अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जोरदार तयारी चालवली आहे. तळागाळातून मोर्चेबांधणी करण्यात येत असून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेतृत्वाकडून जनसंवादाचा कानमंत्र देण्यात आला. प्रत्येक घटकाशी अधिकाधिक जनसंवाद वाढवा व विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. योजनांचे लाभार्थी वाढवण्याची धडपड पक्ष कार्यकर्त्यांमार्फत सुरू आहे. यातून निवडणुकीपूर्व भाजपची मतपेरणी सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे. सप्टेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्रित लढताना भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपने सर्वाधिक २८ जागा लढवल्यावर केवळ नऊ जागा राखता आल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरली. राज्यात सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान महायुतीसह प्रामुख्याने भाजपपुढे उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षपातळीवर अंतर्गत आत्मचिंतन करून भाजपने नव्याने बांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षात आलेली मरगळ दूर करून विधानसभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले जात आहे. भाजपने राज्य व विभागस्तरावर संघटनात्मक आढावा घेतल्यानंतर आता जिल्हास्तरावर अधिवेशन घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीचा कानमंत्र दिला. आणखी वाचा-ओबीसींच्या महाअधिवेशनात फडणवीस यांचे कौतुक; वक्त्यांकडून विविध योजनांचा उल्लेख लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात कमी मतदान झाल्याचा भाजपला फटका बसला. सर्वसामान्य मतदार व समाजातील विविध घटकांपासून भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते दुरावल्याची जाणीव पक्ष नेतृत्वाला झाली. त्यातूनच विधानसभा निवडणुकीपूर्वी जनसंवाद वाढवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक बैठकीत पदाधिकाऱ्यांना जनसंवाद वाढवण्याच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत. भाजपच्या आढावा बैठका व अधिवेशनातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी, संघटनात्मक स्थिती, विधानसभानिहाय चित्र, नकारात्मक आणि सकारात्मक मुद्दे, चेतना जागृती आदींची माहिती घेतली जात आहे. आणखी वाचा-राजधानी दिल्लीचा कारभार नक्की कोणाच्या हातात? कोलमडलेल्या पायाभूत सुविधांसाठी कोण जबाबदार? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून विविध योजना जाहीर करण्याचा धडाका सत्ताधाऱ्यांकडून सुरू करण्यात आला. ‘लाडकी बहीण’, ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा, वयोश्री योजना आदी महत्त्वाकांक्षी शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा, यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हानिहाय सरकारी योजना पोहोचवण्याचे महत्त्व व उपाययोजना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितल्या गेल्या. पक्षाकडून विशिष्ट उद्दिष्ट आल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते जनसंवाद व शासकीय योजनांचे लाभार्थी शोधण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतपेरणीसाठी भाजपने आखलेली ही रणनीती कितपत यशस्वी होते, हे आगामी काळातच स्पष्ट होऊ शकेल. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्रितपणे धार्मिक, सामाजिकसह वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र.