नागपूर : नागपूर महापालिकेत सलग चौथ्यांदा बहुमताने सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा सत्तेचा चौथा अंक तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर सोमवारी महापौरांच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने सुरू झाला.. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षातर्फे परिसरात लावलेला फलक सर्वांचे लक्ष वेधणरा ठरला. ‘रण भी जिता, मन भी जीता ’ असे त्यावर लिहिले होते. ‘आम्ही निवडणुकांसोबत लोकांची मनही जिंकली’ असा दावा भाजपने या फलकाच्या माध्यमातून केलेला आहे. भाजपने निवडणूक जिंकली हे सत्य आहे, पण लोकांची मनेही जिंकली का ? हा प्रश्न आहे. त्यासाठी भाजपचा ‘नागपूर पॅटर्न’ समजून घेणे महत्वाचे ठरते.

२००५, २०१२ आणि २०१७ अशा सलग तीन निवडणुका जिंकणा-या भाजपने १५ वर्ष महापालिकेत एक हाती राज्य केले. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या कोणत्याही पक्षासमोर सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे एन्टी-इनकम्बसी. नागपूरमध्ये भाजपच्या बाबतीत हे आव्हान २०२२ मध्ये लोकप्रतिनिधींचा कार्काळ संपल्याने तीव्र स्वरूपात उभे राहिले होते. याच वेळी निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित आत्ता (२०२६) जे निकाल आले ते या उलट दिसले असते. अनावश्यक बांधकामे, विस्कळीत नागरी सुविधा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पाणीपुरवठा यामुळे नागपूरकरांमध्ये प्रचंड असंतोष होता. हा असंतोष थेट सत्ताधारी भाजपविरोधात जाण्याची दाट शक्यता होती. ही बाब भाजपने अचूक ओळखली आणि निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचा निर्णय झाला. तो ही तब्बल तीन वर्षापर्यंत. हा काळ एखाद्या सत्ताधा-यांविरूध्दची नाराजी ( एन्टी इनकम्बसी) कमी करण्यासाठी पुरेसा होता.हा निर्णय केवळ प्रशासकीय नव्हे, तर पूर्णतः राजकीय रणनीतीचा भाग होता.

नाराजीची दिशा बदलण्याचे साधन

तब्बल तीन वर्षे प्रशासकीय राजवट ठेवून भाजपने दोन महत्त्वाची उद्दिष्टे साध्य केली. जनतेतील रागाची तीव्रता कमी केली ,त्या रागाची दिशा पक्षाकडून प्रशासनाकडे वळवली, हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण १५ वर्षे सत्तेत असूनही भाजपने या काळात स्वतःच विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली.जे काम काँग्रेससारख्या विरोधी पक्षाने करायला हवे होते ते या पक्षाने केले.

प्रशासनावर टीका, गैरसोयींबाबत आंदोलन, कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेचे आरोप या सगळ्यामुळे लोकांच्या मनात महापालिकेतील अपयशासाठी “प्रशासक जबाबदार” अशी धारणा निर्माण झाली. याच काळात हळूहळू महापालिकेत एक नवीन नॅरेटिव्ह उभा केला गेला, “उत्तम नागरी सुविधा हव्या असतील, तर लोकनियुक्त प्रतिनिधी आवश्यक आहेत.” हा मुद्दा लोकांच्या मनात रुजवण्यात पक्ष यशस्वी ठरली. इथेच गेम पालटला.भाजपविरोधातील नाराजी हळूहळू कमी होऊ लागली.

केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने भाजपने दोन्ही सरकारच्या माध्यमातून लोकप्रिय घोषणांचा धडाका सुरू केला. जनता दरबार घेणे सुरू केले. बैठकांचे सत्र सुरू झाले. केंद्रात, राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचीच महापालिकेत सत्ता आली तर नागपूरचा विकास होईल,असे स्वप्न दाखवणे सुरू झाले. विरोधीपक्ष कसा कमकुवत होईल याचे प्रयत्न सुरू झाले. एकूणच १५ वर्ष सत्तेवर असूनही लोकांना सांगण्या सारखे काहीही करू न शखलेल्या भाजपने केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकप्रिय योजनांचा जोरदार प्रचार केला “डबल इंजिन सरकार”चा लाभ महापालिकेला मिळेल, असा विश्वास निर्माण केला. निवडणुकीच्या घोषणेनंतर शेवटच्या टप्प्यात सत्ता, प्रशासन , प्रचार या त्रिसूत्रीमुळे भाजप पुन्हा सत्तेत येण्यात यशस्वी ठरली. भाजपचा हा विजय हा केवळ निवडणुकीतील यश नसून,तो वेळेचे नियोजन, प्रशासकीय वापर, नॅरेटिव्ह बदल आणि सत्तेच्या प्रभावी वापराचा नमुना आहे.

नव्या इनिंगला सुरूवात

सोमवारी नवीन महापौरांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. नव्या जबाबदाऱ्या सुरू झाल्या आहेत. आता या पक्षाला पूर्वी प्रमाणे नागरी सुविधांबद्दल प्रशासनाकडे बोट दाखवण्याचा पर्याय उरलेला नाही. जर, नागरी सुविधा सुधारल्या नाहीत जाहीरनाम्याची अंमलबजावणी झाली नाही तर २००५ पासून सुरू असलेली लोकांची दिशाभूल करण्याची परंपरा पुढेही सुरू आहे, असा ठाम समज जनतेत रुजेल.