BJP Allies on Mustafizur Rahman IPL 2026 Exit : भारताच्या सीमेला लागून असलेल्या बांगलादेशात गेल्या महिन्यात प्रचंड हिंसाचार उफाळला. विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर राजधानी ढाकामध्ये हिंसक आंदोलने झाली. या आंदोलनादरम्यान तेथील अनेक अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. यापार्श्वभूमीवर बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानची आगामी आयपीएल स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने घेतलेल्या या निर्णयावर भाजपाच्या मित्रपक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. जनता दल (युनायटेड) आणि तेलगू देसम पार्टीच्या नेत्यांनी या प्रकरणावरून बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

भाजपाच्या मित्रपक्षांची भूमिका काय?

भारत व बांगलादेशातील संबंधात आणखीनच दुरावा निर्माण होईल असे निर्णय टाळायला हवे होते, असे खुद्द एका भाजपाच्याच नेत्याने मान्य केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. बांगलादेशात ईशानिंदेच्या आरोपावरून एका हिंदू व्यक्तीची जमावाने हत्या करून त्याला जाळण्यात आल्याची घटना घडल्यानंतर हा तणाव अधिक तीव्र झाला आहे. गेल्या महिन्यात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर सातत्याने हल्ले होत असल्याने तीव्र शब्दांत निषेध केला होता. याच पार्श्वभूमीवर मुस्तफिजुरला संघातून बाहेर करण्याचा निर्णय आल्याने त्याला राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

मुस्तफिझूर रहमानच्या हकालपट्टीवर नाराजी

मुस्तफिझूर रहमानला आयपीएलमधून डच्चू दिल्यानंतर निर्माण झालेला वाद आता अधिक गडद झाला आहे. जेडीयू आणि टीडीपी यांसारख्या भाजपाच्या मित्रपक्षांनी या मुद्द्यावर उघडपणे आपली मते मांडली आहेत. सध्याच्या परिस्थितीत भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंध शक्य नसल्याचे आम्हाला समजते. मात्र, तरीही क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवता आले असते, असे मत जेडीयूचे सल्लागार के.सी. त्यागी यांनी मंगळवारी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना व्यक्त केले. तेलुगू देशम पार्टीचे (TDP) नेते लावू श्रीकृष्ण देवरायलू यांनीही भारत-बांगलादेश संबंध अधिक बिघडवण्याऐवजी ते सुधारण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे सांगितले. दोन्ही देशांमध्ये यापूर्वी अत्यंत चांगले संबंध होते. सध्या काही तणाव निर्माण झाला असला तरी तो कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यापार, क्रीडा यांसारख्या अनेक क्षेत्रांत सहकार्याच्या संधी उपलब्ध आहे, असा सल्लाही देवरायलू यांनी दिला आहे.

आणखी वाचा : Shashi Tharoor : मुस्तफिझूर रहमानच्या हकालपट्टीवरून शशी थरूर का संतापले? कारण काय?

बांगलादेशच्या संघाचा भारतात येण्यास नकार

भाजपा आणि सरकारमधील काही सूत्रांच्या मते, आधीच तणावाखाली असलेल्या भारत-बांगलादेश संबंधांना अधिक धक्का देणारे निर्णय टाळायला हवे होते. भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील फरक आपण ओळखायला हवा. शेजारील राष्ट्रांसोबत तणाव वाढवणारी कोणतीही कृती टाळता आली असती. यादरम्यान मुस्तफिझूर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी झाल्यानंतर बांगलादेशच्या क्रिकेट संघानेही २०२६ टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. बांगलादेशने विश्वचषकासाठी भारतात पंच (अंपायर) न पाठवण्याचाही निर्णय घेतला. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) औपचारिक मागणी करून भारतातील आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती. परंतु त्यांची ही मागणी आयसीसीने धुडकावून लावली आहे. त्यामुळे बांगलादेशी खेळाडूंना विश्वचषकाचे सामने भारतात खेळावे लागणार आहे.

जेडीयूने घेतली शाहरुख खानची बाजू

बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे धार्मिक नेत्यांच्या दबावाखाली केकेआरने मुस्तफिझूर रहमानला संघातून काढून टाकल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणावर जेडीयूचे सल्लागार के. सी. त्यागी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खान (केकेआरचे सह-मालक) याच्याविरोधात फतवा काढणारे हे धार्मिक उपदेशक नेमके कोण आहेत? हा प्रकार स्पष्टपणे धार्मिक पक्षपात दर्शवतो. केकेआरमधील ४५ टक्के भागीदारी असलेल्या अभिनेत्री जुही चावला आणि त्यांचे उद्योगपती पती जय मेहता यांच्यावर टीका करण्याचे धैर्य त्यांनी का दाखवले नाही? असा प्रश्न त्यागी यांनी उपस्थित केला आहे. मी जेडीयूचा नेता म्हणून नव्हे तर एक सजग नागरिक म्हणून ही भूमिका मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : भाजपा-एमआयएमची अखेर युती तुटली; इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, फडणवीसांची ठाकरेंवर टीका, वाचा ५ घडामोडी….

ओमर अब्दुल्ला यांचीही वादात उडी

त्यागी यांच्या विधानानंतर जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी पक्षाची बाजू सावरून धरली आहे. बीसीसीआय आणि केकेआरने घेतलेला निर्णय हा हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचारांच्या मालिकेला दिलेली प्रतिक्रिया आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार कट्टरपंथीयांना रोखण्यात अपयशी ठरले आहे. केकेआरच्या निर्णयाला पक्षातील काही नेत्यांचा पाठिंबा असल्याचे राजीव प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या वादात उडी घेतली आहे. एका खेळाडूला बाहेर काढल्याने बांगलादेशातील परिस्थिती सुधारेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे शेजारील देशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी परस्पर अविश्वास अधिक वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानबरोबरचे आपले संबंध खराब असल्याचे मला मान्य आहे, पण बांगलादेशने भारतात कधीच दहशतवाद पसरवलेला नाही. त्यांच्याशी पूर्वीपासूनच आपले संबंध चांगले राहिलेले आहेत. सध्या तेथील हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये मुस्तफिझूर रहमानची काय चूक आहे? असा प्रश्न त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला आहे.