पालघर लोकसभा निवडणुकीत विजयी ठरलेल्या भाजपच्या उमेदवाराला विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये चांगले मताधिक्य मिळाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य काही पटीने अधिक असल्याने भाजप सह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुनर्बांधणीची गरज निर्माण झाली आहे.

बहुजन विकास आघाडी जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व करत असून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बोईसर, नालासोपारा व वसई येथे मिळालेल्या अनुक्रमे २७५२, ४३५४७ व २५९५५ मताधिक्याला मागे टाकून भाजपाने अनुक्रमे ४१७७३, ७०६६८ व ९४१९ असे मताधिक्य मिळविले आहे. महानगरपालिका क्षेत्रात या पक्षाला २५ ते २७ टक्के मत मिळाली असून उर्वरित तीन मतदारसंघात १० ते १२ टक्के मत प्राप्त झाली आहेत. महानगरपालिका क्षेत्रात हा पक्ष सक्रिय असला तरी ग्रामीण भागात पाच वर्षानंतर उगवणार पक्ष अशी निर्माण झालेली छबी बदलण्याची गरज आहे.

हेही वाचा…पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नड्डांची वापसी; अभाविप कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

शिवसेनेचे पालघर विधानसभा हा बालेकिल्ला मानला जात असून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ४०३०५ मताधिक्य मिळाले होते. यंदा मात्र भाजपाने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला २९२३९ मतांनी मागे टाकले त्यांचा बालेकिल्ला पोखरला आहे. शिवसेनेमध्ये पडलेली फुट व जुन्या पक्षातील नेतेमंडळींनी शिंदे गटात केलेले प्रवेश यामुळे जिल्ह्याला संघटनात्मक पुनर्रबांधणी करणे गरजेचे झाले आहे.

विक्रमगड विधानसभा क्षेत्रात सध्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) चे नेतृत्व असून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवाराला २१ हजार ३९९ मताधिक्य मिळाले होते. या निवडणुकीत भाजपाने विक्रमगड मध्ये ३३२०९ मतांची आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा पालघर जिल्ह्यात विशेष परिणाम झाला नसला तरीही विक्रमगडची जागा राखण्यासोबत जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वर्चस्व ठेवण्यासाठी पक्ष उभारणीची नव्याने गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा…२६ व्या वर्षी राजकारणात तर ३६ व्या वर्षी मंत्री; कोण आहे मोदी सरकारमधील सर्वांत तरुण मंत्री?

डहाणू विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व सध्या कम्युनिस्ट पक्ष करीत असून विधानसभा निवडणुकीत मिळालेले ४७०७ चे मताधिक्य आता ८८२ वर येऊन ठेपले आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील कम्युनिस्ट पक्षाला भाजपाकडून धोका संभवत आहे.

हेही वाचा…शिंदे , अजित पवार गटाला भाजपचा सूचक इशारा

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे, मतांचे जातीय पद्धतीने झालेले ध्रुवीकरण तसेच युती, आघाडीत मध्ये असणाऱ्या घटक पक्षांची मदत व विविध सामाजिक राजकीय संघटनांची मिळालेली साथ मतदानात महत्वपूर्ण राहिली आहे. मात्र विजयी झालेल्या भाजपाला देखील गटबाजीचे ग्रहण लागले असून मित्र पक्षांच्या नेत्यांमध्ये असणारे धुसफुसी ने ग्रासले आहे. प्रत्येक विधानसभा जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने आगामी निवडणुकीला सामोरे जाताना संघटनात्मक आत्मचिंतनाची गरज भासणार आहे.