उमाकांत देशपांडे लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ‘महाविजय’ संपादन करण्यासाठी भाजपने पक्षातील वयोवृद्धांना साद घातली आहे. जनसंघापासूनच्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचार यंत्रणेत सामील करून घेण्यात येणार असून त्यासाठी ‘स्व. नानासाहेब तथा उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियान’ सुरू करण्यात आले आहे.

भाजपने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदान केंद्र (बूथ) आणि मतदारयादी निहाय (पन्ना प्रमुख) कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज लागणार आहेत. हे लक्षात घेऊन भाजपने जुन्या, जाणत्या व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची फौज बांधण्यास सुरूवात केली आहे.

आणखी वाचा- उजनीचा ‘गाळ’ राष्ट्रवादीसाठी ‘काळ’?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी-लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातील भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या कार्यकाळात आमूलाग्र बदलला. निवडणूक यशासाठी गरजेच्या सर्व तडजोडी केल्या. सर्व राजकीय पक्षांमधून ‘ निवडणूक गुणवत्ताधारक ‘ नेते व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. त्यांना गरजेनुसार सत्तापदे, पक्षातील पदे दिली गेली. या संस्कृति बदला मुळे भाजपचा जुना कार्यकर्ता पक्षापासून मनाने दुरावत गेला. आपल्याला पक्ष किंमत देत नाही, काम किंवा जबाबदारी दिली जात नाही, आमच्या त्याग व कामाच्या बळावर पक्ष उभा राहिला तरी अन्य पक्षातून आलेल्या नेते व कार्यकर्त्यांना महत्व दिले जाते, ही नाराजीची भावना जनसंघापासून किंवा गेली अनेक वर्षे पक्ष कार्यात झोकून दिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही वर्षात वाढीस लागली.

आणखी वाचा- Karnataka Election : भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या आमदाराविरोधात श्रीराम सेनेची याचिका; भाजपाच्या अडचणी वाढणार?

त्याचा विचार करून आणि पक्षाला असलेली जुन्या विश्वासू, निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज लक्षात घेऊन माजी उपमुख्यमंत्री, पहिले प्रदेशाध्यक्ष नानासाहेब उर्फ उत्तमराव पाटील यांच्या नावाने अमृत अभियान सुरू करण्यात आले आहे. वयाची साठी पूर्ण केलेल्यांपासून ऐंशीच्या घरात असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना या अभियानात सामावून घेतले जाणार आहे. प्रत्येक गावातून किमान एक अशी तालुका व जिल्हा पातळीवर रचना राज्यभरात केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा करून या मोहीमेचे नियोजन केले असून राज्य संयोजकपदी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि म्हाडा घरदुरूस्ती मंडळाचे माजी अध्यक्ष, प्रवक्ते मधू चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत मोठा विजय संपादन करायचा असेल, तर नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची गरज लागणार आहे. जुन्या, वयोवृद्ध कार्यकर्त्यांना पदाची अपेक्षा नाही व ते निष्ठावंत आहेत. त्यामुळे त्यांना महत्व देवून बरोबर घेतल्यास विजय संपादन करण्यास मोठा हातभार लागेल, हे ओळखून हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp amritkumbha abhiyan for the elderly worker involve in the election campaign system print politics news mrj
First published on: 19-03-2023 at 15:11 IST