संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी संधी देऊन भाजपने बिहारचा प्रयोग राज्यात राबविला आहे. बिहारमध्ये आमदारांची संख्या जास्त असतानाही मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांच्याकडे कायम ठेवले. तसेच राज्यातही आमदारांची संख्या दुप्पट जास्त असतानाही भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी पाठिंबा देऊन भविष्यातील राजकीय लाभासाठी ही खेळी केली आहे.

शिंदे यांना शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळाला तरीही भाजपचे संख्याबळ शिवसेना किंवा शिंदे यांच्या गटापेक्षा दुप्पट अधिक आहे. शिंदे यांच्या बंडानंतर भाजप मुख्यमंत्रीपद मिळविणार असे चित्र होते. पण भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन धक्कादायक खेळी केली आहे. बिहारमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ७४ तर जनता दलाचे (यू) ४३ आमदार निवडून आले होते. संख्याबळानुसार भाजपचा मुख्यमंत्रीपदावर दावा होता. कारण आघाडीच्या राजकारणात संख्याबळ अधिक त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरलेले असते. बिहारमध्ये निवडणुकीच्या आधी भाजप व जनता दल (यू) युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा नितीशकुमार हा होता. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपद भाजप स्वत:कडे घेईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण भाजपने नितीशकुमार यांनाच पसंती दिली.

बिहारमध्ये नितीशकुमार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ओबीसी समाजातील ते बडे नेतृत्व आहे. नितीशकुमार यांच्या तोडीचा चेहरा भाजपकडे नव्हता. नितीशकुमार व एकनाथ शिंदे यांची तुलना होऊ शकत नाही. कारण नितीशकुमार यांच्यासारखा जनाधार शिंदे यांचा अद्याप तरी राज्यात प्रस्थापित झालेला नाही. तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यात शिंदे एवढे लोकप्रियही नाहीत. तरीही भाजपने शिंदे यांना पसंती दिली.

शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यामागे एक गोष्टा निश्चित आहे व ती म्हणजे शिंदे यांनी शिवसेनेची सारी सूत्रे ताब्यात घ्यावी, हा भाजपचा प्रयत्न असेल. युती करून प्रादेशिक पक्षांना संपविण्याची भाजपची रणनीती असते. आसाममध्ये आसाम गण परिषद, गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष यांना संपवून भाजपने आपला पाया भक्कम केला होता. बिहारमध्ये तसा प्रयत्न झाला असला तरी नितीशकुमार यांची लोकप्रियता अधिक आहे.

बिहारमध्ये भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळाले तरीही नितीशकुमार यांनी भाजपवर कुरघोडी करण्याची संधी सोडलेली नाही. अगदी अलीकडे ओबीसी जनगणना करण्याचा निर्णय घेऊन भाजपला मोठे आव्हान दिले. या निर्णयाने ओबीसी समाजात नितीशकुमार यांचे नेतृत्व अधिक घट्ट झाले. शिंदे यांना भाजपला अंगावर घेता येणार नाही.

शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपने देवेंद्र फडणवीस यांनाही हलकेसे झटका दिल्याचे मानले जाते. कारण शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा तसेच सरकारबाहेर राहण्याचे फडण‌वीस यांनी जाहीर केले. फडणवीस यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेलाही हा धक्का मानला जातो. फडणवीस यांचे केंद्रात पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp bihar pattern in maharashtra print politics news asj
First published on: 30-06-2022 at 18:38 IST