जमिनीच्या छोट्याश्या तुकड्यावरुन पश्चिम बंगालमध्ये रणकंदन; ममता बॅनर्जी विरुद्ध विद्यापीठ व्हाया केंद्र सरकार | Better Off Without Your Blessing ishwa Bharati University reply to Mamata Banerjee kvg 85 | Loksatta

दीड एकर जमीनवरुन रणकंदन; ममता बॅनर्जी विरुद्ध विद्यापीठ व्हाया केंद्र सरकार असा राजकीय वाद

विश्वभारती विद्यापीठाने सांगितले की, अमर्त्य सेन यांच्या वडीलांना १.२५ जमीन भाडेपट्टयाने दिली होती. तर अमर्त्य सेन यांचे म्हणणे आहे की ती जमीन १.३८ एकर एवढी आहे.

visva bharati university mamata banarjee Amartya Sen
अमर्त्य सेन आणि विद्यापीठाच्या वादात ममता बॅनर्जी यांचा भाजपावर निशाणा

कोलकातामधील विश्व-भारती विद्यापीठाने नोबेल पारितोषिक विजेते आणि जगविख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यावर बेकायदेशीररित्या जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. विद्यापीठ आणि सेन यांच्यामधील हा वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणावरुन अमर्त्य सेन यांची बाजू उचलून धरत विद्यापीठावर टीक केली होती. आता विद्यापीठानेही ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिले आहे. विश्व-भारती हे केंद्रीय विद्यापीठ आहे. “आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज नाही. कारण आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाची सवय आहे.”, असे उत्तर विद्यापीठाने दिले. या उत्तरावर विद्यापीठाच्या प्रवक्त्या महुआ बॅनर्जी यांची स्वाक्षरी आहे.

अमर्त्य सेन यांच्यावर विद्यापीठाने काय आरोप केले?

विद्यापीठाने अमर्त्य सेन यांच्यावर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच खवळल्या होत्या. त्यांनी अमर्त्य सेन यांच्या घरी जाऊन जमीने रेकॉर्ड सर्वांना दाखविले होते. ही जमीन अमर्त्य सेन यांचे वडील आशुतोष सेन यांना दिली असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. यावेळी ममता बॅनर्जी अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन अमर्त्य सेन यांच्या घरी पोहोचल्या होत्या. सेन यांना कागदपत्रे सुपुर्द केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विद्यापीठावर आणि केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, मी कागदपत्रांच्या आधारावर सत्य सांगत आहे. अमर्त्य सेन यांचा अपमान विद्यापीठाने केला आहे. भविष्यात भाजपाने अशी आगळीक करु नये, तसेच भाजपाच्या समर्थकांनीही असे काही करण्याचा प्रयत्न करु नये.

अमर्त्य सेन यांची विद्यापीठाने माफी मागावी

ममता बॅनर्जी असेही म्हणाल्या की, विश्वभारती विद्यापीठाने केवळ विद्यापीठ चालविण्यावर भर दिला पाहीजे. विद्यार्थ्यांचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी करु नये. यावेळी त्यांनी कुलपतींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. जे लोक म्हणतात आम्ही अमर्त्य सेन यांचा अवमान नाही केला, ते लोकच सेन यांच्या नोबेल पारितोषकावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. याच विषयावरुन विद्यापीठ परिसरात सुरु असलेल्या आंदोलनाला देखील ममता बॅनर्जी यांनी भेट दिली. त्यांना आश्वासित करताना त्या म्हणाल्या की, विद्यापीठ आणि केंद्र सरकार बळाचा वापर करुन विद्यार्थी आणि शिक्षकांचे भगवेकरण करु शकत नाही. मी या विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभी आहे, असेही त्या म्हणाल्या.

अमर्त्य सेन यांनी समोर येऊन बोलावे – भाजपा

विद्यापीठाचे कुलगुरू विद्युत चक्रवर्ती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही अमर्त्य सेन यांना पत्र लिहून आमची बाजू मांडली आहे. जमीनीच्या व्यवहारानुसार त्यांना १.२५ एकरची जमीन दिली गेली आहे. पण अमर्त्य सेन यांचा दावा आहे की, ती जमीन १.३८ एकर एवढी होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे म्हणणे आहे की, अमर्त्य सेन हे अनेक लोकांचे आदर्श आहेत. त्यांनी अशा वादात पडायला नको होते. जर त्यांच्या दाव्यात सत्यता आहे तर त्यांनी स्वतः समोर येऊन याबाबत बोलायला हवं.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 16:09 IST
Next Story
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या नव्या पक्षाकडे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा ओढा