Bihar CM change Nitish Kumar Resignation April 2026 : बिहारचे पायउतार होणारे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या आठवड्यात राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला असून राज्याची सर्व सूत्रे भाजपाच्या हातात जाण्याची शक्यता आहे. सध्या उपमुख्यमंत्री असलेले सम्राट चौधरी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याची चर्चा असली तरीही त्याबाबत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एकमत झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यादरम्यान भाजपाने रविवारी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची बिहारच्या विधिमंडळ पक्षाचा नवीन नेता निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या हे पद सम्राट चौधरी यांच्याकडे आहे.

नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार १४ एप्रिल रोजी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी शिवराज सिंह चौहान बिहारचा दौरा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सम्राट चौधरी यांचे नाव सध्या आघाडीवर असले तरीही नितीश कुमार यांचा जनता दल युनाडेट पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर मित्रपक्षांनी ओबीसी नेते उपेंद्र कुशवाह यांना पाठिंबा दिल्याची माहिती आहे. भाजपामधील एका सूत्राने सांगितले की, बिहारमध्ये प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री होणार असल्याने पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक मोठा गट अशा नेत्याच्या शोधात आहे, ज्याची पार्श्वभूमी पूर्णपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि संघाशी संबंधित आहे. सम्राट चौधरी यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात समता पक्षातून केली होती. त्यानंतर दीर्घकाळ राष्ट्रीय जनता दलात काम केल्यानंतर त्यांनी आठ वर्षांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता.

आणखी वाचा : “भाजपाचा हा नेता म्हणजे दुसरा खरातच”, शिंदेंच्या शिलेदाराचा गंभीर आरोप; यासह वाचा आजच्या ५ घडामोडी…

कोण आहेत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी?

मुंगेर येथील कोइरी-कुशवाहा (ओबीसी) समाजाचे नेते सम्राट चौधरी सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आरजेडीमधून केली आणि १९९९ मध्ये राबडी देवी सरकारमध्ये ते कृषिमंत्री होते. त्यानंतर त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला आणि शेवटी भाजपामध्ये आले. भाजपामध्ये त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष, विधान परिषद सदस्य व प्रदेशाध्यक्ष, अशी पदे भूषवली आहेत. २०१४ मध्ये त्यांनी आरजेडी विधिमंडळ पक्षात फूट पाडली होती आणि त्यामुळे त्यांची एक कुशल संघटक म्हणून ओळख निर्माण झाली. बिगर-यादव ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपा त्यांना मुख्यमंत्रिपदाचे आघाडीचे उमेदवार मानत आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी कोणाची नावे चर्चेत?

गेल्या आठवडाभरात केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय, बिहारचे मंत्री लखिंद्र पासवान आणि श्रेयसी सिंह यांची नावेही मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार म्हणून समोर आली आहेत. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भाजपाचे पक्षश्रेष्ठी ओबीसी, ईबीसी, दलित तसेच उच्चवर्णीय समाजातील विविध पर्यायांचा विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा अंतिम निर्णय हा केवळ भाजपाचा नसून संपूर्ण राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा असेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षातील काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नावासाठी आपली पसंती दर्शवली आहे. सध्याच्या सरकारमधील सामाजिक समीकरणे तशीच पुढे चालू राहावीत, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. जर सम्राट चौधरी (कुशवाह समाज) मुख्यमंत्री आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार (कुर्मी समाज) उपमुख्यमंत्री झाल्यास राज्यातील प्रसिद्ध ‘लव-कुश’ हे सामाजिक समीकरण कायम राहील, असे या नेत्यांचे मत आहे.

हेही वाचा : ममता, स्टॅलिन, हिमंता की विजयन? सत्तेच्या संघर्षात कोणाचे पारडे जड?

मुख्यमंत्रिपदावरून भाजपातच मतभेद?

जनता दल युनायटेड पक्षाच्या एका नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, गेल्या दोन वर्षांत सम्राट चौधरी यांनी प्रशासक म्हणून परिपक्वता दाखवली आहे. त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा विश्वासही संपादन केला आहे. एनडीएचे मित्रपक्ष हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे (सेक्युलर) सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनीही शनिवारी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाचे संकेत दिले. माझ्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हेच मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील आणखी एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीतील नेत्यांनाही मुख्यमंत्रिपदासाठी सम्राट चौधरी यांच्या नावाला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. पक्षाच्या एका सूत्राने सांगितले की, या प्रक्रियेत भाजपा आम्हाला कितपत विश्वासात घेते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सम्राट चौधरी दिल्लीहून परतल्यापासून ते फारसे कोणाला भेटलेले नाहीत. त्यांच्या या शांततेवरून भाजपामध्ये काहीशी अस्वस्थता असल्याचे संकेत मिळतात. यादरम्यान बिहारमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.