एजाज हुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (बीआरएस) महाराष्ट्रात पाय रोवण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. नांदेडच्या पाठोपाठ पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात लक्ष केंद्रीत केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न चालविले आहेत. सोलापूरचे काँग्रेसचे वयोवृध्द माजी खासदार धर्मण्णा सादूल यांचा बीआरएस पक्षात यापूर्वी प्रवेश झाला आहे. त्यानंतर आता पंढरपूर भागातील भगीरथ भारत भालके यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा तरूण नेताही भारत राष्ट्र समितीच्या मार्गावर आहे.

गेल्या ९ मे रोजी पंढरपुरात विठ्ठल सहकारी कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बायो-सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळावा झाला होता. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विठ्ठल साखर कारखान्याच्या सत्ताकारणात याच वर्षी अभिजित पाटील यांनी बाजी मारून भगीरथ भालके यांना जोरदार धक्का दिला होता. पुन्हा याच अभिजित पाटील यांना शरद पवार यांनी जवळ केल्यामुळे भगीरथ भालके यांच्यासह पक्षाचे पंढरपुरातील दुसरे नेते, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हेसुध्दा दुखावले आहेत. कारण भालके व काळे यांचे अभिजित पाटील हे समान शत्रू ठरले आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांना विश्वासात न घेता अभिजित पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला असताना दुसरीकडे पक्षाच्या स्तरावर भालके यांची होईल तितकी कोंडी करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भगीरथ भालके यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. तेव्हा भालके हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की काय, याची पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. परंतु आता भालके यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी थेट संपर्क साधून हैदराबादमध्ये भेटीसाठी बोलावले असून त्यासाठी तेलंगणातून पाठविण्यात आलेल्या विशेष विमानाने भगीरथ भालके हे बीआरएसचे प्रदेश समन्वयक शंकर आण्णा धोंडगे यांच्यासमवेत आपल्या पत्नी प्रणिता, आई जयश्री, बंधू व्यंकट आणि मुलांसह हैदराबादला गेले. तेथे चंद्रशेखर राव यांची त्यांची भेट झाली. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यात शेतक-यांसाठी केलेल्या भरीव कार्याची माहिती घेऊन भगीरथ भालके भारावले. या भेटीत त्यांना बीआरएस पक्ष प्रवेशाबाबत आकृष्ट करण्यात आले.चंद्रशेखर राव यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे भालके प्रभावित झाले आहेत. कारण पंढरपूरच्या राजकारणात स्वतःची ताकद टिकवून ठेवण्यासाठी भालके हे निर्णायक भूमिका घेण्याच्या मानसिकेत असताना त्यांच्यासमोर बीआरएस पक्षाचा पर्याय उभा राहिला आहे.

आणखी वाचा-असा एक पक्ष दाखवा ज्याचे भाजपाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नाहीत; विरोधकांच्या एकजुटीवर माजी पंतप्रधान देवेगौडांचे परखड भाष्य

भालके यांनी पंढरपुरातील आपल्या कार्यकर्त्यांना कानोसा घेतला असून सर्वांनी त्यांना निर्णयाचे सर्वाधिकार दिले आहेत. तरीही भालके हे हैदराबादमध्ये चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून पंढरपुरात परतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत. भालके यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीत अडगळीत पडलेले साखर सम्राट कल्याणराव काळे हे सध्या त्यांच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुंतले आहेत. नंतर तेसुध्दा राजकीय पर्याय म्हणून बीआरएस पक्षाचा मार्ग स्वीकारतात का, याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे. काळे यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

कोण भगीरथ भालके?

पंढरपूरच्या राजकारणात जुनी पिढी अस्तंगत झाल्यानंतर नवी पिढी कार्यरत आहे. यात कोणाला अपयश आले तर कोण आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करीत आहे. पंढरपूरमधून विधानसभेवर सलग तीनवेळा वेगवेगळ्या तीन पक्षांच्या चिन्हांवर प्रतिनिधित्व केलेले दिवंगत नेते भारत तुकाराम भालके यांचे भगीरथ भालके हे चिरंजीव. २००९ सालच्या गाजलेल्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांनी स्वाभिमानी पक्षाच्या तिकिटावर तत्कालीन राष्ट्रवादीचे बालाढ्य नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा सुमारे ३४ हजार मतांच्या फरकाने धक्कादायक पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीतूनच भालके यांना रसद मिळाल्याची चर्चा होती. त्यानंतर २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके हे काँग्रेसकडून उभे राहिले आणि पंढरपूरचे दिवंगत दिग्गज नेते सुधाकर परिचारक (स्वाभिमानी पक्ष) यांना सुमारे नऊ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यानंतर तिस-यांदा २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भालके यांनी पुन्हा पक्ष बदलला आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहून दिवंगत नेते सुधाकर परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक (भाजप) यांना मोदी लाट असतानाही पराभूत केले होते.

सलग तीनवेळा आमदारकी सांभाळताना भारत भालके यांनी ५० वर्षांच्या जुन्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील वर्चस्व कायम राखले होते. पंढरपूरच्या राजकारणातही राष्ट्रवादीतून ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक हे दुरावले असता भारत भालके यांचाच राष्ट्रवादीला मोठा आधार होता. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला. तद्पश्चात २०२१ मध्ये झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असता भाजपकडून मंगळवेढ्याचे बडे टोल सम्राट, बांधकाम व्यावसायिक समाधान अवताडे यांनी परिचारक यांच्या मदतीने भालके यांना अडीच हजार मतांच्या फरकाने पराभूत केले.

आणखी वाचा-रावसाहेब दानवेंनी आतापासूनच निवडणुकीसाठी कंबर कसली

याच दरम्यान, पंढरपुरात अभिजित पाटील यांचे नेतृत्व उदयास आले. त्यांनी एका पाठोपाठ एक सहा साखर कारखाने ताब्यात घेतले. भालके यांच्या ताब्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांनी आव्हान दिले आणि भालके यांची सत्ता सहजपणे खालसा केली. अभिजित पाटील यांनी पूर्वीच्या वाळू व्यवसायातून साखर उद्योगात आल्यानंतर राजकारणापासून दूर राहणे पसंत केले होते. सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादीने त्यांना पक्ष प्रवेशाचे आवतण दिले होते. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाच्या धाडी पडल्या असता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी थेट पंढरपुरात येऊन अभिजित पाटील यांना भाजप प्रवेशासठी गोंजारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी विधानसभेची जागा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे हे राष्ट्रवादीत असंतुष्ट म्हणून ओळखले जातात.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagirath bhalke meet chandrasekhar rao print politics news mrj
Show comments