"राहुल गांधी गुजरातविरोधी", 'भारत जोडो' यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागानंतर भाजपाचा हल्लाबोल, काँग्रेसच्या अडचणी वाढणार?BJP called Rahul Gandhi anti Gujaratis after Narmada Bachao activist Medha Patkar joins Bharat Jodo Yatra | Loksatta

“राहुल गांधी गुजरातविरोधी”, ‘भारत जोडो’ यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागानंतर भाजपाचा हल्लाबोल

गुजरातच्या सरदार सरोवर प्रकल्पाविरोधात मेधा पाटकर यांनी ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाचे नेतृत्व केले होते

Medha Patkar joined Bharat Jodo Yatra
(फोटो सौजन्य- 'भारत जोडो' ट्विटर)

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यान त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीवरुन भाजपाने राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी मेधा पाटकरांप्रमाणेच गुजरात विरोधी आहेत, असा प्रचार गुजरातमध्ये केला जात आहे. गुजरात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वी भाजपाकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राहुल गांधींच्या पदयात्रेत महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षांचा वाहनातून प्रवास

गुजरातच्या सरदार सरोवर प्रकल्पाविरोधात पाटकर यांनी ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाचे नेतृत्व केले होते. हा प्रकल्प गुजरातच्या विकासाचा केंद्रबिदू असून पाटकर यांच्यामुळे तो अनेक वर्ष रखडला, असा आरोप नरेंद्र मोदींकडून वारंवार करण्यात आला आहे.

राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत अनवाणी… भारत जोडो यात्रेकरू दिनेश शर्मांची पायपीट…

मेधा पाटकर यांच्या ‘भारत जोडो’मधील सहभागावरून गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी टीकास्र सोडलं आहे. “काँग्रेस आणि राहुल गांधींनी गुजरात आणि गुजरात्यांविषयीचं वैर वारंवार दाखवून दिलं आहे. मेधा पाटकरांना यात्रेत मध्यवर्ती स्थान देऊन राहुल गांधींनी गुजरातला पाणी नाकारणाऱ्या घटकांच्या पाठिशी आपण उभे असल्याचे सिद्ध केले आहे. गुजरात हे सहन करणार नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया पटेल यांनी दिली आहे.

भारत जोडो यात्रेत गांधी-नेहरू उतरले रस्त्यावर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनीही गांधी-पाटकर भेटीवरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “शहरी नक्षली मेधा पाटकर यांनी नर्मदा प्रकल्पाला विरोध करून कच्छ आणि संपूर्ण गुजरातच्या विकासाला खीळ घातली होती. गुजरातच्या विकासाच्या विरोधात असणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांसोबत काँग्रेस सध्या ‘भारत तोडो’ यात्रा करत आहे. शहरी नक्षल्यांसोबत असलेल्या लोकांना गुजरात कधीही पाठिंबा देणार नाही”, असं पाटील म्हणाले आहेत.

“…तर २०२४ ही माझी शेवटची निवडणूक ठरणार” ; चंद्रबाबू नायडूंचं मोठं विधान!

दरम्यान, या भेटीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अप्रत्यक्ष टीका केली आहे. “विरोधकांचा गुजरातविरोधी अजेंडा व्यापकपणे नाकारला जात आहे”, असं मोदी वडसाद येथील सभेत म्हणाले आहेत. याच मतदारसंघात राहुल गांधी सोमवारी प्रचार करण्याची शक्यता आहे. या गुजरात भेटीपूर्वीच सत्ताधारी भाजपाने ‘गुजरात विरोधी’ म्हणत राहुल गांधींना घेरण्याच्या प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-11-2022 at 16:00 IST
Next Story
राहुल गांधींच्या पदयात्रेत महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षांचा वाहनातून प्रवास