BJP Bankipur Datia Defeat : बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभव पत्कारावा लागला आहे. या पराभवामुळे पक्षासमोर दोन महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत. पहिला म्हणजे, पक्षाच्या पारंपरिक मतांमध्येच विभाजन होत असल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत आणि दुसरा म्हणजे, पक्षातील नव्या पिढीच्या नेतृत्वाला पुढे आणण्याच्या प्रयत्नांना अंतर्गत पातळीवरच आव्हान मिळत आहे.

एनडीएच्या मित्रपक्षांच्या काही नेत्यांनी अनौपचारिक चर्चेत या निकालाकडे इशारा करत म्हटले की, भाजपाचे पारंपरिक बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या मतदारसंघांतही मतदारांना गृहीत धरू शकत नाही, तसेच सत्तेतील आत्मविश्वास हा अहंकारात बदलल्याचा संदेश गेल्यास मतदार त्याला मतदानातून उत्तर देऊ शकतात, अशी भावना काही मित्र पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

मुख्यमंत्री बदलल्याने फटका?

भाजपाचा बिहार आणि केंद्रातील मित्र पक्ष जनता दल (युनायटेड)च्या एका वरिष्ठ नेत्याने बांकीपूरमधील निकाल हा भाजपा आणि एनडीएसाठी महत्त्वाचा संदेश असल्याचे म्हटले आहे. ‘बिहारमध्ये आठ महिन्यांपूर्वी आम्हाला मोठे यश मिळाले होते. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांपूर्वी नितीश कुमार यांच्या जागी भाजपाचे सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाले. त्या बदलानंतर एनडीएने बिहारमध्ये लढवलेली ही पहिलीच निवडणूक होती. अशा वेळी झालेल्या पराभवाकडे गांभीर्याने पाहिले जावे,’ असे त्यांनी भाजपा नेतृत्वाला सुचवले आहे.

‘पारंपरिक मतदारांना गृहीत धरणे चुकीचे’

दरम्यान, भाजपाच्या एका माजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यानेही या निकालातून पक्षाला स्पष्ट संदेश मिळाल्याचे म्हटले. ‘दतिया आणि बांकीपूर या दोन्ही मतदारसंघांच्या निकालातून हे स्पष्ट झाले की, पक्षाच्या पारंपरिक मतदारांनाही कायम गृहीत धरता येणार नाही. पक्ष सांगेल ते विनाविचार स्वीकारणारे मतदार नाहीत, हा राजकीय संदेश केवळ बिहार किंवा मध्य प्रदेशापुरता मर्यादित नसून राष्ट्रीय स्तरावरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे,’ असे त्यांनी सुचित केले. तसेच, मतदारांनी या निकालातून पक्षाला स्पष्ट इशारा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

भाजपातील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, या दोन्ही पोटनिवडणुकांतील पराभवामुळे पक्षातील प्रस्थापित नेत्यांच्या राजकीय प्रभावावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात गेली दोन दशके स्थानिक राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेले माजी गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही ते पोटनिवडणुकीसाठी तयारी करत होते आणि उमेदवारीची अपेक्षा होती. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नाराजीही उघडपणे व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, भाजपाने उमेदवार म्हणून निवडलेल्या युवा नेते आशुतोष तिवारी यांच्या पराभवामागे मिश्रा समर्थकांचा अप्रत्यक्ष प्रभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बांकीपूरमध्ये भाजपावर नामुष्की?

बिहारमधील बांकीपूरचा निकाल भाजपासाठी अधिक धक्कादायक मानला जात आहे. कारण १९९५ पासून हा मतदारसंघ भाजपाने आपल्याकडे कायम राखला. पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष की नितीन नबीन यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघात विजय मिळवला. त्यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याने ही जागा रिक्त झाली आणि या जागेवर पोटनिवडणूक लागली. त्याआधी १९९५ ते २००५ या काळात नितीन नबीन यांचे वडील नबीन किशोर प्रसाद सिन्हा यांनी बांकीपूर (त्यावेळी पाटणा वेस्ट) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, त्यामुळे अनेक दशकांपासून भाजपाचा अभेद्य गड राहिलेल्या मतदारसंघातच पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागणे, हा मोठा धक्का मानला जातो.

