पुणे : पुणे जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापती या पदांसाठी निवडणुकांची प्रक्रिया जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील भोर पंचायत समितीच्या निवडणुकीत आठ सदस्यांपैकी भाजप आणि अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला प्रत्येकी चार जागा मिळाल्या असल्याने अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे आमदार शंकर मांडेकर आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. समान संख्याबळ असल्याने ही पंचायत समिती ताब्यात ठेवण्यासाठी महायुतीतील भाजप आणि अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’समोर राजकीय पेच निर्माण झाला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत मांडेकर यांनी थोपटे यांचा पराभव केल्यानंतर थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. थोपटे यांच्यामुळे पहिल्यांदाच भोर पंचायत समितीमध्ये भाजपचे आठपैकी चार सदस्य निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही चार जागा मिळाल्या असल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. या पंचायत समितीवर सत्ता मिळवण्यासाठी मांडेकर आणि थोपटे दोघांनी राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे.
अडीच वर्षांसाठी सत्तेचा पर्याय
दोन्ही पक्षांनी अडीच वर्षासाठी पदांचे वाटप करून घेण्याचा पर्याय असला तरी थोपटे आणि मांडेकर यांच्यातील राजकीय संघर्ष वाढला आहे. भाजपलाही भोर विधानसभा मतदारसंघात ताकद वाढवायची असल्याने या पर्यायाचा अवलंब दोन्ही पक्षांकडून केला जाणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
चिट्ठी काढून निर्णयाची शक्यता
सदस्य संख्या समान असल्यामुळे चिट्ठी काढून सभापती आणि उपसभापती निवडण्याचा पर्याय आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून हा पर्याय निवडला जाण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात आले.
जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व
पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदांसाठी ९ मार्च रोजी निवडणूक होणार असून, पुणे जिल्ह्यात १३ पैकी ८ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वर्चस्व आहे. १३ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सर्वाधिक ९० जागा, भाजपचे २८, शिवसेना (ठाकरे) १२, शिवसेना (शिंदे) १०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ४ आणि दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत. आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर, वेल्हे, बारामती आणि इंदापूर पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. जुन्नरमध्ये शिवसेना (शिंदे) , खेड पंचायत समितीत शिवसेना (ठाकरे) या पक्षांचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. दौंडमध्ये १४ पैकी ८ भाजपचे सदस्य विजयी झाले आहेत. भोरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रत्येकी चार अशी समान सदस्य संख्या असल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे.
