पंजाबमधील उद्योगपती केवलसिंग धिल्लन लोकसभा पोटनिडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने बर्नालाचे माजी आमदार केवलसिंग धिल्लन यांना पक्षातून काढले होते. केवलसिंग यांनी ४ जून रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना संगरूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.संगरूर मतदार संघातील आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान हे धुरीमधून विधानसभा निवडणूक निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या संगरूर लोमसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. संगरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची धिल्लन यांची ही काही पहिली वेळ नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भगवंत मान यांनी धिल्लन यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत पराभव झाला असला तरी धिल्लन यांनी दमदार कामगिरी करत ३.०३ लाख मते मिळवली होती.

कोण आहेत केवलसिंग धिल्लन ?

७२ वर्षीय धिल्लन हे पंजाबमधील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. रिअल इस्टेट, शीतपेये आणि करमणूक क्षेत्रात ते काम करतात. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ही १३२.८८ कोटी रुपये आहे. त्यांनी काँग्रेसकडून तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकिटाची अपेक्षा होती. मात्र त्यांच्याऐवजी मनीष बंसल यांना उमेदवारी दिली. मनीष बंसल हे माजी केंद्रीय मंत्री पवन बंसल यांचे चिरंजीव आहेत. 

तिकीट न मिळाल्यामुळे नाराज

सुरवातीला तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या धिल्लन यांनी ही निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा केली. मात्र नंतर निवडणूक नलढवता त्यांनी असहकाराची भूमिका घेत बंसल यांच्यासाठी प्रचार केला नाही. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या एक महिना आधी या दिगग्ज नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाच्या या निर्णयावर खासदार मनीष तिवारी यांनी पक्षाच्या या निर्णयाने धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की ” दहशतवादाच्या काळात पंजाबमध्ये एक पैसाही गुंतवण्यास कोणी तयार नव्हते तेव्हा त्यांनी १९८० सुमारास ‘पेप्सीको’ कंपनीला पंजाबमध्ये आणले. धिल्लन यांनी नुकताच भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी” फक्त भाजपाच पंजाबला वाचवू शकते आणि हे फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाच करू शकतात. ते देशाला आर्थिक संकटातुन काढून वाचवू शकतात”असे जाहीर विधान केले होते.