महेश सरलष्कर

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सूक्ष्म आखणी सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून नव्या प्रभारींचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बिहारची जबाबदारी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तावडे यांना बिहारचे प्रभारीपद देऊन पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर मोलाचा विश्वास दाखवला असून सरचिटणीसपदी नियुक्तीनंतरची ही एक राजकीय बढती मानली जात आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांनाही भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्व असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

बिहारमध्ये गेल्या महिनाभरात अनेक राजकीय उलथापलथी झाल्या आहेत. जनता दलाचे (संयुक्त) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) रामराम करून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी केली व पुन्हा सत्ता स्थापन केली. नितीशकुमार यांची खेळी भाजपला बिहारमध्ये जबरदस्त राजकीय धक्का देणारी होती. त्यामुळे भाजपला बिहारमध्ये लोकसभा तसेच, विधानसभा निवडणुकीसाठी नवी पक्षीय बांधणी व आखणी करावी लागणार आहे. बिहारमध्ये भाजपचा विस्तार करताना अन्य पक्षांतील कळीचे नेते (महाराष्ट्राप्रमाणे!) भाजपमध्ये आणावे लागतील तसेच, बुथ स्तरापासून लोकसभेच्या मतदारासंघांपर्यंत नियोजन करावे लागणार आहे. इतकी महत्त्वाची कामगिरी बजावण्यासाठी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद तावडे यांची निवड केली आहे.

राज्यामध्ये प्रदेश नेतृत्वाने डावलल्यानंतर विनोद तावडे यांचे केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रीय राजकारणात पुनर्वसन केले. गेल्या दोन वर्षांमध्ये उत्तरेकडील राज्यांमधील राजकारण जवळून पाहिल्याचा मोठा लाभ तावडे यांना बिहारमध्ये होऊ शकतो. तावडे यांना नड्डा व शहा यांनी राष्ट्रीय सचिव करून हरियाणाची जबाबदारी दिली. हरियाणाचे प्रभारी म्हणून तावडे यांनी उत्तरेकडील राज्यांमधील जातीच्या समीकरणांचा अभ्यास केला. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मतदार ही व्होटबँक नाही पण, उत्तरेमध्ये ब्राह्मण मतदाराचा प्रभाव किती निर्णायक होऊ शकतो, हे तावडे यांनी पाहिलेले आहे. हीच बाब जाट तसेच, ओबीसींसंदर्भातही लागू पडते. उत्तर प्रदेशपेक्षा हरियाणा व बिहारमध्ये जातीच्या समीकरणाच्या आधारावर निवडणुका लढवल्या जातात. बिहारमध्ये ब्राह्मण, भूमिहार, राजपूत आणि कायस्थ या चार प्रमुख उच्चवर्णीय जाती तसचे, कुर्मी-कोयरी या ओबीसी जाती, दलित-महादलित, मागास-अतिमागास अशा विविध जाती गटात विभागलेल्या बिहारचे राजकीय आकलन तावडे यांना दोन वर्षांच्या अनुभवामुळे करता येऊ शकेल.

बिहारमध्ये ४० लोकसभा तर, २४३ विधानसभा मतदारसंघ असून आता भाजपला या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचे आव्हान असेल. त्यामुळे आगामी काळात नड्डा यांच्याप्रमाणे अमित शहा यांनीदेखील बिहारमध्ये लक्ष घातले आहे. काही दिवसांपूर्वीं शहा यांचा बिहारचा दौरा केला आहे. २०१७ मध्ये शहा यांनी सुनील बन्सल आदी विश्वासू नेत्यांच्या सहकार्याने उत्तर प्रदेश पिंजून काढला होता व विधानसभेत प्रचंड यश मिळाले होते. बिहारमध्ये तावडे यांना बन्सल यांच्याप्रमाणे शहांचे विश्वासू म्हणून काम करावे लागणार आहे. कधीकाळी बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोदी-शहांचे विश्वासू म्हणून पाहिले जात होते, नड्डा-शहांनी आता दुसऱ्या मराठमोळ्या नेत्यावर भरवशा करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा तावडेंवरील विश्वास वाढत असल्याचे त्यांना राष्ट्रीय महासचिवपदी बढती दिल्यानंतर स्पष्ट झाले होते. राष्ट्रीय सचिव असताना तावडे फक्त हरियाणाबद्दल बोलत असत, महासचिव झाल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणावर भाष्य करू लागले. त्यांच्याकडे नड्डा यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारीही देण्यात आली. तावडे प्रचार समितीचे सह-समन्वयक होते. ही जबाबदारी सांभाळत असताना लोकसभा ‘’मिशन-१४४’’च्या आखणीमध्येही तावडे सहभागी झाले. २०१९ मध्ये कमी मताधिक्याने भाजपचा पराभव झालेल्या देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजप सक्रिय झाला असून गेल्या आठवड्यात यासंदर्भातील महत्त्वाची बैठकही भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात झालेली होती. या ‘’मिशन’’वर नड्डा व शहा देखरेख ठेवत आहेत. भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली राष्ट्रपती पदाची निवडणूक असो वा लोकसभा-विधानसभा निवडणूक असो, नड्डा-शहांच्या निर्णयप्रक्रियेत आखणी आणि अंमलबजावणीमध्ये तावडेंचा सहभाग झालेला आहे.