Mallikarjun Kharge : काही दिवसांपूर्वीच कथित मुडा जमीन ( ‘मैसुरू नागरी विकास प्राधिकरण’ ) घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिले होते. त्यानंतर भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान, आता सिद्धरामय्या यांच्यानंतर भाजपाकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे कुटुंबिय सदस्य असलेल्या संस्थेला कर्नाटक सरकारने उद्योगांसाठी राखीव असलेली जमीन दिल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. या आरोपानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

कर्नाटक सरकारने कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाची एरोस्पेस पार्कसाठी राखीव असलेली जागा चुकीच्या पद्धतीने मल्लिकार्जुन खरगे यांच्या परिवारातील सदस्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या सिद्धार्थ विहारा या संस्थेला दिली असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. भाजपाचे खासदार लहरसिंग सिरोया यांनी यासंदर्भातील एक बातमी शेअर करत आरोप केले आहेत. “हा सत्तेचा दुरुपयोग किंवा घराणेशाहीचा वापर आहे का? उद्योगमंत्री एम.बी. पाटील यांनी या जमीन हस्तांतराला मंजुरी दिली कशी? खरगे यांचा परिवारही आता एरोस्पेस उद्योजक झाला का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पुढे बोलताना, याप्रकरणी आम्ही राज्यपालांकडे तक्रार केली असून याची चौकशी केली जाईल”, असंही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Kolkata Doctor Case : काय आहे पश्चिमबंग छात्र समाज? नबन्नावरील मोर्चाआड विद्यार्थी संघटनेकडून कोलकात्यात हिंसाचार?

भाजपा खासदाराने केलेल्या या आरोपानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबियांकडूनही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं. मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी हे आरोप फेटाळून लावले. “सिद्धार्थ विहारा या संस्थेला जी जमीन हस्तांतर करण्यात आली, ती उद्योगांसाठी राखीव नाही, तर शैक्षणिक बाबींसाठी राखीव आहे. ही जमीन हस्तांतर करताना कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेलं नाही. किंवा ही जागेच्या किंमतीत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे या आरोपात कोणतेही तथ्य नाही”, असे ते म्हणाले. तसेच या जागेवर मल्टी स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यासंदर्भात कर्नाटकचे औद्योगिक मंत्री एम.बी. पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. “मल्लिकार्जुन खरगे यांचे पूत्र राहुल खरगे यांच्या संस्थेला जी जमीन देण्यात, ती नियमानुसार देण्यात आली आहे. त्यांना कोणतीही सुट करण्यात आलेली नाही. राहुल खरगे आयआयटी पदवीधारक आहेत. त्यांना या ठिकाणी मल्टी स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारायचे आहेत. नियमानुसार, औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असलेला काही भूखंड शैक्षणिक उद्देशांसाठी वापरता येऊ शकतो”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – MP Kangana Ranaut: भाजपाने खासदार कंगना रणौत यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्यापासून फारकत का घेतली?

महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक काँग्रेसने एक निवेदन जारी करत भाजपा खासदाच्या आरोपांचे खंडन केलं. “भाजपाचे खासदार लहरसिंग सिरोया यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. मुळात भाजपाच्या ज्या खासदारांनी हे आरोप केले आहेत. ते स्वत: स्थलांतरीत आहेत. ते मुळचे कर्नाटकचे नसून राजस्थानचे आहेत. त्यामुळे आधी त्यांनी कर्नाटकमधील त्यांच्या मालमत्तेची माहिती द्यावी. अशाप्रकारे खोटे आरोप करून भाजपाने पुन्हा त्यांची दलित विरोधी मानसिकता दाखवून दिली आहे”, असं प्रत्युत्तर कर्नाटक काँग्रेसकडून देण्यात आलं.

या सगळ्या घडामोडीनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते नारायणस्वामी यांनी प्रियांक यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. नारायणस्वामी यांनी दावा केला की “सिद्धार्थ विहारा ही संस्था बुद्ध विहार बांधण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. ती धार्मिक संस्था होती. ही संस्था उद्योग उभारू शकत नाही. प्रियांक खरगे हे मंत्री असून त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.