AIADMK Split News Tamil Nadu Politics: तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षात फूट पडली आहे. माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षाबाबत जी भीती व्यक्त केली जात होती, ती प्रत्यक्षात घडून येताना दिसत आहे. अण्णाद्रमुक मधील वरिष्ठ नेते एस.पी. वेलुमणी आणि सी.व्ही. षणमु्गम काही आमदारांसह जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाबरोबर सत्तेत सहभागी होणार आहेत. अण्णाद्रमुकच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. अण्णाद्रमुकचे नेते एडापद्दी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाविरोधात हे बंड करण्यात आले. त्यामुळे पलानीस्वामी यांचे पक्षातील महत्व आता कमी झाले आहे.
अण्णाद्रमुक नेते सी.व्ही. षणमुगम यांनी आज (मंगळवारी १२ मे) सकाळी याबाबत घोषणा केली. त्यांनी पलानीस्वामी यांच्यावर आरोप केले. “अण्णाद्रमुक पक्ष हा द्रमुकला विरोध करण्यासाठी स्थापन झाला होता. द्रमुक विरोधात आम्ही पाच वर्षे राजकीय लढा दिला. पण, पलानीस्वामी यांनी द्रमुकच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनण्याची तयारी केली होती. त्यांच्या या मनसुब्याला कोणत्याही आमदाराचे समर्थन नव्हते. आम्ही पलानीस्वामींच्या कृत्यांमुळे चकीत झालो”, असे षणमुगम म्हणाले.
अण्णाद्रमुक मधील असंतोषाचे मुख्य कारण काय?
अण्णाद्रमुक मधील नेत्यांनी वारंवार होणाऱ्या पराभवाने एडापद्दी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच ते पक्षाला सत्तेतजवळ घेऊन जाण्यापासून रोखत आहेत, नव्या शक्तींचा विरोध करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर होत होता. अण्णाद्रमुक पक्षातील खदखदीचे, असंतोषाचे मुख्य कारण म्हणजे अण्णाद्रमुकने विजय यांना समर्थन द्यायला हवे होते, सत्तेत सहभागी व्हायला हवे होते, असे मानणाऱ्या आमदारांची संख्या मोठी होती.
३० ते ३६ आमदारांसह नेते बंडाळीच्या तयारीत?
अण्णाद्रमुक पक्षातील ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या खात्रीशीर सुत्रांनी काल (११ मे) या बंडाबाबत माहिती दिली होती. किमान ३० ते ३६ आमदार आणि ज्येष्ठ नेते बंड करण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री एस. पी. वेलुमणी, सी. विजयभास्कर आणि ज्येष्ठ नेते सी. व्हे. षणमुगम या नेत्यांमध्ये विद्रोहाची भावना आहे. या नेत्यांच्या गटाने अण्णाद्रमुकने विजय यांच्या टीव्हीके पक्षाबरोबर जाऊन सत्तेत सहभागी व्हावे, अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेला एडापद्दी के. पलानीस्वामी यांनी प्रतिसाद दिला नाही, असे सूत्रांनी सांगितले होते. दरम्यान, अण्णाद्रमुक पक्षाचे एकूण ४७ आमदार आहेत.
अण्णाद्रमुकमध्ये नाराज असलेल्यांची संख्या अधिक असल्याने पलानीस्वामी यांचे पक्षातील महत्व यापूर्वीच कमी झाले आहे, असे अण्णाद्रमुकमधील एका सूत्राने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते. “पलानीस्वामी हे अधिकृतपणे पक्षाचे सरचिटणीस राहू शकतात. पण, पक्षातील शक्तीशाली नेते त्यांच्या बाजूने नाहीत.” आठवड्याभरात विजयबरोबर जाण्याची मागणी काही नेत्यांनी लावून धरली होती. त्यामुळे वाटाघाटी अपयशी झाल्यास अण्णाद्रमुकचे विभाजन होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
अण्णाद्रमुकचा सत्ता स्थापनेचा डाव का फिस्कटला?
