पुणे : शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव, काँग्रेसचे भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र पक्षाअंतर्गत त्यांची नाराजी, सलग तीन वेळा आमदार असूनही जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यामुळे पदे मिळविण्यात येत असलेल्या अडचणी याचा विचार करता आमदार थोपटे केवळ दाखविण्यापुरतेच आघाडीबरोबर असल्याची चर्चा काँग्रेस आणि महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबतची संभ्रमावस्था कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. या निमित्ताने वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार यांनी शरद पवार विरोधक अशी ओळख असलेल्या माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शनिवारी भेट घेतली होती. त्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी थोपटे कुटुंबियांची भेट घेत आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर थोपटे कुटुंबियांची राजकीय भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आमदार थोपटे रविवारी सुप्रिया सुळे यांच्या समवेत महाविकास आघाडीच्या मेळाव्याला उपस्थित असले आणि आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी कार्यकर्त्यांमधील मात्र संभ्रमावस्था कायम आहे. त्यामुळे आमदार थोपटे नक्की कोणासोबत अशी कुजबूज सुरू झाली आहे.

हेही वाचा – नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध सारे

थोपटे गेल्या पंधरा वर्षांपासून भोरचे आमदार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघातील मतदान सुप्रिया सुळे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुळे यांना भोरमधून अपेक्षित मतदान झाले नव्हते. आघाडी असूनही गेल्या काही महिन्यांपर्यंत खासदार सुळे आणि थोपटे कधीही एकत्र आले नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. त्याउलट एकमेकांवर टीका करत विकासकामांची वेगवेगळी उद्घाटने या दोघांनी केली आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अपेक्षित काम केले नाही, असा थेट आरोपही थोपटे यांच्यावर करण्यात आला होता. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड असो किंवा मंत्रीपद असो, प्रत्येक वेळी आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवार असतानाही त्यांच्या नावाला विरोध झाला होता. जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यामुळे पद मिळत नाहीत, असा आरोप करत थोपटे यांनी त्यामागे शरद पवार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

हेही वाचा – औरंगाबादवर शिंदे गटाचाही दावा

पक्षांअंतर्गतही थोपटे नाराज आहेत. त्यांना अपेक्षित न्याय देता आला नाही, अशी कबुली काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे दिली होती. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. तशी चर्चा सातत्याने होत आहे. या चर्चेचे थोपटे खंडन करत आहेत. मात्र पक्षांतर्गत डावलले जात असल्यामु़ळे ते अस्वस्थ आहेत. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने थोपटे यांचाही प्रवेश होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर थोपटे वेगळा विचार करू शकतात, असे कार्यकर्ते सांगत आहेत. थोपटे यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत अद्यापही संभ्रम ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाची स्थिती आहे. दरम्यान, काँग्रेसमध्येच असून महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार थोपटे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. तरीही आमदार थोपटे नक्की कोणासोबत ? अशी विचारणा होत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhor assembly constituency mla sangram thopte with whom exactly print politics news ssb
First published on: 04-03-2024 at 15:42 IST