Maharashtra Top Political News Today : महापालिका निवडणुकांच्या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना ठाकरेंच्या दोन प्रमुख शिलेदारांनी शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला… खासदार श्रीरंग बारणे यांचे सुपुत्र विश्वजीत बारणे यांच्याकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवडमधील भाजपा पुरस्कृत उमेदवारांनी केला… मुंबई महापालिकेची निवडणूक ही मराठी माणसांच्या नव्हे तर ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला… भाजपाचे राज्यात जन्माला घातलेली विषवल्ली जागरूक जनतेने ओळखून कापून टाकावी, असे आवाहन महाराष्ट्रा काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले… नंदुरबार शहरातील एका बड्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरुन गावगुंडांनी माझ्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याचा आरोप शिंदेसेनेच्या नेत्याने केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
मतदानाआधी ठाकरेंना मोठा धक्का
महापालिका निवडणुकांच्या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. गोरेगाव येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी आपल्या पत्नीसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिंदे यांनी दोन्ही माजी नगरसेवकांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. दिलीप शिंदे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. आगामी निवडणुकीत पक्षाला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खासदार पुत्रावर पैसे वाटपाचा आरोप
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावताच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २४ मध्ये पैशांच्या कथित वाटपावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रभागात शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे सुपुत्र विश्वजीत बारणे यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप भाजपा पुरस्कृत उमेदवार गणेश गुजर आणि करिश्मा बारणे यांनी केला आहे. आमच्या समर्थकांवर दबाव टाकला जात असून थेरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप सुरू असल्याचे भाजपा पुरस्कृत उमेदवारांचे म्हणणे आहे. या प्रकरणी बाजू जाणून घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आणखी वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दणका; पालकांचा सांभाळ न केल्यास… तेलंगणा सरकारचा निर्णय काय?
एकनाथ शिंदेंचा ठाकरें बंधूंना टोला
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला. मुंबईला गुजरातशी जोडण्याच्या कथित प्रयत्नावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. मराठी माणसांसाठी ही निवडणूक अस्मितेची असल्याचे ठाकरे बंधूंनी म्हटले. त्यांच्या या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही मराठी माणसांच्या नव्हे तर ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीतून लगावला आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला असून त्यावरच लक्ष्य केंद्रित केले होते. समोरच्या लोकांकडे मांडण्यासाठी काही मुद्दे नसल्याने त्यांनी जुने मुद्दे पुन्हा उकरून काढले असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचे टीकास्त्र
भाजपाचे राज्यात जन्माला घातलेली विषवल्ली जागरूक जनतेने ओळखून ती कापून टाकावी, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. त्यांनी तयार केलेल्या कूनीतीची फळे आज महाराष्ट्राला भोगावी लागत असल्याची टीकाही सपकाळ यांनी केली. यावेळी त्यांनी नांदेड महापालिकेतील प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी तलवारीने केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा उल्लेख केला. सोलापूरसह अकोट आणि खालापूरमध्ये निवडणुकीच्या काळात हत्या झाल्या. अनेक उमेदवारांना धमक्या देण्यात आल्या, त्याचीच प्रचिती नांदेडमध्येही आल्याचे सपकाळ म्हणाले.
शिंदे गटातील नेत्याचा गंभीर आरोप
नंदुरबार शहरातील एका बड्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरुन गावगुंडांनी माझ्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याचा आरोप शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला. या गुन्ह्यातील संशयित आधीच हत्येच्या गुन्ह्यात जामीनावर असून ते संघटित गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही चौधरी यांनी केली. नंदुरबार नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडीनंतर निघालेल्या मिरवणुकीत झालेल्या वादातून शिरीष चौधरी यांच्या घरावर रात्री काही तरुणांनी सशस्त्र हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी त्यांची गाडीही जाळण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकरणात आतापर्यत दोन्ही बाजूने दोन-दोन असे चार गुन्हे दाखल झाले आहेत. या हल्ल्याप्रकरणी पाच संसयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
