महाराष्ट्रातील आजच्या राजकीय घडामोडी : विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचपैकी केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागल्याने भाजपा आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेला… फडणवीसजी एवढ्यातच घाबरलात हा फक्त ट्रेलर असल्याचे म्हणत २०२९ मध्ये जनता तुमचा कंडकाच पाडेल, अशी टीका काँग्रेसने केली… शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाप्रमुख आणि नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’ दूध संघातील पराभवाचे खापर थेट भाजपावरच फोडले… काँग्रेस नेत्यांच्या ‘सेटिंग’ मुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे यांचा पराभव झाल्याची टीका नवनीत राणा यांनी केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदेसेनेने ‘दगाफटका’ केल्याचा भाजपाचा आरोप
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला पाचपैकी केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागले. या अपयशानंतर भाजपा आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेला आहे. निवडणुकीत मित्रपक्षानेच ऐनवेळी ‘दगाफटका’ केल्याचा थेट आरोप करत भाजपाने आपल्या पराभवाचे खापर शिंदे गटावर फोडले आहे, तर दुसरीकडे भाजपाची ‘चुकीची उमेदवार निवड’ आणि त्यांच्याच पक्षातील ‘असंतोष व अंतर्गत बंडखोरी’ यांमुळे हा घात झाल्याचा पलटवार शिंदे गटाने केला आहे. या निकालानंतर महायुतीमधील वरकरणी दिसणारी एकजूट मोडीत निघाल्याची चर्चा आहे. सत्ताधारी पक्षांनीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उठवल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
फडणवीसांच्या डिलिट पोस्टवरून काँग्रेसची टीका
विधान परिषदेच्या पाच जागांचे कल हाती येण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये काँग्रेसला निवडणुकीत भोपळाही फोडता आला नसल्याची खिल्ली उडवण्यात आली होती. त्यानंतरच्या काही तासांतच नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला अस्मान दाखवले. त्यामुळे फडणवीसांवर पोस्ट डिलिट करण्याची वेळ आली. यावरून काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. पोस्ट डिलीट करून फडणवीसांनी पुन्हा एकदा सावरकरांचा वारसा जपला! संपूर्ण निकाल हाती येण्याआधीच मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात फडणवीसांनी ट्विट केलं. पण तोच तीर उलटला आणि थेट त्यांच्या छातीत घुसला! फडणवीसजी, एवढ्यातच घाबरलात? हा तर फक्त ट्रेलर आहे! २०२९ मध्ये महाराष्ट्राची जनता तुमचा असा काही राजकीय कंडका पाडेल की, आजचं हे ट्विटही तुम्हाला आठवेल! असे काँग्रेसने म्हटले आहे.
शिंदेसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा
शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाप्रमुख आणि नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी तडकाफडकी आपल्या पदांचा राजीनामा दिला. ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात आरोपांची सरबत्ती झाल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी सूचना बुधवारी पत्रकार परिषदेत केली होती. विशेष म्हणजे, २४ तास उलटत नाही तोच मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला आहे. दरम्यान पूर्णकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटातील नेत्यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मीनाक्षी आणि त्यांच्या पतीची स्वतंत्रपणे चौकशीही केली आहे. ठाकरे गटाचे सर्व आरोप शिंदे दाम्पत्याने फेटाळून लावले आहेत.
मुश्रीफांनी पराभवाचे खापर भाजपावर फोडले
विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरून महायुतीत मिठाचा खडा पडला असतानाच गोकुळ दूध संघातील पराभवावरूनही सत्ताधाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळमधील पराभवाचे खापर थेट भाजपावरच फोडले आहे. भाजपाबरोबरच्या वादामुळे गोकुळच्या निवडणुकीत पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या वेळी महायुतीतील वाद मिटला नाही, त्यामुळे १३ आणि १२ असा निकाल लागला, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. त्याचवेळी गोकुळच्या नव्या अध्यक्षपदाबाबत संकेत देताना मुश्रीफ म्हणाले की, अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत पाटील आहेत. बंटी पाटील त्यांना अध्यक्ष करणार होते. मात्र, आता शशिकांत पाटील-चुयेकर यांना भविष्यात अध्यक्ष बनवण्याची जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागेल, असे सूतोवाच त्यांनी केले आहे. त्यांच्या या आरोपाला आता भाजपा काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नवनीत राणा यांची काँग्रेसवर सडकून टीका
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे किरण सरनाईक यांचा विजय झाला, तर काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावरून भाजपाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना जोरदार टोला लगावला. काँग्रेसच्या नेत्यांच्या ‘सेटिंग’मुळे अदिती पोहरे यांचा पराभव झाला, अशी टीका त्यांनी केली. नवनीत राणा म्हणाल्या की, काँग्रेसतर्फे निवडणूक लढणाऱ्या अदिती पोहरे या सक्षम उमेदवार होत्या; HC एखादा बळी जाण्यास तयार असेल, तर तो अमरावतीतून काँग्रेसचा उमेदवार होतो, अशी परिस्थिती झाली आहे. इतिहास पाहिला तर सर्वांना हे लक्षात येईल. काँग्रेसचा उमेदवार कितीही सक्षम असो, पण ज्या पद्धतीने नेत्यांनी ‘सेटिंग’ केली, ते आमदार रवी राणा यांना माहिती आहे. काँग्रेसचा उमेदवार होण्याआधी एकवेळा विचार करावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.
