Nitish Kumar Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी गुरुवारी (०५ मार्च) अखेर राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. सुमारे दोन दशकं राज्याच्या राजकारणात प्रभावी नेते म्हणून दबदबा असणारे नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी, पडद्यामागे अनेक रंजक आणि नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. नितीश यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय का घेतला? त्यासाठी त्यांची मनधरणी कोणी केली? बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? नितीश यांच्या मुलाचे राजकीय भवितव्य काय? असे अनेक प्रश्न देखील यामुळे उपस्थित होऊ लागले आहेत. याचबाबत सविस्तर माहिती या लेखातून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.

बुधवारी आला राजकीय हालचालींना वेग

नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्याबाबत चर्चा सुरु असल्याची प्राथमिक माहिती बुधवारी माध्यमांमधून समोर आली. नितीश मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जाण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली. यानंतर संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पार्टीमध्ये हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळाले. जनता दलातील नेते आणि नितीश यांचे कुटुंबीय मुख्यमंत्रीपद न सोडण्याची विनंती करत असल्याची माहिती समोर आली. मंत्री विजय कुमार चौधरी यांनी देखील याबाबत भाष्य करताना “राज्यसभेची चर्चा सुरु असली तरी अंतिम निर्णय नितीश कुमार घेतील”, असे त्यांनी स्पष्ट केले.

नितीश यांनी स्वत:च केली घोषणा

राज्यसभेवर जाण्याची चर्चा सुरु असताना नितीश कुमार यांनी गुरुवारी सकाळी स्वत:च याबाबत माहिती दिली. “राज्यसभेसाठी मी अर्ज दाखल करत आहे. बिहारच्या जनतेशी माझे संबंध भविष्यातही कायम राहतील. नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल”, अशी एक्सपोस्ट नितीश कुमार यांनी केली. भाजपाने बिहारमधून राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना उमेदवारी जाहीर केली. पण, नितीश यांचे नाव गुलदस्त्यात होते. गृहमंत्री अमित शहा नबीन यांचा अर्ज दाखल करण्यासाठी बिहारला आल्यानंतर नितीन नबीन आणि नितीश कुमार यां दोघांनीही सोबतच अर्ज दाखल केला.

विधानसभेतील पक्षीय बलाबल

२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत एनडीए महायुतीला २०२ जागांवर यश मिळाले आहे. तर, विरोधकांच्या पारड्यात केवळ ४१ जागा पडल्या आहेत. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ८९, संयुक्त जनता दलाने ८५, एलजेपी १९, आरएलएम ४ आणि एचएएम ५ जागांवर विजयी झाले. तर आरजेडीला २५, काँग्रेसला ६ जागांवर यश मिळाले. 

नितीश कुमारांना राज्यसभेवर का पाठवलं जातंय?

विधानसभा निवडणुकीच्यावेळी समोर आलेला नितीश कुमार यांच्या तब्येतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. नितीश यांचे वय आणि खालावत चाललेली तब्येत यामुळेच त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले जाते. नितीश गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करत असल्याचे सूत्रांनी म्हटलंय. तसेच, बिहारमध्ये सध्या प्रशासकीय अधिकारी सरकार चालवत आहेत, अशी जनभावना निर्माण झाली आहे. नितीश कुमार यांना राज्यातून केंद्रात जाण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे भाजपाने म्हटले आहे. एनडीए युती आणि राज्य सरकार दोघांसाठी ही फायद्याची बाब असल्याचे मत भाजपाने नोंदवले आहे. 

बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?

एनडीएमधील सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, उद्योगमंत्री दिलीप जयस्वाल आणि भाजपा आमदार संजीव चौरसिया हे संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय देखील मुख्यमंत्रीपदासाठी रिंगणात उतरू शकतात. तर, जद(यू) मधून विजय कुमार चौधरी आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे दोन संभाव्य उपमुख्यमंत्री असू शकतात.

नितीश यांच्या मुलाला राज्यसभेवर पाठविण्याची होती तयारी

सुरुवातीला नीतीश यांचा मुलगा निशांत कुमार यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत चर्चा झाली होती. पण, निशांत यांनी बिहारमधून आपली राजकीय इनिंग सुरू करण्याची उत्सुकता दाखवल्याचे सांगितले जाते. यानंतर भाजपाने नितीश कुमार यांना राज्यसभेवर जाण्याचा तर, राज्यात त्यांना हवा तो राजकीय उत्तराधिकारी नियुक्त करण्याची मुभा दिली. नितीश यांनी त्यावर सहमती दर्शवली, असे एनडीएच्या सूत्रांनी एक्सप्रेसला माहिती दिली. दरम्यान, नितीश कुमार यांचा हा निर्णय पक्षातील अनेक नेत्यांना रुचला नसल्याचे सांगितले जाते.