महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : भाजपाने मराठी सक्तीपाठोपाठ आणखी एका महत्वाच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देऊन शिवसेना शिंदे गटावर पुन्हा कुरघोडी केली… देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला… पुण्यातील टिळक रोडवर विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली… प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला… महाराष्ट्रात वीज महाग असतानाच आता कोळसा खरेदीच्या नव्या निविदेवरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप केले… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेसेनेवर भाजपाची पुन्हा कुरघोडी

भाजपाने मराठी सक्तीपाठोपाठ आणखी एक महत्वाच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देऊन शिवसेना शिंदे गटावर पुन्हा कुरघोडी केली. शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी अनिवार्य केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डला भाजपाचे नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले. यावरून सरनाईक यांनी शेलार यांच्या भूमिकेवर थेट प्रतिक्रिया देत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आतापर्यंत ९.१ कोटी प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे. हे कार्ड लागू करणे आवश्यक आहे, अन्यथा एसटीच्या अनुदानातून वित्त विभाग वारंवार अडचणी निर्माण करेल. आशिष शेलार यांनी परिवहन मंत्री म्हणून आधी माझ्याशी चर्चा केली असती, तर तेव्हाच सामोपचाराने तोडगा निघाला असता, अशी खंत सरनाईक यांनी बोलून दाखवली. काही दिवसांपूर्वी सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकाला मराठी भाषा येणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयातही भाजपाने हस्तक्षेप केल्याचे पाहायला मिळाले होते.

फडणवीस लवकरच उपपंतप्रधान होणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मोदींचा वारसदार म्हणून फडणवीस यांना पुढे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याचेही राऊत यांनी म्हटले. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, सध्या दिल्लीत कार्यरत नसलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याला उपपंतप्रधान करण्याची तयारी सुरू आहे. मोदींचा वारसदार म्हणून पुढे येणाऱ्या या नेत्याला आधी उपपंतप्रधान करण्याची संघाची भूमिका आहे. फडणवीस यांना दिल्लीत बोलावणार असून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे, असा दावाही राऊत यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर भाजपाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण करण्यात आली. टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संतोष चव्हाण नामक व्यक्तीला तातडीने अटक केली. आरोपी संतोष हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले, तर आमदार रोहित पवार यांनीही घटनेचा तीव्र निषेध करताना बापट यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. अशा पद्धतीने मारहाण करणे योग्य नाही. प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. आपला गणेशोत्सव १०० टक्के पारंपरिक पद्धतीने साजरा केला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

प्रहारचे अनिल चौधरी अखेर शिंदे गटात!

प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. चौधरी यांनी विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारीची जोरदार तयारी करून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केले होते. आता त्यांनी अचानक शिंदे गटाची कास धरल्यामुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा मतदारसंघ असलेल्या भुसावळमध्ये यापूर्वीपासूनच विविध राजकीय गटांमध्ये प्रभावासाठी चुरस आहे. मंत्री सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव पत्कराला लागला तेव्हापासून त्यात आणखी भर पडली आहे. अशा परिस्थितीत अनिल चौधरी यांचा शिंदे गटातील प्रवेश कोणत्या राजकीय समीकरणांना बळ देतो आणि त्याचा आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कितपत परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

महाराष्ट्रात वीज महाग असतानाच आता कोळसा खरेदीच्या नव्या निविदेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप केले. दरवर्षी ३० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदेत पुरेशी स्पर्धा नसल्याने महाग दराने कोळसा खरेदी होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. या खरेदीचा परिणाम अखेर वीजदरावर आणि राज्यातील जनतेवर होईल, असा आरोप करत पटोले यांनी निविदा रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. महाराष्ट्रातील महागड्या विजेमुळे अनेक उद्योग अन्य राज्यांत जात असून त्यातून बेरोजगारी वाढत असल्याचा दावा पटोले यांनी केला. आता महाग कोळसा खरेदी केल्यास महाराष्ट्र पुन्हा ‘महागड्या विजेच्या चक्रव्यूहात’ अडकेल, असा इशारा देत त्यांनी संबंधित कोळसा खरेदी निविदा तातडीने रद्द करण्याची मागणी केली. यादरम्यान पटोले यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.