नितीश कुमार यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बिहारमध्ये भाजपाचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या राजकीय फेरबदलामुळे अनेक दशके समाजवादी आणि मंडल विचारधारेवर आधारलेले बिहारचे राजकीय वातावरण आता हिंदुत्वाच्या दिशेने झुकण्याची शक्यता आहे. तरीदेखील आगामी काळात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपासमोर अनेक मोठी आव्हाने उभी राहू शकतात, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. त्याविषयीचा हा आढावा…

बिहारमध्ये बलाढ्य नेतृत्वाची पोकळी

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बिहारच्या राजकारणावर नितीश कुमार यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी तब्बल १० वेळा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला असून राज्यावर मजबूत पकड ठेवली आहे. स्वच्छ प्रतिमेसह जनतेतील लोकप्रियता आणि सर्व जाती-धर्मांमध्ये असलेली पकड, यामुळे नितीश कुमार राज्यातील प्रभावी नेते मानले जातात. भाजपामध्ये सध्या त्यांचा उत्तराधिकारी म्हणून दुसरा कोणताही नेता दिसत नसल्याने ही सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी (NDA) मोठी अडचणीची बाब ठरू शकते, यामुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकाळ टिकून राहिलेल्या सामाजिक आणि राजकीय आघाड्यांमध्ये तडे जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विद्यमान सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते; त्याचा थेट फायदा तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि विरोधी पक्षांना मिळण्याची शक्यता आहे.

भाजपासमोर मोठमोठी आव्हाने

नितीश कुमार यांच्या कार्यकाळात प्रशासनावर त्यांचा असलेला वचक आणि पारदर्शक कारभार हे एनडीएचे बलस्थान होते, जे टिकवून ठेवणे कदाचित भाजपासाठी मोठे कठीण होऊ शकते. राज्यात स्वतःला मागासवर्गीयांचा पक्ष म्हणून प्रस्थापित करण्यात भाजपाला अद्याप पूर्ण यश आलेले नाही. सर्व जातींना सामावून घेणारा सर्वसमावेशक जनाधार तयार करण्यासाठी भाजपाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. उत्तर प्रदेशातील राजकारणाचे मॉडेल बिहारमध्ये जसेच्या तसे लागू करणे कठीण आहे, कारण येथे राजदची मुस्लीम-यादव मतपेढी आजही कायम आहे. नितीश कुमार यांच्यानंतर सत्तेची धुरा सांभाळताना भाजपासमोर सर्वात मोठे आव्हान हे नेतृत्वाचे असणार आहे. २००५ पासून बिहारमधील एनडीए सरकारचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे नितीश कुमार यांचे चारित्र्य आणि सचोटी राहिली असल्याचे खुद्द एका भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनीच मान्य केले आहे. नितीश कुमार यांनी तयार केलेला प्रशासकीय दर्जा राखणे हे आमच्यासाठी खूप कठीण काम आहे.

आणखी वाचा : ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस; शिंदेंच्या शिवसेनेतील इनकमिंग वाढले, वाचा ५ घडामोडी…

भाजपाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप झाले होते. नितीश कुमार यांच्या स्वच्छ प्रतिमेचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जबरदस्त वचक होता, जो टिकवून ठेवणे नवीन मुख्यमंत्र्यांसाठी सोपे नसेल, असे भाजपाच्या एका दिग्गज नेत्याने सांगितले. बिहार निवडणुकीपूर्वी जन सुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते; त्यामध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल आणि मंत्री मंगल पांडे यांचा समावेश होता. भाजपाने हे सर्व आरोप निराधार म्हणून फेटाळून लावले असले तरीही जनतेच्या मनातील विश्वासार्हता जपण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचा केवळ प्रशासनावरच नव्हे तर मंत्र्यांवरही पूर्ण वचक असायला हवा. नवीन मुख्यमंत्र्यांनाही सरकारची प्रतिमा स्वच्छच ठेवावी लागेल, असे भाजपातील एका गटाचे मत आहे.

बिहारचे जातीय गणित बदलणार?

बिहारच्या राजकारणावरील नितीश कुमार यांची पकड सुटत असताना आता सर्वांच्याच नजरा येथील जटिल जातीय समीकरणांकडे लागून आहे. राज्यात भाजपाची प्रतिमा अजूनही उच्चवर्णीय पक्षाची आहे. उत्तर प्रदेशच्या तुलनेत बिहारमधील उच्चवर्णीयांची लोकसंख्या केवळ १५ टक्केच आहे. दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदचा मुस्लीम-यादव हा भक्कम जनाधार आजही कायम आहे. राजकीय विश्लेषक अजय सिंह यांच्या मते, भाजपाला उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बिहारमध्ये जशीच्या तशी राबवता येणार नाही, कारण बिहारमध्ये राजदचे तगडे आव्हान असून भाजपाकडे नितीश कुमार यांच्यासारखा मागासवर्गीय चेहरा नाही.

हेही वाचा : भाजपाच्या आमदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कोण होते गोविंद परमार? त्यांची कारकीर्द कशी राहिली?

नितीश कुमार यांचे यशाचे गुपित काय?

गेल्या दोन दशकांत नितीश कुमार यांच्या यशाचे मुख्य कारण, त्यांना मिळणारा ओबीसी आणि अतिमागास समुदायांचा पाठिंबा मानला जातो. या समुदायातील मतदार बिहारच्या राजकारणात अतिशय निर्णायक मानले जातात. याशिवाय महिला मतदारांचा मोठा पाठिंबा आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ही नितीश यांची जमेची बाजू होती. त्यांनी राज्यात प्रभावीपणे राबवलेल्या लोककल्याणकारी योजना टिकवून ठेवण्याचे आव्हान नवीन मुख्यमंत्र्यांसमोर असेल. नितीश कुमारांच्या उत्तराधिकाऱ्यासमोर दारूबंदी हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा ठरू शकतो. राज्याच्या महसुली तुटीमुळे भाजपा ही बंदी उठवण्यास उत्सुक आहे, मात्र हा निर्णय नितीश कुमार यांचा असल्याने त्यांच्या पक्षाला विश्वासात घेणे भाजपासाठी अनिवार्य असेल.

निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे?

सध्या बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षांचा समावेश आहे, त्यांच्यामुळेच भाजपाला राज्यात दलित व इतर मागासवर्गीयांचा पाठिंबा मिळत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात त्यांच्या पक्षाचे नेतृत्व कोण करणार यावरूनही मोठा पेच निर्माण झाला आहे. संजय झा, ललन सिंग आणि विजय चौधरी यांच्यासारखे उच्चवर्णीय नेत्यांना पक्षात मोठी लोकप्रियता आहे. यादरम्यान नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना आगामी काळात उपमुख्यमंत्रिपदावर बढती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ते वडिलांच्या नेतृत्वाची पोकळी भरून काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.