दरम्यान, भाजपाचा अतिआत्मविश्वासही पक्षाला नडला, अशी चर्चा रंगली आहे. ‘बांकीपूरमधून भाजपाच्या तिकिटावर कुत्रा किंवा मांजरालाही उमेदवारी दिली तरी तो जिंकेल,’ असे बिहारमधील एका भाजपा खासदाराने प्रचारसभेदरम्यान विधान केले होते. मात्र, या मतदारसंघात भाजपाला पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्याकडून तब्बल १९ हजारांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
निकालानंतर महायुतीतील मित्रपक्ष लोक जनशक्ती पक्षाच्या (LJP) एका खासदारानेही या वक्तव्यावर आक्षेप घेतला. ‘भाजपाच्या तिकिटावर कुत्रा-मांजरही निवडून येईल, असे एखादा वरिष्ठ नेता कसा काय म्हणू शकतो?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रशांत किशोरांचा राजकीय उदय

दरम्यान, भाजपातील वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री म्हणाले की, पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नियुक्तीचा या निकालावर अप्रत्यक्ष परिणाम झाला असावा. पक्षातील पिढीजात राजकारणात उत्तराधिकाऱ्याची नेमणूक हे नेहमीच मोठे आव्हान ठरत आले आहे. जे. पी. नड्डा यांचा उत्तराधिकारी म्हणून अनेक ज्येष्ठ दावेदारांना मागे टाकत नितीन नबीन यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, जी अनेक प्रस्थापित नेत्यांसाठी अनपेक्षित ठरली असे त्यांनी सांगितले.

स्थानिक पातळीवरील सूत्रांच्या माहितीनुसार, जनसुराज्यचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी सुरुवातीपासूनच बांकीपूर पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली होती, त्यामुळे ही निवडणूक त्यांच्या राजकीय प्रवेशासाठीची कसोटी मानली जात होती.

भाजपाच्या एका खासदारानेही पक्षासमोरचे आव्हान अधोरेखित केले. ‘देशात सक्षम पर्याय नाही, त्यामुळे मतदार आमच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देतील असे गृहीत धरणे चुकीचे आहे,’ असे त्यांनी म्हटले. मतदारांना नव्या पिढीचे नेतृत्व अपेक्षित असले तरी कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणेच (CJP) या निकालातून तरुणांसह पक्षाच्या पारंपरिक मतदारांकडूनही अनेक प्रश्न विचारले जात आहेत, असेही खासदाराने नमूद केले.
भाजपातील एका वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ‘प्रशांत किशोर हे भाजपा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पर्याय नाहीत. मात्र, भाजपाच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात मतदारांनी किशोर यांच्यावर विश्वास दाखवला, हा या निकालातील महत्त्वाचा संदेश आहे. हा केवळ भाजपाविरोधी पक्षाचा विजय नाही, तर भाजपाच्या पारंपरिक मतदारांमध्ये बदलाचे संकेत देणारा निकाल आहे. तर, ‘मतदारसंघातील मतविभाजन हेच भविष्यातील मोठे आव्हान ठरू शकते,’ असेही मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपामधील किमान तीन खासदारांनीही वरिष्ठ नेत्यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला. मात्र, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामागील जनाधार कमी होत आहे,’ असा विरोधकांचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे.

उमेदवार बदलाचाही फटका?

जनता दल (युनायटेड)च्या एका खासदाराच्या मते, बांकीपूरमध्ये अखेरच्या क्षणी उमेदवार बदलण्याचा निर्णयदेखील भाजपासाठी प्रतिकूल ठरला आहे. सुरुवातीला भाजपाने अभिषेक कुमार सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, नंतर नीरज कुमार यांना उमेदवार करण्यात आले. या बदलामागील कारण स्पष्ट करण्यात आले नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

तसेच, बिहारच्या जातीय राजकारणात एनडीएला कोणत्याही एका समाजघटकाचा ठोस पाठिंबा मिळवता आला नाही, यावरही जेडीयूच्या खासदाराने भर दिला. बांकीपूरमध्ये ३० टक्क्यांहून अधिक असलेल्या सवर्ण मतदारांसह जेडीयूचा पारंपरिक आधार मानल्या जाणाऱ्या कुर्मी आणि मागासवर्गीय (EBC) मतदारांचे पूर्ण समर्थनही मिळवण्यात भाजपा कमी पडली, असाही दावा त्यांनी केला.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या पराभवाचा सर्वाधिक राजकीय परिणाम भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यावर होऊ शकतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बांकीपूरमधून सुमारे ५० हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. यावेळी उमेदवार निवडण्याबाबत पक्षाने त्यांना मोकळीक दिली होती आणि नीरज कुमार हे त्यांच्या पसंतीचे उमेदवार मानले जात होते, त्यामुळे या पराभवाची राजकीय जबाबदारीही त्यांच्यावर येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.