भिवंडी लोकसभा मतदार संघातून दोनदा मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आणि केंद्रात राज्यमंत्री राहिलेले कपिल पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाची धुळ चारणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती ते खासदारकीपर्यंतचा प्रवास लक्षवेधी ठरला आहे. त्यांचा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकदा पराभव झाला पण, पराभवाची कारणे शोधून त्यांनी अखेर मतदार संघातून विजय संपादन केला.

हेही वाचा : “संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”; RSS चा भाजपाला घरचा आहेर

शिवसेना पक्षातून सुरेश म्हात्रे यांनी राजकीय प्रवासाला सुरूवात केली. १९९६ साली शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदी त्यांची नियुक्ती झाली. २००० साली ते शिवसेनेचे विभागप्रमुख झाले आणि २००४ साली भिवंडी तालुका उपाध्यक्ष झाले. २००९ मध्ये त्यांनी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०११ मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून २०१४ सालची लोकसभा निवडणुक लढविली होती. या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. २०१५ साली पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख पदाची सुत्रे सांभाळत असतानाच त्यांनी जिल्हा परिषद निवडणुक लढवून विजयी झाले. जिल्हा परिषद सदस्य, गटनेते, बांधकाम सभापती अशी पदे त्यांनी भुषविली. यानंतर सेनेला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर शिवसेना आणि पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष प्रवेश असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. सातत्याने पक्ष बदलणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. निवडणुकीत तसा प्रचारही झाला. परंतु कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणुक लढविण्यासाठीच हे पक्ष बदलल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. कपील पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून सुरेश म्हात्रे ओळखले जातात आणि पाटील यांचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करायचा असा त्यांनी चंग बांधला होता. त्यासाठी त्यांनी रणनिती आखून नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुक लढवून विजय संपादन केला.