द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सुरू असलेली चर्चा संपुष्टात आल्यानंतर अण्णाद्रमुक पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णाद्रमुकचे नेते एडापद्दी के. पलानीस्वामी हे मुख्यमंत्री होतील, तर अण्णाद्रमुक व द्रमुकचे छोटे मित्रपक्ष अण्णाद्रमुकच्या सरकारला समर्थन देत सरकारमध्ये सहभागी होतील. तसेच द्रमुक हा पक्ष पलानीस्वामी यांच्या सरकारला बाहेरून समर्थन देईल. दरम्यान, सत्तेतील वाटा आणि नेतृत्वावरून ही चर्चा पुढे सरकू शकली नाही. चर्चा रखडली.
विदुथलाई चिरूथाइगल कातची (व्हीसीके) पक्षाचे नेते थोल थिरूमवलवन यांनी पलानीस्वामी यांच्या मुख्यमंत्री बनण्यावरच आक्षेप घेतला. त्यानंतर थिरूमवलवन यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पलानीस्वामी यांनी विरोध केला. दरम्यान, शनिवारी व्हीसीके पक्षाने विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सत्ता स्थापनेसाठी समर्थन दिले. त्यानंतर अण्णाद्रमुकमधील नेत्यांचा संताप उफाळून आला.
पलानीस्वामी विरूद्ध वेलुमणी
पलानीस्वामी यांनी पक्षातील नेत्यांचा असंतोष कमी करण्यासाठी पक्षाच्या जिल्हा सचिवांच्या बैठका घेतल्या. परंतु, त्यात निम्म्याहून अधिक पदाधिकाऱ्यांनी अण्णाद्रमुकमधील नेते वेलुमणी यांच्या बाजूने असल्याचे संकेत दिले. कोइम्बतूर येथील वेलुमणी हे अण्णाद्रमुकमधील प्रभावी नेते आहेत. “अण्णाद्रमुकमध्ये पलानीस्वामी यांच्या आजूबाजूला असणारे किती लोक त्यांच्याप्रति निष्ठा ठेवून आहेत असा प्रश्न आहे”, असे एका नेत्याने म्हटले आहे. अण्णाद्रमुकमधील असंतोष असलेल्या गटाने दोन मागण्या पलानीस्वामींसमोर ठेवल्या आहेत. एक म्हणजे पलानीस्वामी यांनी पक्षाचे सरचिटणीस पद सोडणे, दुसरे म्हणजे पक्षाला टीव्हीके पक्षाबरोबर वाटाघाटी करण्याची अनुमती देणे.
अण्णाद्रमुकला ८ ते १२ मंत्रीपदे मिळणार?
मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सध्या सुरू आहे. एक किंवा दोन मंत्री पदे व्हीसीके पक्षाला, दोन मंत्री पदे काँग्रेसला आणि अण्णाद्रमुकला आठ ते १२ मंत्री पदे, त्यांचे किती आमदार सत्तेत सहभागी होतात यावर अवलंबून असेल. दरम्यान, पलानीस्वामी यांचे भाजपाशी असलेले संबंध बिघडल्याचे अण्णाद्रमुक मधील सूत्रांनी सांगितले. पलानीस्वामी यांनी भाजपाला फक्त २७ जागा दिल्या. त्या जागा अशा होत्या, जिथे भाजपा जिंकू शकणार नव्हता. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या युतीच्या चर्चेदरम्यान पलानीस्वामी यांनी भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याविषयी अवमानकारक भाषा वापरली होती. अण्णाद्रमुक मध्ये भाजपाच्या भूमिकेबद्दलही उघडपणे बोलले जात आहे. अण्णाद्रमुक पक्ष मागील पाच वर्षे विरोधी बाकावर बसला होता. सातत्याने पक्षाचा पराभव झाल्याने नेत्यांचे खच्चीकरण झाले आहे. राजकीय शक्ती सध्या विजय यांच्याभोवती एकवटली असल्याने सत्तेच्या बाहेर राहिल्यास पक्षाचे आणखी नुकसान होईल, अशी भीती अण्णाद्रमुक मधील बंडाळीच्या तयारीत असलेल्या गटाला होती.
