आजच्या महत्वाच्या घडामोडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अकोट नगरपरिषदेतील भाजपा आणि एमआयएमची युती अखेर तुटली… अंबरनाथ नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाशी युती केल्याने काँग्रेसने आपल्या पक्षातील अनेक नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली… ठाकरे गट आणि मनसेच्या युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा पराभव होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला… एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कारवर काही तरुणांनी अंडी फेकून मारल्याचा प्रकार घडला… मुंबईत राज ठाकरे यांच्या मनसेत नाराजी उफाळून आली असून अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपा-शिंदे गटात प्रवेश केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

भाजपा-एमआयएमची अखेर युती तुटली

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येणे कठीण आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले. यादरम्यान अकोट नगरपरिषदेत सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी एमआयएमबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या युतीवरून शिवसेना ठाकरे गटासह इतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपावर टीकेचा प्रहार केला. चौहेबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोटमधील भाजपाच्या स्थानिक नेत्यांना कारवाईचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपाने एमआयएमबरोबरची युती तोडण्याचे जाहीर केले. यादरम्यान नगरपरिषदेत एमआयएमबरोबर युती करण्याचा निर्णय घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भाजपाकडून नोटीस बजावली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे अकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे, शहराध्यक्ष, निवडणूक प्रभारी, गटनेते आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

काँग्रेसची नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई

अंबरनाथ नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाशी युती केल्याने काँग्रेसने आपल्या पक्षातील अनेक नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. नगर परिषदेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपाच्या १४ नगरसेवकांसोबत युती केली होती. तसा गटही त्यांनी स्थापन केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. यादरम्यान त्यांच्या कार्यकारिणीलाही निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केलेल्या अधिकृत पत्रातून ही माहिती दिली आहे. अंबरनाथमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरीही शिंदेंची शिवसेना हा २७ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यादरम्यान नगर परिषेदत त्यांना फटका देण्यासाठी भाजपाने काँग्रेसशी युती केली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही युतीत घेतले आहे. त्यावरून शिंदेसेनेने संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : राजधानी दिल्लीत मोठ्या आंदोलनाची तयारी? कारण काय? लडाखमधील चर्चा कशामुळे फिस्कटली?

फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

ठाकरे गट आणि मनसेच्या युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा पराभव होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. ‘Raj Thackeray Will Be Biggest Loser’ ही माझी भविष्यवाणी असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीनंतर तुम्हाला याची प्रचिती येईल असा दावाही त्यांनी मुलाखतीदरम्यान केला आहे. गेल्या २५ वर्षात ठाकरेंनी माणसांचा विश्वास गमावला आहे. मुंबईतून मराठी माणूस बाहेर का गेला? इतकी वर्ष महापालिकेत तुमची सत्ता असूनही मुंबईत मराठी माणसाला हक्काचे घर का मिळाले नाही? त्यांना वसई, विरार, नालासोपारा इथे का जावे लागले? असा प्रश्नही मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंना विचारला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत सत्ताधारी महायुतीला मोठे यश मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला

एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कारवर काही तरुणांनी अंडी फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर सलीमनगर आणि संजयनगर भागाजवळील पाण्याच्या टाकीजवळच्या इम्तियाज जलील यांचेही समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. त्यांच्या एका नेत्याने हा हल्ला कलीम कुरेशी यांच्याकडून घडवून आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे- हा हल्ला घडवून आणणाऱ्या गुंडाना पैसा पुरविण्याचे काम मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाट करीत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना, शेर आया म्हणून घोषणा द्यायला लावणारा माणूस पळून गेला आहे. त्यामुळे हे त्यांच्याच कर्माचे पाप असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

हेही वाचा : फडणवीसांना हटवण्यासाठी भाजपाचाच गट सक्रिय? अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावे, नवनीत राणांचा सल्ला; वाचा ५ घडामोडी…

निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेला गळती

मुंबई महापालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी ठाकरे बंधूंची धडपड सुरू असतानाच मनसेतील नाराजी टोकाला गेली आहे. मनसेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. धुरी यांनी भाजपात तर चौगुले यांनी शिंदे गटाची कास धरली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही नाराज पदाधिकारी राज ठाकरे यांची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेला घरघर लागल्याने ठाकरे यांची चिंता वाढली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने युतीची घोषणा केली होती. त्यानंतर मुंबईतील जागावाटपात मनसेच्या वाट्याला ५२ जागा मिळाल्या. त्यावरून मनसेत नाराजी असून राज ठाकरे यांनी पक्षाला ठाकरे गटाच्या स्वाधीन केल्याचा आरोप मनसैनिकांकडून केला जात आहे. राज ठाकरे यांनी हक्काच्या जागा शिवसेनेला दिल्याने पक्षाचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगत अनेकांनी अन्य पक्षांची वाट धरायला सुरुवात केली आहे.