Muslim voters support NDA in Bihar Election 2025 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सत्ताधारी आघाडीने चांगली कामगिरी करीत २४३ पैकी १८० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठा फटका बसला आहे. राज्यात सत्ताविरोधी लाट असूनही विरोधकांना पन्नाशीचा आकडा गाठतानाही दमछाक होताना दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे, मुस्लीम बहुल भागातही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. नेमकी काय आहेत यामागची कारणे? त्याविषयीचा हा आढावा…
मुस्लीम मतदारांचा एनडीएला पाठिंबा?
बिहारच्या एकूण लोकसंख्येत मुस्लीम समुदायाचा १७.७ टक्के इतका वाटा आहे. राज्यातील सीमांचल भागातील पूर्णिया, सहरसा, किशनगंज, मधेपुरा, कटिहार, अररिया या जिल्ह्यांमध्ये मुस्लीम मतदारांचा मोठा प्रभाव आहे. या भागात विधानसभेच्या एकूण २४ जागा असल्याने तिथे नेमक्या कोणत्या पक्षाला यश मिळणार याचीच उत्सुकता अनेकांना होती. प्राथामिक कलांनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी या प्रदेशातील २४ पैकी तब्बल १७ जागांवर आघाडी मिळवली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला मुस्लीम मतदारांनी मोठा पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
मुस्लिमांनी महाआघाडीकडे फिरवली पाठ?
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जेडीयूला या भागात तब्बल आठ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याशिवाय, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षालाही मुस्लीम मतदार असलेल्या सहा मतदारसंघांमध्ये मोठं यश मिळताना दिसून येत आहे. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला या भागात मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, सीमांचल भागातील मुस्लीम मतदार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे पाठ फिरवत होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे. या भागात असदुद्दीने ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम पक्षाचे पाच उमेदवार आघाडीवर आहेत. प्रशांत किशोर यांच्या एकाही उमेदवाराला या भागातून आघाडी मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा : Maithili Thakur : विजयी आघाडी घेताच मैथिली ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
गेल्या निवडणुकीत काय घडले होते?
२०२० च्या निवडणुकीत राज्यात एकूण १९ मुस्लीम उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते, त्यामध्ये सर्वाधिक ८ आमदार हे राष्ट्रीय जनता दल पक्षाचे होते. त्यापाठोपाठ एआयएमआयएमचे पाच, काँग्रेसचे चार, तर बहुजन समाज पार्टी आणि सीपीआयच्या प्रत्येकी एक आमदाराचा समावेश होता. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने ११ मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते; पण त्यातील एकही उमेदवार निवडून आला नाही. अशा प्रकारे मावळत्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व ७.८१% होते.
२०१५ मध्ये काय घडले होते?
२०१५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण २४ मुस्लीम आमदार निवडून आले होते. त्यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाचे १२, काँग्रेसचे सहा आणि जेडीयूचे पाच आमदार होते; तर सीपीआय लिबरेशन पक्षाचा एक आमदार निवडून आला होता. या निवडणुकीत निवडून आलेल्या मुस्लीम आमदारांची टक्केवारी ९.८७ इतकी होती. २०१० मध्ये राज्यात १९ मुस्लीम उमेदवार निवडून आले होते. त्यामध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाचे सात, राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सहा, काँग्रेसचे तीन, लोक जनशक्ती पक्षाचे दोन आणि भाजपाच्या एका आमदाराचा समावेश होता.
भाजपाचा एकमेव मुस्लीम उमेदवार विजयी
भाजपाचे एकमेव मुस्लीम आमदार सबा झफर यांनी अमौर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अब्दुल जलील मस्तान यांचा पराभव केला होता. मात्र, २०१५ मध्ये मस्तान यांनी झफर यांचा पराभव करून हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. फेब्रुवारी २००० मध्ये झालेल्या अखंड बिहारच्या शेवटच्या विधानसभा निवडणुकीत ३२४ सदस्यांच्या विधानसभेत ३० मुस्लीम आमदार निवडून आले होते. त्यामध्ये सर्वाधिक १७ आमदार राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. इतर आमदारांमध्ये काँग्रेसचे सहा, समता पक्षाचे दोन, सीपीआयचे दोन, बहुजन समाज पार्टी आणि सीपीआय लिबरेशनच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश होता.
हेही वाचा : बिहारमध्ये NDA ची विजयाकडे वाटचाल; ‘हे’ ५ निर्णय ठरले गेमचेंजर
महाआघाडीला नेमका कशाचा फटका?
दरम्यान यंदाच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी मुस्लीम बहुल भागात आक्रमक प्रचार केला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी तेथील मतदारांना सरकारी नोकरीदेखील देण्याचे आश्वासन दिले होते. दुसरीकडे जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी या भागावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी मुस्लीम मतदारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या होत्या. याच गोष्टीचा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. तेजस्वी यादव यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनांकडे मुस्लीम मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
