आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिंदेसेनेचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर भाजपाने दावा ठोकण्याची तयारी केली… उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील २२ आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली… शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाला थेट भाजपाकडून विधान परिषदेच्या उमेदवारीची ऑफर मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांनी उपरोधिक टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना अभिनेता जॉन इब्राहिमशी केली…पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाचे महापौर रवी लांडगे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपाचा दावा?

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दावा ठोकण्याची तयारी सुरू केली. या मतदारसंघात पक्षाकडे सर्वाधिक ४४४ मतांचे संख्याबळ असल्याने ही जागा भाजपालाच मिळावी, असा आग्रह स्थानिक नेत्यांनी धरला. यासंदर्भात लवकरच पक्षश्रेष्ठींकडे अधिकृत मागणी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा नेत्यांकडून देण्यात आली. ठाणे-पालघर जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत या भागात भाजपाची ताकद वाढल्याचे दिसून येते. यापूर्वी ठाणे लोकसभा आणि शिक्षक मतदार संघावरही भाजपाने दावा केला होता. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदेसेनेला सोडण्यात आली. यादरम्यान ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवर भाजपाच्या नेत्यांनी दावा ठोकल्याने शिंदे गटाची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महायुतीतील मित्रपक्षाचे २२ आमदार फुटणार?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील २२ आमदार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली. या २२ आमदारांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्याचे साम टीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या घडामोडीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीतील मित्रपक्ष असून राज्यातील सत्तेत आहे. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. मात्र, काही दिवसांपासून या पक्षात अंतर्गत धुसफूस वाढल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर या पक्षातील काही नेते आगामी निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर लढणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. यादरम्यान पक्षातील तब्बल २२ आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादीत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रताप पाटील यांना भाजपाकडून ऑफर?

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक जाहीर होताच जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानिमित्ताने महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येऊ लागला आहे. आगामी काळातील जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरविणारी ही निवडणूक मानली जात आहे. महायुतीकडे संख्याबळाचे स्पष्ट वर्चस्व असले तरी उमेदवारीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. यादरम्यान राजकीय घडामोडींना आणखी वेग देणारी एक महत्त्वाची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाने उमेदवारीबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांना थेट भाजपाकडून निवडणूक लढविण्याची ऑफर दिल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली आहे. प्रताप पाटील हे जिल्हा परिषदेची माजी सदस्य असून गेल्या काही वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे ते शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार की भाजपाकडून हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमित ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी उपरोधिक टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना अभिनेता जॉन इब्राहिमशी केली. पंतप्रधान नरेंद्र यांनी इंधन बचत आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने जनतेला आवाहन केल्यानंतर राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी अनेक प्रतिकात्मक उपक्रम राबवले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थान ते मंत्रालय असा प्रवास बुलेट मोटारसायकलवरून केला, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसमधून प्रवास करत इंधन बचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. अमित ठाकरे यांनी नागपुरात बोलताना सरकारच्या या उपक्रमांवर थेट टीका केली. लोक आता म्हणायला लागले आहेत की, परदेश दौरे बंद करा. सहा मिनिटांच्या अंतरासाठी बाईकवर प्रवास कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम असा करत उपरोधिक टिप्पणी केली. सहा बाईक आणि सुरक्षा ताफ्याचा वापर करून अल्प अंतरासाठी प्रवास करणे हे केवळ दिखावा असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचे दिसून आले.

भाजपाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाचे महापौर रवी लांडगे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने थेट पोलीस आयुक्तालयाच्या (सीपी ऑफिस) हेल्पलाईनवर कॉल केल्याचे समोर आले. “मी महापौर रवी लांडगे यांना मारून टाकणार आहे,” अशी भाषा या व्यक्तीने फोनवरून वापरली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आशिष जामदाडे पाटील असे संशयिताचे नाव असून तो मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी तपास केला असता, संबंधित तरुणाचा घटस्फोट झालेला असून तो आई-वडिलांपासून वेगळा राहतो. या कौटुंबिक वादामुळे त्याची मानसिक स्थिती खालावली असून, त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे समज देऊन त्याला सोडण्यात आले, अशी माहिती महापौर लांडगे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.