राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : ‘भारत जोडो’ यात्रेबाबत रोज नवनवीन पैलू समोर येत आहेत. यात्रेत सहभागी किंवा यात्रेशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सबंध आलेले आता राहुल गांधीविषयी भरभरून बोलतात. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्थानिक लोकांमध्ये मिसळून त्यांचे दु:ख कसे जाणून घेतले, स्थानिक पदार्थांची आग्रहपूर्वक चव कशी घेतली, याचे किस्से सांगतात. नागपूरच्या तर्री पोह्याची वाशिममध्ये झालेली व्यवस्था असो की निरोपातील गोंधळामुळे राहुल गांधी व भारत यात्रींसाठी तयार झालेला नाश्ता बंदोबस्तावरील सुरक्षा यंत्रणेने संपवल्याने उडालेली गडबड असे अनेक किस्से पडद्यामागील यंत्रणेचे व्यवस्थापन करणारे नेते व त्यांच्या पथकाने अनुभवले.

राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. महाराष्ट्रात ७ ते १४ नोव्हेंबर या दरम्यान १४ दिवस होती. काँग्रेस नेत्यांनी यात्रेचे उत्तम नियोजन केल्याचे दिसून आले. नांदेड आणि शेगाव येथील जाहीर सभा तर विक्रमी ठरल्या. यात्रेतून आलेल्या अनुभवाचा ठेवा अनेक काँग्रेसजणांनी जपून ठेवला आहे.

हेही वाचा: मुलाच्या विवाह सोहळ्यात दिसली जयंत पाटील यांची राजकीय शक्ती; प्रतीक पाटील यांच्यासाठी तयारी सुरू

यात्रेत राहुल गांधी यांचा अधिक वेळ स्थानिक लोकांमध्ये मिसळून ती परिस्थिती जाणून घेण्यात जात असे. ज्या भागात पदयात्रा जाणार आहे तेथील परिस्थितीचा ते अभ्यास करत. त्यातून त्यांना स्थानिक परिस्थितीची माहिती मिळत होती. पदयात्रेदरम्यान सकाळी आणि सायंकाळी दोन ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबत. त्या भागातील प्रसिद्ध पदार्थाची न्याहारी घेत. कुठे समोसा तर कुठे भजी खात. महाराष्ट्रात त्यांनी वारंग्याची खिचडी, मुगाच्या भजीची न्याहारी केली. एक दिवस राहुल यांना नागपूरचे तर्री पोहे खाण्याची इच्छा झाली. त्यांच्यासाठी नागपूरहून खास तर्री पोहे बनवणारा माणूस वाशीमला आणून राहुलजींची ही इच्छा पूर्ण करण्यात आली. काही शेतकरी असे होते, ज्यांनी स्वतःहून स्वतःच्या चार एकर शेतातील तूर कापून यात्रेकरूंना जागा दिली. तर काही लोक असेही भेटले की ज्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दडपणाखाली जागा देण्यास नकार दिला. एक किस्सा तर असा आहे की, नांदेडमध्ये शौचालयाला जेथून टँकरने पाणीपुरवठा होणार होता, त्या रस्त्यात लोकांनी गाड्या लावल्यामुळे नियोजित स्थळी टँकर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे यात्रेकरूंची सकाळी अडचण झाली. त्यावर तोडगा काढावा लागला. या सर्व गोष्टींमध्ये पडद्यामागील व्यवस्थापनाची भूमिका बजावली सत्यजित तांबे व युवक कॉंग्रेसमधील त्यांच्या आजी-माजी ५० सहकाऱ्यांनी.

हेही वाचा: कुस्तीगीर परिषदेतही राजकीय आखाडा

भारत जोडो यात्रेत युवक कॉंग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडे ‘इंटरॅक्शन विथ स्मॉल ग्रुप्स’ आणि राहुल गांधींच्या संपूर्ण दिवसाच्या नियोजनाचे काम होते. म्हणजे राहणे, भोजन, न्याहारी काय असेल, पदयात्रेचा मार्ग ठरवून स्थानिक लोकांशी संवाद करणे अगदी शेगावच्या सभेपर्यंतच्या नियोजनाची जबाबदारी या पथकावर होती. बुलढाणा ते सांगली अशी डॉक्टर विश्वजीत कदम यांची दुष्काळी संवाद यात्रा आणि त्यानंतर झालेली गडचिरोली ते नंदुरबार अशी युवा क्रांती यात्रा या दोन यात्रांच्या नियोजनाचा आणि व्यवस्थापनाचा अनुभव तांबे यांच्या गाठिशी असल्याने भारत जोडो यात्रेतील पडद्यामागील व्यवस्थापनात त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. जिथे ३०० लोक झोपू शकतील अशा जागेत ५०० लोकांची व्यवस्था करावी लागली. हिंगोलीत पोलील अधिकाऱ्यांनी बैठकीत आम्हाला सांगितले की तुम्ही बंदोबस्तावरील पोलिसांची काही व्यवस्था करू नका, आम्ही आमची व्यवस्था करू.

हेही वाचा: रणजीतराजे भोसले : अभ्यासू नेता

पण त्या दिवशी यात्रेचा विश्रांतीचा दिवस होता. मी सकाळी अजून झोपलेला होतो. त्यावेळी राहुलजींच्या स्वीय सहायकाचा फोन आला तातडीने या. तिकडे यात्रेकरूंसाठी असलेला सर्व नाश्ता बंदोबस्तावरील पोलिसांनी संपवून टाकला होता. त्यांची वेगळी व्यवस्था असल्याचा निरोपच त्या बिचाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांच्या खात्यातून पोहोचला नव्हता व त्यातून हा घोळ झाला. मग पटकन तिकडे पुन्हा सर्व यंत्रणेशी संपर्क साधून पुन्हा नाश्ता तयार करावा लागला. या यात्रेमुळे आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणाच्या, व्यवस्थापनाच्या अनेक गोष्टी शिकता आल्या. भारत जोडो यात्रेसाठी पडद्यामागे कार्यरत असलेल्या प्रचंड अशा यंत्रणेसह काम करता आले ती व्यवस्था अनुभवता आली. ‘पॉलिटिकल इव्हेंट मॅनेजमेंट’चा खूप मोठा धडा यातून मिळाला, असे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Behind the scenes stories of bharat jodo yatra experiences of management systems rahul gandhi satyajit tambe congress nagpur print politics news tmb 01
First published on: 28-11-2022 at 14:27 IST