पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी जेमतेम दोन दिवस राहिले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना स्थानिक पातळीवर प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, बारामतीत प्रचार करायचा की नाही, या संभ्रमावस्थेत भाजप पडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीत शोककळा असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबाबत सहानुभूतीची लाट आहे. या परिस्थितीत पक्षाचे उमेदवार अडचणीत असल्याने भाजप विवंचनेत पडली आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनाने पुणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारावर दु:खाचे सावट आहे. या दुर्घटनेनतंर सर्व पक्षांनी प्रचार थांबवला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सोमवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या आणि छोटेखानी बैठका आणी मेळाव्यांवर भर देण्याच्या सूचना केल्या. प्रचारासाठी प्रदेश स्तरावरील मंत्री किंवा पदाधिकारी येणार नसल्याने स्थानिक पातळीवर प्रचार करण्याचे आदेश दिले. या बैठकीला राज्याचे उच्च व तंत्रिशक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे, पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, पुणे उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आदी उपस्थित होते. चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्ह्यातील पदाधिकारी हे कामाला लागले आहेत. मात्र, बारामतीत दु:खाचे वातावरण असताना प्रचार करायचा की नाही, असा प्रश्न भाजपपुढे पडला आहे.

अजित पवार हे या निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीत येत असताना दुर्घटना घडली. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आता सात फेब्रुवारी रोजी मतदान आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. प्रचाराची सांगता पाच फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता केला जाणार आहे. प्रचारासाठी कमी अवधी शिल्लक राहिला असताना, बारामतीत प्रचार करायचा की नाही, या विवंचनेत भाजप पडली आहे.

पुणे जिल्हा परिषदेमध्ये ७३ गट आणि पंचायत समितीचे १४६ गण आहेत. बारामतीमध्ये जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे १२ गण आहेत. अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे सर्व ठिकाणी उमेदवार आहेत. भाजपने जिल्हा परिषदेत चार ठिकाणी आणि पंचायत समितीत ११ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांचा प्रचार करायचा की नाही, या कोंंडीत भाजप सापडली आहे.

दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे बहुजन समाज पक्षाचे महासचिव काळुराम चौधरी यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाजप कोणती भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.

भाजपचे नेते रंजन तावरे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्याबरोबर हातमिळवणी केल्याने बारामतीत स्थानिक नेतृत्व राहिलेले नाही. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर बारामतीतील प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.