आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगली… महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार महेश शिंदे यांना दिला… शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरचे प्रभावशाली नेते प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला… मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली… एकसंध शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात भाजपाने एकाचवेळी शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
मंत्री गुलाबराव पाटील भाजपाच्या वाटेवर?
विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपावरून भाजपा आणि शिंदेसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच जळगावची जागा ही भाजपाच्या वाट्याला गेल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले पुत्र प्रतापराव पाटील यांच्यासाठी या जागेवर दावा केला आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील आपली राजकीय पकड अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने भाजपने ही जागा सोडण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान शिंदे गटात अस्वस्थता वाढली असून मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांचे पुत्र हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याविषयी जळगावमध्ये पत्रकारांनी विचारणा केल्यावर “गेली ४५ वर्षे मी शिवसेनेत घातली. आताही मी शिवसेनेचा मंत्री आहे. माझ्यावर शंका घेणे उचित नाही. जळगावच्या जागेसंदर्भात मी यापूर्वी दोन वेळा आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. एकाच विषयावर वारंवार बोलणे योग्य नाही. शेवटी महायुतीचे अमर, अकबर, अँथोनी हे तिघेच जागा वाटपाचा निर्णय घेतील,” असे उत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले. सध्या ते मुंबईतीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदेसेनेच्या मंत्र्याचा भाजपा नेत्यांना इशारा
महायुतीत राहूनच परस्परांवर राजकीय कुरघोडी करणाऱ्यांना लक्ष्य करत महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, असा अप्रत्यक्ष इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार महेश शिंदे यांना दिला. प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. त्याचवेळी महायुतीत समन्वय आणि परस्पर सन्मान आवश्यक आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक वेळी आपल्याच पक्षाची परिस्थिती चांगली असेल असे नसते, असेही ते म्हणाले. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत यांनी पुढील २४ तासांत चित्र स्पष्ट होईल, असे सांगत महायुतीचे १७ पैकी १७ उमेदवार अर्ज दाखल करतील, असा विश्वास व्यक्त केला. जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मिठाचा खडा पडेल अशी भूमिका कोणी घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी मित्रपक्षातील नेत्यांना केले.
प्राजक्त तनपुरे यांचा अखेर भाजपात प्रवेश
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरचे प्रभावशाली नेते प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह अखेर भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेताच तनपुरे यांना बक्षीस म्हणून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. गेल्या महिन्यात राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात त्यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. यादरम्यान तनपुरे यांच्या पक्षप्रवेशावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘प्राजक्त यांचा भाजपा प्रवेश झाल्याचे मी काही वेळापूर्वी ऐकले. माझा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाही. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण आमच्यासाठी धक्कादायक आहे, पण त्यांनी हा निर्णय त्यांच्या मतदासंघातील परिस्थिती पाहून घेतला असावा असे मला वाटते, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणावर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकार हे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक व पारदर्शक आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे सर्व करत असताना संविधान आणि कायदेशीर चौकटीत राहूनच निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका फडणवीस यांनी नागपुरात मांडली. मराठा समाजाबाबत मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत आणि पुढेही समाजहिताचे निर्णय घेतले जातील. आमचे सरकार जाती-जातींमध्ये भांडणे लावणारे सरकार नाही. आम्ही सर्वच समाजांविषयी सकारात्मक आहोत. कोणावरही अन्याय करून निर्णय घेतला जाणार नाही. एका समाजाचे काढून दुसऱ्या समाजाला दिले जाणार नाही, त्यामुळे ओबीसी बांधवांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भाजपाचा शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का
एकसंध शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात भाजपाने एकाचवेळी शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. देवगड-विजयदुर्गमधील ठाकरेसेनेच्या तीन प्रभावशाली नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. यात कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील पंचायत समितीचे एकमेव सदस्य असणारे विष्णू घाडी यांचा समावेश आहे. त्याचवेळी देवगड तालुका प्रमुख जयेश नर, विभाग प्रमुख संदीप डोलकर यांनीदेखील आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. ठाकरे गटाला कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघात बसलेला हा जबर धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, भाजपाने शिंदेसेनेलाही मोठा धक्का दिला पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या गोटात खेचले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला आहे. या पक्षप्रवेशामुळे कोकणात भाजपाला मोठे राजकीय बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
