BJP Ex MLA Name For Aland Vote Chori Case : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजधानी दिल्लीतील पत्रकार परिषदेतून भाजपावर मतचोरीचे गंभीर आरोप केले होते. कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघात मतचोरी झाल्याचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले होते. त्यानंतर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना (SIT) केली होती. शुक्रवारी एसआयटीने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात भाजपाच्या माजी आमदारासह सात जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे मतचोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याविषयीचा हा आढावा…
कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीआधी आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधून तब्बल ५,९९४ मतदारांची नावे बेकायदा हटविण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. यादरम्यान मतदारांची नावे वगळण्यासाठी डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान एकूण ६,०१८ अर्ज करण्यात आले आणि त्यासाठी सुमारे ४.८ लाख रुपये इतका खर्च करण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते.
मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्जामागे ८० रुपये
मतदारांची नावे वगळण्यासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला ८० रुपये मोबदला दिला जात असल्याची बाब तपासातून समोर आली होती. या प्रकरणी एसआयटीने भाजपाचे नेते सुबोध गुट्टेदार यांच्या संबंधित मालमत्तांवर छापे टाकले होते. तपासानंतर कलबुर्गी जिल्हा मुख्यालयातील एका डेटा सेंटरमधून हे सर्व अर्ज पाठविले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एसआयटीने आलंदचे चार वेळा आमदार राहिलेले सुभाष गुट्टेदार, त्यांचा मुलगा हर्षानंद गुट्टेदार, त्यांचे वैयक्तिक सचिव टिप्परुद्र यांच्यासह सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
एसआयटीकडे २२ हजार पानांचे पुरावे
विशेष तपास पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात फसवणूक, तोतयागिरी, गुन्हेगारी कट आणि विश्वासघात यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. या गुन्ह्यांसाठी १० वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. बेंगळुरू येथील प्रथम अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर करण्यात आलेल्या या आरोपपत्रासोबत सुमारे २२ हजार पानांचे पुरावे जोडण्यात आले आहेत. त्यापैकी जवळपास १५ हजार पाने निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या डेटाची आहेत. त्यामध्ये मतदारांची नावे वगळण्यासाठी आयोगाच्या ऑनलाइन सेवांमध्ये प्रवेश करताना वापरण्यात आलेल्या आयपी पत्त्यांची माहिती समाविष्ट आहे.
मतदारांची नावे कशी हटविण्यात आली?
या प्रकरणात सर्वप्रथम अटक झालेल्या बापी आद्या नामक आरोपीने ‘OTPbazaar’ नावाची वेबसाइट चालवली होती. ही वेबसाइट अमेरिकेतील ‘SMSAlert’ नावाच्या साइटशी जोडलेली असून, त्याद्वारे कलबुर्गी डेटा सेंटरला OTP बायपास सेवा पुरवली जात असल्याचा आरोप आहे. याच वेबसाईटमार्फत निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन सेवांमध्ये प्रवेश करण्यात आल्याचा एसआयटीला संशय आहे. या प्रकरणात आरोपी बापी आद्या याला मंगळवारी जामीन मंजूर झाला आहे. दुसरीकडे माजी आमदार सुभाष गुत्तेदार, त्यांचा मुलगा हर्षानंद आणि स्वीय सहायक तिप्परुद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
प्रकरण कसे उघडकीस आले होते?
दरम्यान, फेब्रुवारी २०२३ मध्ये आलंदमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना मतदारांची नावे हटविण्यासाठी बेकायदा अर्ज केले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आग्रह धरला होता. विधानसभा निवडणुकांच्या काही दिवस आधी कलबुर्गीचे सहायक आयुक्त यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या ‘मतचोरी’ विषयावरील पत्रकार परिषदेनंतर तपासाला गती देण्यात आली होती.
हेही वाचा : भाजपासमोर संकटांचा डोंगर; साधूंचे मताधिक्य गमावण्याची वेळ? उत्तर प्रदेशात काय घडतंय?
७५ भ्रमणध्वनी क्रमांक बनावट
निवडणूक आयोग पोर्टलवर अर्ज करण्यासाठी ७५ वेगवेगळे भ्रमणध्वनी क्रमांक वापरण्यात आले होते. हे नंबर पोल्ट्री फार्म कामगारांपासून ते पोलिसांपर्यंत अनेकांचे होते. अर्जातील मतदारांचे नाव व पत्ता चुकीचा दाखवला गेला होता आणि बऱ्याच मतदारांना त्यांच्या नावावर अर्ज केल्याचे माहितीही नव्हते. आलंदमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत फक्त २४ मतदार हे प्रत्यक्षात मतदार यादीतून हटवण्यायोग्य असल्याचे आढळले, उर्वरित ५,९९४ अर्ज फसवणूक करणारे होते, असेही तपासातून समोर आले आहे.
माजी आमदाराचे पाय खोलात?
आलंद मतदारसंघातून काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी दोनदा निवडून आलेल्या सुभाष गुट्टेदार यांनी बेकायदा मतदार वगळण्याच्या प्रयत्नाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या तिकिटावरून आलंदमधून निवडणूक लढवली होती; परंतु काँग्रेसचे उमेदवार बी. आर. पाटील यांनी त्यांचा १०,३४८ मतांनी पराभव केला होता. या मतचोरी प्रकरणात विशेष तपास पथकाने आरोपपत्र दाखल केल्यानंतर गुट्टेदार यांचे पाय खोलात गेले असून, भाजपाची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.
