आसाराम लोमटे परभणी : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाकडून प्रयत्न सुुरू असले आणि मोठ्या प्रमाणावर अन्य पक्षातून नेत्यांची आयात सुरू असली, तरी अजूनही पुरेशी जुळवाजुळव करण्यात शिंदे यांच्या सेनेला यश आले नाही. विशेषतः आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीसाठी मोठी दमछाक करावी लागत आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत भाजपऐवजी दोन सेनेतच लढत होण्याची चिन्हे आहेत. पण त्याचवेळी लोकसभेसाठी मात्र परभणीत आपला उमेदवार उभा करण्याची तयारी भाजपने सुरू केली असून आमदार मेघना बोर्डीकर यांचे जिल्हाभर दौरे त्या दृष्टीने सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जिल्ह्यावर वरचष्मा आहे. शिवसेनेच्या फाटाफुटीत सुद्धा परभणीचा बालेकिल्ला अभेद्य राहिला. गेल्या तीस वर्षांपासून परभणी लोकसभा व विधानसभेवर शिवसेनेचा भगवा आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवल्यानंतरही शिवसेनेनेच वर्चस्व राखले होते. सेनेत फाटाफूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिल्ह्यात बरीच चाचपणी केली. मात्र अजूनही या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. निवडणुकांच्या दृष्टीने मातब्बर चेहऱ्यांच्या शोधात हा पक्ष आहे. शिवसेनेचा हा पारंपरिक गड काबीज करण्यासाठी अजूनही वजनदार चेहऱ्यांच्या शोधात शिंदे यांची ळासाहेबांची शिवसेना प्रयत्नशील आहे.परभणी विधानसभा निवडणुकीतील येणारी लढत ही दोन सेनेतच होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीच्या सेना-भाजप स्वतंत्र लढलेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झालेला होता. त्यामुळे येणारी निवडणूक परंपरागत शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना लढेल अशी परिस्थिती आहे. तसे झाले तर परभणी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला दोन पावले मागे यावे लागणार आहे. हेही वाचा :सांगोला सूत गिरणी निवडणुकीत शेकापचे भवितव्य ठरणार; शहाजीबापू पाटील यांच्या भूमिकेकडेही लक्ष भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्या दृष्टीने बोर्डीकर यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्हाभर दौरे चाललेले असतात. सामान्यपणे कोणताही आमदार आपला विधानसभा मतदारसंघ सोडत नाहीत. मात्र श्रीमती बोर्डीकर या जिल्ह्यातल्या विविध उपक्रमांत हजर असतात. अलीकडेच परभणी तालुक्यात शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी रास्तारोको आंदोलन केले होते तेव्हा मेघना बोर्डीकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. लोकसभानिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष बोर्डीकर यांना पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेविरुद्ध जपच्या आमदार मेघना बोर्डीकर या रिंगणात असतील, तर विधानसभेला मात्र न शिवसेनेतच संघर्ष पाहायला मिळेल. हेही वाचा :जळगाव जिल्हा दूध संघातील राजकारणात एकनाथ खडसेंच्या कोंडीचा प्रयत्न आगामी निवडणुकीत तुल्यबळ अशा उमेदवारांच्या शोधात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे. या शिवसेनेसोबत भारतीय जनता पक्ष असल्याने आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बऱ्याच नव्या घडामोडी दिसून येणार आहेत. विशेषतः गंगाखेड, पाथरी या दोन विधानसभा मतदारसंघातील संभाव्य व्यूहनीतीबाबत मोठी अनिश्चितता आहे. आमदार मेघना बोर्डीकर जर भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार ठरल्या, तर त्यांच्या जागी जिंतूर विधानसभा मतदारसंघाची पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतही औत्सुक्य आहे. तूर्त तरी दोन सेनेत भविष्यातला राजकीय संघर्ष पाहावयास मिळण्याच्या शक्यता जाणवत आहेत.