनाडूत जानकी रामचंद्रन व जयललिता यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.
लेखक परंजॉय ठाकुर्ता आणि शंकर रघुरामन यांनी त्यांच्या ‘अ टाइम ऑफ कोएलिशन्स: डिव्हायडेड वी स्टँड (२००४)’ या पुस्तकात लिहिले आहे की, “एम.जी. रामचंद्रन यांनी त्यांच्या हयातीत जयललिता यांनाच त्यांचे राजकीय वारस मानले होते, त्यामुळे जयललिता यांची समितीत निवड करण्यात आली होती, असे एआयएडीएमके (AIADMK) पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणाले होते. तर जानकी यांच्याकडे एम.जी.रामचंद्रन यांचा वारसा सोपवल्यास भावनिक लाट तयार होईल, असा अंदाज काही नेत्यांनी लावला होता.”
जयललितांना नमवून जानकी मुख्यमंत्री झाल्या
दरम्यान, जयललिता यांना त्यावेळी फक्त ३३ आमदारांचे समर्थन मिळाले होते, तर जानकी यांना ९९ आमदारांनी पाठिंबा देत मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा करून दिला होता. ६ जानेवारी १९८८ रोजी जानकी यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तसेच AIADMK पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदाची जबाबदारीदेखील जानकी यांच्याकडेच सोपवण्यात आली होती. दरम्यान, जानकी यांना खूपच कमी कालावधीसाठी सत्तेतील हे महत्वाचे पद मिळाले होते.
केंद्र सरकारकडून २३ दिवसांनी सरकार बरखास्त
केंद्र सरकारने ३० जानेवारी १९८८ रोजी जानकी रामचंद्रन यांचे सरकार बरखास्त करून तमिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू केली होती. दरम्यान, कायद्यात कोणतीही तरतूद नसली तरी राजकीय नेत्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीकडे त्यांचे पद जाण्याचे प्रसंग इतिहासात अनेकदा घडले आहेत.

