लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे आयोजन करून वातावरणनिर्मितीवर भाजपने भर दिला आहे. यानुसार येत्या रविवारी रोजी पंतप्रधान मोदी जळगावला जाणार असून तेथे ‘लखपती दीदी’ योजनेच्या समारंभास ते उपस्थित राहणार आहेत. तर ३० तारखेला डहाणूजवळील वाढवण बंदराचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
वाढवण बंदरासंदर्भात आवश्यक मंजुऱ्या मिळाल्यानंतर भूमिपूजन फेब्रुवारीत करण्याचे नियोजित होते. मात्र त्यावेळी ते होऊ शकले नाही आणि नंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ते झाले नाही. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले आहे. मोदींच्या दौऱ्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी शासकीय आणि भाजपच्या यंत्रणेकडून या दौऱ्यांची तयारी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधानांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे ज्येष्ठ नेते आणि काही केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.