महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारत जोडो’ यात्रा ही राजकीय यात्रा नसल्याचे काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश सातत्याने सांगत असले तरी, यात्रेमध्ये दररोज राहुल गांधींच्या सकाळच्या सत्रात तीन-चार तास होणाऱ्या भेटीगाठी म्हणजे अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी असल्याचे दिसत आहे.

सकाळी साडेसहा-सात वाजता सुरू होणारी पदयात्रा साडेनऊ-दहा वाजता संपते. सकाळच्या सत्रातील तीन तासांमध्ये १२-१४ किमीचे अंतर कापले जाते. या सत्रात राहुल गांधी चालता चालता काँग्रेस कार्यकर्त्यांना, स्थानिक नागरिकांना, व्यावसायिकांना, काँग्रेसच्या सहानुभुतीदारांना भेटत असतात. या सत्रात राहुल गांधी न थांबता लोकांशी संवाद साधत असतात. त्यांच्या चालण्याच्या वेगाशी जुळवून घेऊन लोकांना राहुल यांना भेटावे लागते. ही राहुलभेट अगदी काही मिनिटांची असली तरी, काँग्रेसच्या ‘सर्वोच्च’ नेत्याची भेट होणे हेच महत्त्वाचे ठरते! सकाळचे हे सत्र संपले की, राहुल गांधी दररोज संस्था-संघटना, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विविध समाजघटकांना वेळ देतात.

हेही वाचा : हिमाचल प्रदेशवर पाणी सोडत ‘आप’ने लक्ष केंद्रीत केले गुजरातवर

हे चर्चासत्र अत्यंत चाणाक्षपणे आखलेले आहे. ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवारी कर्नाटकमधून आंध्र प्रदेशच्या सीमेवरील अतूरध्ये पोहोचली. सकाळी पदयात्रा झाल्यानंतर, राहुल गांधींनी आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे सल्लागार व राज्यसभेचे माजी खासदार केव्हीपी रामचंद्र राव यांच्याशी चर्चा केली. काही शेतकरी गट, वाल्मिकी समाजातील नेते अशा अनेकांशी चर्चा केली. केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय प्राधान्याने घेतला जाईल, असे आश्वासन राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिल्याचे समजते. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर, लोक काँग्रेसवर कमालीचे नाराज झाले होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला तर, कदाचित लोक पुन्हा काँग्रेसला मतदान करू शकतील, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : ‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधींचा फिटनेस चर्चेच्या केंद्रस्थानी

खरेतर आंध्र प्रदेशसाठी हा संवेदनशील राजकीय मुद्दा आहे. आंध्र प्रदेशमध्ये अमरावतीमध्ये शेतकरी आंदोलन करत असून तिथे शेतकऱ्यांची पदयात्रा काढण्याचे नियोजन करण्याचाही विचार केला जाऊ शकतो, असेही राहुल गांधी म्हणाल्याचे समजते. नवी राजधानी उभी करण्यासाठी अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या पण, राजधानी निर्माण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाही कळीचा मुद्दा ठरला आहे. आंध्र प्रदेशसाठी हे सगळेच राजकीय मुद्दे ठरतात, त्यावर राहुल गांधींनी गंभीर चर्चा करून काँग्रेससाठी राजकीय पेरणी केल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

कन्याकुमारीपासून ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रवास प्रत्यक्ष पाहणारे आंध्र प्रदेशमधील काही काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची राजकीय ताकद नाही. आमदार-खासदार नाही, प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाचे राज्याकडे लक्ष नाही. त्यामुळे आंध्र प्रदेशमधील ‘भारत जोडो’ यात्रेला गर्दी जमवता आलेली नाही. कर्नाटक वा तामिळनाडूमध्ये दहा किमीपर्यंत लोकांचा, कार्यकर्त्यांचा, नेत्यांच्या गाड्यांचा ताफा पाहायला मिळाला होता. अतूरमध्ये तुलनेत गर्दी कमी होती, आंध्र प्रदेशमधील यात्रेच्या आयोजनावर राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केल्याचेही सांगितले जाते. आंध्र प्रदेशमध्ये फक्त चार दिवस यात्रा असून काँग्रेसची राजकीय ताकद पाहता अपेक्षित गर्दी जमल्याचे काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jodo yatra rahul gandhi jairam ramesh congress farmers protest amravati andhra pradesh print politics news tmb 01
First published on: 19-10-2022 at 10:28 IST