आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : नाशिकमध्ये शिंदे गटाला उतरती कळा लागल्याची चर्चा सुरू असून येवल्यातील सात नगरसेवक पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले… पावसाची स्थिती लक्षात घेता राज्यात तातडीने आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली… राज्यातील काही भागात ढगफुटीची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले… ‘साल्या’ या शब्दामुळे माझे पुतळे जाळले गेले, काय चूक झाली तेच कळाले नाही, अशी भावना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली… आम्ही ‘व्हायरस’ नाही तर ‘व्हॅक्सीन’ असल्याचे म्हणत कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीकेचा प्रहार केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
नाशिकमध्ये शिंदे गटाला उतरती कळा?
राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण असते. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदारांना आपल्या गोटात खेचून आणले. त्यानंतर ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनाही पक्षात सामील करून घेतले. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला मोठी बळकटी मिळत असतानाच नाशिकमधून एक वेगळीच घडामोडी समोर आली आहे. येवला नगरपालिकेतील शिंदे गटाच्या १० पैकी तब्बल ७ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती आहे. आमदार किशोर दराडे आणि शिवसेना नेते कुणाल दराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याचे समजते. या सर्व नगरसेवकांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. लवकरच हे सातही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे, आठवडाभरापूर्वी शिंदे गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यातच आता ७ नगरसेवकांनीही राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यामुळे जिल्ह्यात शिंदेसेनेला उतरती कळा लागली असल्याची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रात तत्काळ आणीबाणीची मागणी
राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे अधिवेशन सुरू असताना पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या गंभीर परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. मिसिंग लिंकसारखे मोठे प्रकल्प करताना सरकारने पर्यावरणाचा अजिबात विचार केलेला नाही. परिणामी, अवघ्या एका पावसात संपूर्ण महाराष्ट्र पॅरलाइझ (ठप्प) झाला आहे, अशी टीका सुळे यांनी केली. दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तातडीने राज्यात आणीबाणी जाहीर करून महाराष्ट्रातील जनतेला नेमके काय सुरू आहे ते सांगितले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. सत्तेतील लोक नेहमी ७० वर्षांचा हिशोब मागतात; पण गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत बसलेल्या या लोकांच्या कामाचा हिशोब कोण देणार? असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सर्तकेच्या सूचना
राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी दरड कोसळून महामार्ग बंद झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील काही भागात आज दुपारनंतर उशिरा ताशी ७० ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. काही भागात ढगफुटी संभावित असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली आहे. पावसाच्या परिस्थितीबाबत सभागृहात बोलताना फडणवीस यांनी राज्यातील नैसर्गिक आपत्तीवरही चिंता व्यक्त केली आहे. सध्या इंद्रायणी नदीवरील चारही पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी देहू-आळंदीला न जाता पुण्यात यावे, असे आवाहनही फडणवीसांनी केले आहे.
‘साल्या’ शब्दामुळे माझे पुतळे जाळले गेले : दानवे
‘साल्या’ या शब्दामुळे माझे पुतळे जाळले गेले, काय चूक झाली तेच कळाले नाही, अशी भावना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलून दाखवली. आपल्या बोलीभाषेतून बोलायला आणि ऐकायला मजा येते; पण कधीकधी इतरांना ती उमगत नसल्यामुळे वादही होतात, असेही ते म्हणाले. प्रत्येक भाषेचे वेगळे महत्त्व आहे. आमच्या मराठवाड्यातही बोलीभाषा वापरली जाते आणि ती आमच्या संस्कृतीचा भाग आहे. आपण त्या भाषेत बोललो नाही, तर लोकांना आपण त्यांच्यापासून दुरावल्याची भावना येते. आपल्या लोकांना पटणारी भाषा सोडून मला पराभूत व्हायचे नाही, असा टोलाही दानवे यांनी लगावला. माणसाने आपली बोलीभाषा व संस्कृती शेवटपर्यंत सोडायला नको, अशी भावनाही माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
आम्ही ‘व्हायरस’ नाही तर ‘व्हॅक्सीन’ : दिपके
आम्ही ‘व्हायरस’ नाही तर ‘व्हॅक्सीन’ असल्याचे म्हणत कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीकेचा प्रहार केला. छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ते बोलत होते. यावेळी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचीही उपस्थिती होती. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर निर्माण झालेला रोष एकत्रित करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी नगर शहरात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घ्याव्यात, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली. आम्हाला आंतकवादी म्हणण्यापूर्वी आत्महत्या करणाऱ्या २० जणांच्या मृत्यूस तुम्ही जबाबदार आहात, अर्थाने तुम्हाला ही उपमा लागू पडते, असा घणाघात दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.
