चंद्रपूर : लोकसभा, विधानसभा निवडणुका सध्या टप्प्यातही नाहीत. त्यांना अजून ११ महिने शिल्लक आहेत. तरीही या निवडणुकांना डोळ्यापुढे ठेवून चंद्रपूर जिल्ह्यात ‘महोत्सवी’ राजकारण जोरात सुरू आहे. जनसामान्यांचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्याऐवजी या जिल्ह्यातील भाजप व काँग्रेस पक्षाचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्सव, महोत्सवाचे भांडवल करीत आहेत.
महाकाली महोत्सव, ब्रम्हपुरी महोत्सवापाठोपाठ आता अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठीच्या सागवान काष्ठ सोहळ्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य समस्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, पाणी, बेरोजगारी, प्रदूषण, रस्ते, ग्रामीण भागातील पायाभूत समस्या, मानव-वन्यजीव संघर्ष कायम आहे. या समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महोत्सवी राजकारण सुरू केले आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा व चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, ब्रम्हपुरी व चिमूर असे सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यात महोत्सवाची सुरुवात काँग्रेस नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून केली होती. त्यानंतर त्यांनीच गणेशोत्सवानिमित्त ५६ भोग कार्यक्रमाचे सलग दोन ते तीन वर्षे आयोजन केले. मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या या उत्सवी आयोजनाला काही प्रमाणात मर्यादा आल्या.
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी यावर्षीपासून महाकाली महोत्सवाला सुरुवात केली. या महोत्सवाला जनतेकडून प्रतिसादही चांगला मिळाला. या महोत्सवाची जनसामान्यात चर्चाही झाली व त्याचा परिणाम आमदार जोरगेवार यांच्या प्रतिमा संवर्धनात झाला. त्याच धर्तीवर जोरगेवार यांनी महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले. करोनामुळे सलग दोन वर्षांचा खंड पडलेला ब्रम्हपुरी महोत्सव माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी यंदा धुमधडाक्यात साजरा केला. मराठी सिने कलावंतांपासून बॉलिवूडमधील अनेक नट-नट्यांना त्यांनी ग्रामीण भागात आणले. तिकडे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा-भद्रावतीत कबड्डी स्पर्धा तसेच अन्य स्पर्धा, चंद्रपुरात भाऊंचा दांडिया महोत्सव आयोजित केला. राजुराचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा येथे राज्यस्तरीय कबड्डी महोत्सव घेतला. राजकीय प्रतिस्पर्धी असे एकापाठोपाठ एक महोत्सव घेत असताना राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तरी कसे मागे राहणार? मुनगंटीवार यांनी संधी मिळताच अयोध्या मंदिरासाठी पाठवण्यात येणाऱ्या चिराण सागवान काष्ठाचा अतिशय भव्य दिव्य सोहळा आयोजित केला. हा सोहळा म्हणजे इतर लोकप्रतिनिधींनी यापूर्वी घेतलेल्या विविध महोत्सवांना दिलेले चोख उत्तर मानले जात आहे.
मुनगंटीवार यांनी हा सोहळा इतका नेत्रदीपक करून दाखवला की सध्या जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरही या सोहळ्याचीच चर्चा आहे. उत्तर प्रदेशातील तीन कॅबीनेट मंत्र्यांपासून राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, रामायणातील तिन्ही प्रमुख कलावंत अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लाहेरी, अयोध्या राममंदिर ट्रस्टचे श्री गोविंददेव गिरी महाराज यांची उपस्थिती, कैलास खेर यांच्या रामभक्तीपर भजनाचा कार्यक्रम, लेझर शो, आतषबाजी असे सर्वच काही अवर्णनीय होते. चंद्रपूर व बल्लारपूर या दोन शहरात तर सागवान काष्ठ शोभायात्रा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केली गेली. राज्याच्या विविध भागांतील दोन हजारांपेक्षा अधिक लोककलावंतांचा समावेश त्यांनी या शोभायात्रेच्या मिरवणुकीत केला. काँग्रेस नेते नरेश पुगलिया, युवा नेते राहुल पुगलिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यापासून तर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी हा सोहळा जणू राजकीय आव्हान ठरले आहे.
हेही वाचा – अवघे वय ९१… तरीही निवडणुकीच्या रिंगणात
लोकसभेत मुनगंटीवारच…?
सागवान काष्ठ सोहळ्यात सर्वत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रकाशझोतात होते. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे मोठमोठे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विशेष म्हणजे, माजी गृहराज्यमंत्री तथा ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा एकही फलक, शोधूनही दिसला नाही. त्यामुळे मुनगंटीवार लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार हीच चर्चा सुरू आहे.