गेली अनेक वर्ष भाजपा आणि काँग्रेसपासून समान अंतर राखणाऱ्या बीजू जनता दलाने (BJD) अखेर आपली तटस्थ भूमिका बदलण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षभरात बीजेडीचे भाजपासोबतचे संबंध ताणले गेले होते, पण आता बीजेडीने मंगळवारी थेट इंडिया आघाडीच्या आंदोलनात सहभाग घेतल्याने ते भाजपाशी फारकत घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी काढलेल्या मोर्चात बीजेडीचे खासदारही सहभागी झाले. या आंदोलनामुळे भाजपा-बीजेडी युतीला वेगळा आयाम मिळण्याची शक्यता आहे.

बीजेडीची रणनीती काय?

बीजेडीचे अध्यक्ष आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी यापूर्वीच ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच एसआयआर प्रक्रियेचा फेरविचार करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. याच भूमिकेप्रमाणे पटनाईक यांनी राज्यसभेतील पक्षाच्या खासदारांना आंदोलनात सहभागी होण्याचे निर्देश दिले. मात्र, बीजेडीने इंडिया आघाडीत प्रवेश करण्याबाबत कोणतीही भूमिका मांडलेली नाही.

बीजेडीचे राज्यसभेतील खासदार मानस मंगराज यांनी म्हटले की, एसआयआरच्या नावाखाली ओडिशातील २० लाखांहून अधिक आणि देशभरातील १३ कोटींपेक्षा जास्त मतदारांची नावे वगळण्यात आल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे, असा आरोपही मंगराज यांनी केला. मात्र, याचा अर्थ असा नाही की, बीजेडीने ‘इंडिया’ ब्लॉकमध्ये प्रवेश केला, असे मंगराज यांनी नमूद केले.

बीजेडीने निवडणूक आयोगाविरोधात अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचे या सहभागातून दिसते. विशेष म्हणजे, जून २०२४ मध्ये ओडिशातील बीजेडीच्या तब्बल २४ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजप सत्तेवर आला होता. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही बीजेडीला मोठा धक्का बसला. १९९७ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासून ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पहिल्यांदाच बीजेडीला लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही, तर भाजपाने याच निवडणुकीत २१ पैकी २० जागा जिंकल्या, त्यामुळे दिल्लीतील या आंदोलनातील बीजेडीचा सहभाग हा केवळ एका दिवसापुरता राजकीय निर्णय नसून, भाजपापासून पक्षाचे अंतर वाढत असल्याचे संकेत मानले जात आहेत.

बीजेडीच्या अंतर्गत सूत्रांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, आम्ही या आंदोलनात विचारपूर्वक सहभागी होण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत जनतेमध्ये वाढता असंतोष पाहता पक्षाने इंडिया आघाडीच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

बीजेडीच्या या बदललेल्या भूमिकेचे तृणमूल काँग्रेसनेही स्वागत केले आहे. इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेससमोरही सध्या राजकीय आव्हाने आहेत. तृणमूलचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये बीजेडीचे प्रमुख नवीन पटनाईक यांचे आभार मानले. तसेच, खासदार मानस मंगराज, सुलता देव आणि माजी खासदार मुजीबुल्ला खान यांना दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधातील आंदोलनात पाठवल्याबद्दल बीजेडीच्या नेतृत्वाचे आभार मानले. “आम्ही एकजुटीने मैदानात उतरलो आहोत,” असेही ओब्रायन यांनी म्हटले.

बीजेडीच्या एका वरिष्ठ नेत्याने नवीन पटनाईक यांची स्तुती केली आहे. ‘जनतेचा मूड अचूकपणे ओळखणारा चाणाक्ष राजकारणी’ म्हणून त्यांना संबोधले आहे. जनमताची दिशा लक्षात घेऊन त्यानुसार भूमिका घेणे, ही पटनाईक यांची राजकीय रणनीती आहे. दिल्लीतील विरोधकांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णयही त्याच रणनीतीचा भाग आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बीजेडीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, एसआयआरच्या कायदेशीर परिणामांबाबत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला असला, तरी निवडणूक आयोगाच्या कामकाजाकडे सध्या जनतेचे बारकाईने लक्ष आहे. निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असताना, आयोगाचे बहुतांश निर्णय भाजपाच्या बाजूने झुकलेले असतात, अशी भावना लोकांमध्ये वाढत असल्याचा दावा या नेत्याने केला.

बीजेडीच्या आणखी एका नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, २०२४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बीजेडीलाही मतदान प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा फटका बसला. बीजेडीच्या राज्यसभा खासदार सुलता देव यांनी सांगितले की, ओडिशातील २०२४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांदरम्यान बीजेडीने प्रक्रियेतील अनियमितता निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. या प्रकरणात निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र, आयोगाकडून याबाबत कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही, असे देव यांनी सांगितले.

बीजेडीने निवडणूक आयोगाला तीन प्रमुख मुद्दे निदर्शनास आणून दिले होते. प्रत्येक मतदान केंद्रावर झालेले एकूण मतदान आणि संबंधित ईव्हीएममध्ये मोजण्यात आलेल्या मतांमध्ये फरक असल्याचा पक्षाचा दावा आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाचवेळी होऊनही दोन्ही निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाच्या संख्येत मोठी तफावत आढळल्याचेही बीजेडीने म्हटले. याशिवाय, मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदारांची आकडेवारी आणि त्यानंतर दोन दिवसांनी जाहीर केलेली अंतिम आकडेवारी यामध्ये मोठी तफावत असल्याचा मुद्दाही पक्षाने उपस्थित केला.

भूमिकेत बदल कसा झाला

बीजेडीच्या राजकीय भूमिकेत अचानक बदल झालेला नाही. २०२४ मध्ये सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पक्षाने हळूहळू आपली राजकीय दिशा बदलण्यास सुरुवात केली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर बीजेडीने एनडीए सरकारला काही विशिष्ट मुद्द्यांवर पाठिंबा देणे थांबवणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये नीटच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी सभात्याग केला, त्यात बीजेडीचाही सहभाग होता.
मार्च २०२५ मध्ये तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि डीएमके नेते एम. के. स्टॅलिन यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या विरोधात आयोजित केलेल्या बैठकीला नवीन पटनाईक उपस्थित राहिले. तसेच वर्षाच्या सुरुवातीला राज्यसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करत त्यांनी संयुक्त उमेदवारही दिला. मात्र, या उमेदवाराचा पराभव झाला.

अलीकडे देशातील जेन झी तरुणांनी नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन केले होते, या मुद्द्यावरून केंद्र सरकारवरील दबाव वाढत होता, तेव्हा नवीन पटनाईक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला होता. याशिवाय, नुकत्याच मंजूर झालेल्या ‘माइन्स अँड मिनरल्स (डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन) ॲक्ट’वरूनही पटनाईक यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. या कायद्यामुळे खाणपट्टाधारकांकडून कर वसूल करण्याचा अधिकारच हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा कायदा ओडिशाच्या हिताविरोधात असल्याचे पटनाईक यांनी नमूद केले होते. या नव्या कायद्याच्या विरोधात पटनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले होते.