Bankipur Bypoll : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचा आजचा निकाल केवळ आमदार ठरवणार नाही, तर अनेक मोठ्या राजकीय प्रश्नांची उत्तरं यातून मिळणार आहेत. नीट पेपरफुटीविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मतांवर किती परिणाम झाला? प्रशांत किशोर यांची लोकप्रियता प्रत्यक्ष मतांमध्ये रूपांतरित झाली का? आणि भाजपा आपला सुरक्षित गड राखण्यात यशस्वी ठरणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या निकालातून मिळणार आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर बांकीपूरची जागा रिक्त झाली होती, जिथे यंदा पोटनिवडणूक जाहीर झाली. मात्र, नीट पेपरफुटीच्या घटनांविरोधात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली उभ्या राहिलेला आंदोलनाचा मुद्दा निवडणूक प्रचाराचा मुद्दा ठरला आहे.

या निवडणुकीत ‘जेन झी’ अर्थात तरुण मतदार सर्वाधिक चर्चेत आहेत, तर बांकीपूर मतदारसंघात तरुणांची मोठी संख्या आहे. बिहारमधील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आणि हजारो विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे कोचिंग सेंटर्स याच मतदारसंघात आहेत. पाटणा विद्यापीठ, एनआयटी पाटणा, बीएन कॉलेज, सायन्स कॉलेज, एएन कॉलेज आणि चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीसारख्या संस्थांमुळे हा मतदारसंघ विद्येचं केंद्र मानलं जातं, त्यामुळे ही पोटनिवडणूक बहुचर्चित ठरली आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बांकीपूरमधील सुमारे ३.७९ लाख मतदारांपैकी जवळपास एकतृतीयांश मतदारांचे वय १८ ते २९ वर्षांच्या दरम्यान आहे. यातील अनेकजण पहिल्यांदाच किंवा दुसऱ्यांदा मतदान करणार आहेत. स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि रोजगाराच्या प्रश्नांचा थेट परिणाम या तरुणांवर होत असल्याने या निवडणुकीला वेगळे वळण आले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर देशभर उभे राहिलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन याचा प्रभाव बांकीपूरमध्ये इतर मतदारसंघांच्या तुलनेत अधिक जाणवला, त्यामुळेच या पोटनिवडणुकीत तरुण मतदारांची भूमिका निर्णायक मानली जात आहे.

सुरुवातीला बांकीपूरची पोटनिवडणूक इतर निवडणुकांप्रमाणेच पार पडेल, असे मानले जात होते. मात्र, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीविरोधात देशभर उसळलेले आंदोलन आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक कारवाईनंतर या निवडणुकीचा राजकीय अजेंडा बदलला आहे.

जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी तरुण मतदारांच्या असंतोषाला प्रचाराचा मुद्दा बनवला. तरुणांना परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि पेपरफुटीप्रकरणी सरकारला जबाबदार धरण्याची संधी या निवडणुकीतून मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षांनीही प्रचारादरम्यान हा मुद्दा सातत्याने लावून धरला आणि सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले. प्रशांत किशोर यांनी प्रचारादरम्यान दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला होता. ‘दिल्लीतील आंदोलन हे केवळ एका व्यक्तीचे नाही. आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो तरुणांनी केवळ सीजेपीचे झेंडे हातात घेतले नव्हते, तर पेपरफुटी, बेरोजगारी आणि ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेविरोधातील रोष त्यांच्यात होता,’ असे ते म्हणाले होते.

दुसरीकडे, भाजपाने या टीकेला उत्तर देताना केंद्र सरकारच्या उपाययोजनांवर भर दिला. माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वात परीक्षा सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला विशेष कृती गट आणि पेपरफुटीविरोधातील कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणा या सर्व मुद्द्यांचा भाजपाने प्रचारात उल्लेख केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजही तरुण मतदारांचा मोठा पाठिंबा आहे, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला.

