महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांच्यापुढे तुम्ही तगडे आव्हान उभे करु शकणार का ?

– पियूष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने ‘हाय प्रोफाईल ’ असून भाजप पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने ’ पॅराशूट ’ उमेदवार आहेत. या मतदारसंघात गेल्या १० वर्षात त्यांचा कधीही संपर्क नसून येथील जनतेचे प्रश्नही त्यांना माहीत नाहीत. मी जन्मापासून बोरिवलीत रहात असल्याने स्थानिक उमेदवार असून १९९२ पासून काँग्रेसचे काम करीत आहे. गोयल यांचा येथील जनतेशी थेट संपर्क नसल्याने ते निवडून आले, तर आपले प्रश्न सोडवितील का, अशी शंका नागरिकांना आहे. मी गेली अनेक वर्षे मतदारसंघात कार्यरत असून करोना काळातही अनेकांना मदत केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख म्हणून या काळात जे काम केले, त्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) कौतुक केले. मात्र त्यावेळी रेल्वेमंत्री असलेल्या गोयल यांनी मुंबईतून आपल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या कामगार व मजुरांना विशेष रेल्वेगाड्या लवकर व पुरेशा उपलब्ध करुन दिल्या नव्हत्या. त्यामुळे वांद्रे टर्मिनसवरही चेंगराचेंगरीचा प्रकार घडला होता. गोयल हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवू शकणार नाहीत. मला सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, झोपडपट्टीवासिय, व्यापारी, फेरीवाले आदींसह सर्व समाजघटकांचा पाठिंबा मिळत आहे.

हेही वाचा >>>राम मंदिरानंतर ‘कृष्ण मंदिरा’साठी भाजपाला हव्या चारशेपार जागा?

उत्तर मुंबईतील प्रश्न कोणते व ते कसे सोडविता येतील ?

– उत्तर मुंबईत जुन्या इमारती व घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न बिकट असून दामूपाडा, केतकीपाडासह काही भाग वनक्षेत्रात येतो. हा भाग वनक्षेत्रातून वगळण्यासाठी तत्कालीन लोकशाही आघाडीने प्रस्ताव तयार केला होता. मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. काही भाग संरक्षण खात्याच्या पुरवठा विभागाच्या ५०० मीटर परिसरात येतो. त्यामुळे या पट्ट्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र व मंजुरी मिळत नाही आणि नागरिकांना मोडकळीस आलेल्या घरांमध्ये रहावे लागत आहे. त्याचबरोबर काही भाग हवाई क्षेत्रात फनेल झोनमध्ये येतो आणि इमारतींच्या उंचीवर मर्यादा आहेत. परिणामी पुनर्विकास करताना मोठ्या इमारती उभा राहू शकत नाहीत. दहिसर चेकनाका परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न असून तो ठाण्याच्या दिशेने पुढे नेण्याची मागणी दीर्घकाळ प्रलंबित आहे. रेल्वेस्थानकाच्या विकासाच्या घोषणा झाल्या, पण बोरीवली, कांदिवली, मालाड, दहिसर या रेल्वेस्थानकांमध्ये प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गोराई परिसरात कांदळवने तोडून भराव घालून झोपडपट्ट्या उभ्या रहात आहेत.

हेही वाचा >>>‘मर्द को भी दर्द होता है!’ असे म्हणत एक अख्खा पक्षच उतरलाय निवडणुकीच्या रिंगणात

सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयांची अवस्था कशी आहे ?

– उत्तर मुंबईमध्ये महापालिका किंवा राज्य सरकारचे अतिविशेषोपचार (सुपरस्पेशालिटी) दर्जाचे मोठे रुग्णालय नाही. शताब्दी, भगवती या रुग्णालयांचा विस्तार करुन तेथे मोठ्या प्रमाणावर निधी देऊन अनेक सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. मी निवडून आल्यावर त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

विजयाची शक्यता वाटते का ?

– भाजपने शिवसेना फोडल्याचा राग कार्यकर्ते व जनतेमध्ये असून ठाकरे यांचे कार्यकर्ते मतदारसंघात जोमाने माझे काम करीत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन समाजाची सुमारे दोन लाख मते असून काँग्रेस, ठाकरे गट यांच्यासह सर्व समाजघटक माझ्यासोबत आहेत. मला जरी उशिरा उमेदवारी जाहीर झाली असली तरी मी नियमितच या परिसरात जनतेमध्ये मिसळून कार्यरत असल्याने प्रचारात कोणतीही अडचण नसून मी विजयी होईन, असा विश्वास आहे. जनता माझ्यावर विश्वास ठेवून या निवडणुकीत संधी देईल व मी ‘ जायंट किलर ’ होईन, असे वाटते.

(मुलाखत : उमाकांत देशपांडे )