प्रशांत किशोरांसाठी मोठी कसोटी

बांकीपूरची पोटनिवडणूक ही जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्यासाठी सक्रिय राजकारणाचे प्रवेशद्वार ठरणार आहे. गेली अनेक वर्षे देशभरातील विविध राजकीय पक्षांना निवडणूक रणनीतीचा सल्ला देणारे प्रशांत किशोर आता प्रथमच थेट निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, त्यामुळे या निकालाकडे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाची परीक्षा म्हणून पाहिले जात आहे.

या निवडणुकीत विजय मिळाल्यास प्रशांत किशोर यांची स्वतंत्र राजकीय ताकद सिद्ध होऊ शकते. मात्र, पराभव झाल्यास ते एका रणनीतीकारच्याच भूमिकेत राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे बांकीपूरची निवडणूक ही प्रशांत किशोर यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठी राजकीय कसोटी असल्याचे म्हटले जाते.

भाजपासाठीही प्रतिष्ठेची लढत

बांकीपूर हा मतदारसंघ भाजपाचा पारंपरिक गड मानला जातो. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी अनेकवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे ही जागा कायम राखणे भाजपासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून परीक्षा सुधारणा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून भाजपावर सातत्याने टीका होत आहे. असे असतानाही भाजपाचा शहरी मतदारांमधील प्रभाव कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या निवडणुकीतून केला जात आहे. यापूर्वी पक्षाने अभिषेक कुमार सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, नंतर उमेदवारीत बदल करत नीरज कुमार सिन्हा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

एक्झिट पोलने स्पष्ट होतेय चित्र

‘व्होट वाइब’ (Vote Vibe) च्या एक्झिट पोलनुसार, बांकीपूरमध्ये भाजपा आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये भाजपाला ४४.९ टक्के, जनसुराज्यला ३३.८ टक्के, तर राष्ट्रीय जनता दलाला (RJD) १७.८ टक्के मते मिळू शकतात.

या एक्झिट पोलमधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वयोगटानुसार मतदारांचा कल. २६ ते ३५ वयोगटात भाजपाचा पाठिंबा तुलनेने कमी असल्याचे दिसून आले, तर ५१ ते ६० वयोगटातील मतदारांमध्ये पक्षाला सर्वाधिक पाठिंबा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याउलट, जनसुराज्यला सर्वाधिक पाठिंबा २६ ते ३५ वयोगटातील तरुण मतदारांकडून मिळू शकतो, तर ६० वर्षांवरील मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव तुलनेने कमी असल्याचा या एक्झिट पोलचा अंदाज आहे.

जेन झी चा निकालावर प्रभाव?

तरुण मतदार या निवडणुकीचा निकाल बदलू शकतात का? याचे उत्तर ‘हो’ असले, तरी केवळ तरुणांच्या रोषामुळे निकाल बदलेल, याची शक्यता कमी असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

त्यांच्या मते, निकालावर तीन महत्त्वाचे घटक परिणाम करू शकतात. पहिला म्हणजे तरुण मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडणे. दुसरा म्हणजे भाजपाविरोधी मतांचे विभाजन न होता ते एकाच उमेदवारामागे एकवटणे आणि तिसरा म्हणजे बिहारच्या निवडणुकांमध्ये कायम प्रभावी ठरणारे जातीय समीकरण, पक्षाची संघटनात्मक ताकद आणि बूथ पातळीवरील व्यवस्थापन.

राजकीय निरीक्षकांच्या मते, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न या निवडणुकीतील चर्चेचा केंद्रबिंदू असले तरी बिहारमधील निवडणुकांचे निकाल आजही जातीय समीकरणे, स्थानिक नेतृत्व आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात.

या निवडणुकीत भाजपा आपल्या मजबूत संघटनात्मक यंत्रणा आणि पारंपरिक मतदारांवर विश्वास ठेवून मैदानात उतरली आहे; तर तरुण मतदारांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात निर्माण झालेली नाराजी आपल्या बाजूने मतदानात परिवर्तित होईल, अशी जनसुराज्य पक्षाला अपेक्षा आहे.